दिग्दर्शकाच्या खुर्चीतून : भव्य दिव्य संस्कारांच्या छायेत!

16

>> रोहिणी निनावे

दिग्दर्शक, कथा-पटकथा लेखक सुरज बडजात्यांना मराठी कलावंतांविषयी नेहमीच प्रेम आणि आदर वाटत आला आहे. सूरजजींकडे सांगण्यासारखं खूप काही असल्याने मी या मुलाखतीचे दोन भाग लिहिण्याची अनुमती ‘दैनिक सामना’कडे मागितली आणि सामनाने मान्यही केली.

मी विचारलं, तुम्ही मालिका करण्याचा विचार कसा काय केलात? सूरजजी म्हणाले, मालिकांचं युग सुरू झालं होतं. काळाप्रमाणे नवीन आव्हानं स्वीकारायची गरज होती. सिंगल थिएटर्सचा जमाना जाऊन मल्टिप्लेक्स चा जमाना सरू झाला होता. मल्टिप्लेक्सचे दर न परवडणाऱया लोकांनी टी. व्ही. बघायला सुरुवात केली होती. अशा वेळी सहारा वाहिनीने आम्हाला विनंती केली की, काहीही करून एक तरी मालिका बनवाच आमच्यासाठी. ते खूप मागे लागल्यावर मग आम्ही मालिका बनवायचं ठरवलं. आमच्यासाठी हा प्रकार अगदी नवीन होता. ‘वो रहनेवाली महलों की’ असं त्या मालिकेचं नाव होतं… या मालिकेचे हजारहून अधिक भाग झाले. या मालिकेच्या दरम्यान मालिका निर्मितीचा चांगलाच अनुभव आम्हाला मिळाला. मला आठवतं आहे, सूरजजी कथेच्या चर्चेमध्ये नेहमी न चुकता भाग घ्यायचे. त्यांचे वडील राजकुमार बडजात्या हेदेखील आवर्जून उपस्थित असायचे. मी, कविता बडजात्या, देवांश बडजात्या असे आम्ही दहा बारा जण मीटिंगसाठी बसायचो. आमचा सगळ्यांचा सूर उच्चीचा असायचा, सूरजजी मात्र अत्यंत हळू आवाजात बोलतात. कथेबाबत असलेली त्यांची समज थक्क करणारी आहे, ते नॅरेशन करायला लागले की, सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांच्या कथेमधली पात्रदेखील त्यांच्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखांसारखीच साधी संस्कारी असतात. नम्रपणाची पराकोटी म्हणजे, ते म्हणायचे बघा हं, तुम्हाला पटतं का ते…नसेल पटत तर जाऊ द्या. स्वतःचं म्हणणं त्यांनी कधीच कुणावर लादलं नाही. मात्र स्वतःच्या कलाकृतीवर त्यांचं निस्सीम प्रेम असतं. मालिका असो किंवा चित्रपट, ते प्रत्येक विभागामध्ये जातीनं लक्ष घालतात. ते म्हणाले एका दिग्दर्शकाला या सगळ्या गोष्टींकडे स्वतः लक्ष देणं गरजेचं असतं, कारण लेखकाने जे लिहिलं आहे, ते त्याने लिहिलेल्या संहितेला न्याय देईल अशा तहेने त्याला मांडावं लागतं. मी म्हटलं, सर चित्रपटाचं दिग्दर्शन आणि मालिकेचं दिग्दर्शन यात काय फरक आहे? सर म्हणाले, जमीन अस्मानाचा फरक आहे.. एक लेखकाचं माध्यम आहे आणि दुसरं दिग्दर्शकाचं. चित्रपट हा लार्जर दॅन लाईफ असतो, किमान तो असावा असं मला वाटतं. मालिकेमध्ये अत्यंत कमी वेळामध्ये, सर्व गोष्टींचं भान राखून, सर्व मर्यादांसह शूटिंग करावं लागतं, त्यामुळे तुमच्यातल्या सृजनशीलतेला मिळावा तसा वाव मिळत नाही. चित्रपटामध्ये तुमच्याकडे वेळ असतो, तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेळ देऊ शकता. सगळ्या गोष्टी उत्कृष्ट कशा देता येतील यावर काम करू शकता. मुख्य म्हणजे तुम्हाला हवं तसं तो करू शकता. मालिकेमध्ये वेळही नसतो आणि स्वातंत्र्यही. तुमच्या कलागुणांचा कसही लागत नाही आणि तुम्हाला तशी संधीही फार क्वचित मिळते. पण मी म्हणेन की, मालिका दिग्दर्शकाचं काम खूपच कठीण आहे. त्यासाठी अत्यंत संयमाची, हुशारीची गरज आहे. टीआरपीचं टेन्शन, आर्टिस्टची, लोकेशनची अवेलेबिलिटी, तांत्रिक अडचणी या सगळ्यांवर मात करून तो निरंतर काम करत असतो. आणि मालिका लोकप्रिय होतात याचा अर्थ सगळेच मेहनत करत असतात. मी म्हटलं, हल्ली नागीण, तंत्र मंत्र यांचं यांचं प्राबल्य मालिकेमध्ये दिसतं, याचा अर्थ असा आहे का, की कौटुंबिक मालिकांचं महत्त्व संपत आलं आहे?

