पर्यावरणशास्त्राचे पितामह

87

>> शैलेश माळोदे

प्रा. माधवराव गाडगीळ पर्यावरण रक्षण आणि संवधर्नाचे असिधारा व्रत त्यांनी घेतलेले आहे…

माझा जन्म पुणे शहराचा. ज्याला आपण उपनगरे म्हणू अशा तत्कालीन भागात 1942 साली झाला. आमच्या घराच्या गच्चीवरून मी सहय़ाद्रीच्या पर्वतीय रांगांची मौज नजर जितकी लांब जाईल तितकी पाहत असे. सिंहगडची शानदेखील सहज दृष्टीस पडे. त्यासाठी 25 किलोमीटर्सची रपेट मारण्याची गरज नसे. उलट वेताळ टेकडीसारख्या अवघ्या दोन कि.मी.वरील परिसरातून पुण्याला वेढणारा अख्खा पश्चिम घाट (सहय़ाद्री) दिसे. हा दोन किलोमीटरचा रस्ता तसा निर्मनुष्य होता आणि संपूर्ण निसर्ग त्यामधून मन उल्हसित करे.’’ प्रा. माधवराव गाडगीळ यांच्याशी गप्पा मारताना सहजपणे पुणे आणि आता त्याच्याशी व्यस्त होत चालला निसर्ग यांच्या ऐतिहासिक नात्याचा आपसूकच उलगडा होतो. डॉ. धनंजय गाडगीळ, प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष यांचे चिरंजीव असलेले माधवराव वैद्यकीय पदवीला मिळणारा प्रवेश सोडून पर्यावरणविषयक पॅशन लक्षात घेऊन बीएस्सी पदवी घेण्यासाठी फर्ग्युसनला प्रवेश घेते झाले. ‘‘मी वैद्यकीय पदवीला प्रवेश सोडून बीएस्सीला प्रवेश घेतला म्हणून माझ्या सहअध्यायी विद्यार्थी आणि जीवशास्त्राच्या शिक्षकांनी वेडय़ात काढले. जीवशास्त्रज्ञ होण्याचं माझं स्वप्न साकारण्यासाठी तीन वर्षांचा पदवी शिक्षणाचा काळ सततच्या सामाजिक दबावाला झुगारून देत काढावा लागला. सरतेशेवटी मी मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये सागरी जीवशास्त्र या माझ्या खास विषयासह प्रवेश घेतल्यावर माझ्या आयुष्याला निश्चित दिशा लाभली.’’

प्रा. माधवराव गाडगीळ यांच्या मानव वंशशास्त्र, इतिहास संख्याशास्त्र, गणित, राज्यशास्त्र अशा बहुआयामी विषयांमधील पारंगततेसोबत प्रा. सुलोचना गाडगीळ या हवामानशास्त्रातील प्रसिद्ध गणितज्ञ पत्नीकडून त्यांना गणित शिकणे सुलभ होऊन जीवशास्त्रात (सैद्धांतिक पॉप्युलेशन बायॉलॉजी) मध्ये पीएच.डी. करण्यासाठी त्यांनी हॉर्वर्डला प्रयाण केले. खरं तर त्यांना सागरी जीवशास्त्रात पीएच.डी. करायची होती. त्या विषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘मी हार्वर्डला जाण्यासाठी आवेदन दिलं होतं. त्यांची एक आंतरराष्ट्रीय टीम हिंदी महासागरविषयीच्या संशोधनासाठी हिंदुस्थानात आली होती. त्यात हॉर्वर्डचे प्रसिद्ध सागरशास्त्रात गाईल्स मीड होते. त्यांनी मला हॉटेलमध्ये मुलाखतीसाठी बोलावलं. प्रदीर्घ मुलाखतीनंतर त्यांनी मला हार्वर्डसाठी निवडलं. परंतु तिथे प्रा. एडवर्ड विल्सन या जगप्रसिद्ध उक्रांती जीवशास्त्रावरची व्याख्याने ऐकल्यानंतर मी माझ्या पीएच.डी.च्या विषयात बदल केला. पुढे ते म्हणाले, ‘‘1960 चे दशक हॉर्वर्डला खूपच एक्सायटिंग होतं. व्हिएतनाम