सर लगेच म्हणाले नाही रोहिणीजी, प्रत्येक माध्यमामध्ये स्थित्यंतर होत असतं. पण जे चांगल ंआहे, खरं आहे ते टिकून राहतं. म्हणूनच आजही आई हा शब्द उच्चारल्यावर कुणाचंही मन कोमल होतं. मुलांसाठी त्यांच्या आवडते पदार्थ बनवणं असो, त्यांचा उत्कर्ष असो, नाहीतर मुलीची पाठवणी असो..आज ही या सगळ्या भावना तशाच आहेत…मनाला स्पर्श करणाऱया या घरगुती घटना आहेत. माणूस म्हटलं की भावना या आल्याच. ये दौर भी गुजरेगा.. और फिर पारिवारिक फिल्मो और सीरिअल्स का दौर आयेगा. मी म्हटलं, बहुधा असं बघितलं जातं की दिग्दर्शक त्यांच्या आवडीच्या नटांना रिपीट करतात, तुमच्या फिल्म्स आणि मालिकांमध्येही तुमचे आवडते कलाकार दिसतात…सलमान खान, माधुरी दीक्षित, अलोकनाथ, रीमा लागू, अजित वाच्छानी, लक्ष्मीकांत बेर्डे. सूरजजी म्हणाले, अनेक प्रोजेक्ट्समध्ये त्यांच्या बरोबर काम केल्यावर त्यांना कळायला लागतं की, दिग्दर्शकाला नेमकं काय हवं आहे, कशा तऱहेचा अभिनय हवा आहे, स्क्रिप्टमधून त्याला काय म्हणायचं आहे. एक रॅपो तयार होतो. कधी कधी काही गोष्टी सुचत नाही तेव्हा कलाकार स्वतःच समजून करून घेतात किंवा दिगदर्शक त्या कलाकारांकडून त्याला हवं तसं काम काढून घेऊ शकतो. एकमेकांवरचा हा विश्वास खूप कामाला येतो. मी विचारलं, ‘राजश्री’च्या चित्रपटांना श्रवणीय संगीताची परंपरा आहे.सगळ्याच चित्रपटांची गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. फादर को म्युजिक की बहुत अच्छी समझ थी, उनके साथ रहकर मैने भी बहुत कुछ सीखा, समझ लिया. गंमत म्हणजे हम आप के हैं कौनच्या वेळेस मी थोडा साशंक होतो, कारण आमच्या लिरिक्समध्ये भय्या, भाभी, मौसा-मौसी, माई नी माई, दुल्हे की सालियों, दिदी तेरा देवर दिवाना असे शब्द होते…अशी गाणी लोकांना आवडतील का असं वाटत होतं, पण लोकांना ही गाणी खूप आवडली कारण साधी सोपी भाषा आणि मेलडी!…मी म्हटलं आजकाल वेगवेगळ्या जॉनरचे पिक्चर्स बनताहेत तर तुम्हाला नाही वाटत का तसं काही बनवावं…सूरजजी म्हणाले मी मघाशी म्हणालो तसंच… प्रत्येकाने आपल्याला जे जमतं ते करावं, मात्र दुसऱयाने केलेल्या प्रामाणिक प्रयोगाचं कौतुक करावं. तुमच्या चित्रपटांमध्ये मराठी लोक खूप दिसतात. मराठी लोकांविषयी तुम्हाला विशेष आत्मीयता आहे का? सूरज जी म्हणाले, हो नेहमीच. लक्ष्मीकांत बेर्डे, रीमा लागू, आमचे फेवरीट सचिन पिळगावकर, भाग्यश्री पटवर्धन, रेणुका शहाणे, माधुरी दीक्षित, प्रिया बेर्डे, ईशा कोप्पीकर, संगीतकार राम लक्ष्मण, सूरसम्राज्ञी लता जी…अशी असंख्य नावं. ह्या सगळ्यांमध्ये अमाप टॅलेंट आहे. सुशिक्षित, संस्कारी हैं आणि ये लोग जमीन से जुडे हैं. निष्ठsने काम करणारे आहेत. फॅमिली कल्चर समजणारे आहेत. महाराष्ट्रामध्ये संपन्न साहित्य आहे, एक कला परंपरा आहे, म्हणून मला मराठी माणसांबरोबर काम करायला आवडतं. मी म्हटलं शेवटचा प्रश्न.. थोडा नेहमीचाच आहे, पण तुमचं सांगणं महत्त्वाचं आहे, नवीन दिग्दर्शकाना तुम्ही काय सांगू इच्छिता?

ते म्हणाले मी हेच सांगेन की या माध्यमाचा नीट अभ्यास करून या, मुख्य म्हणजे तुम्हाला जे जमतं, जे येतं ते करा ! आज खूप दर्जेदार चित्रपट बनत आहेत. उत्तम दिग्दर्शक लेखक या क्षेत्रात आले आहेत, विशेष म्हणजे लेखिकाही आल्या आहेत. आणि मराठी आणि हिंदी चित्रपटाचं दृश्य खूप आशादायी आणि आनंददायी आहे !

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या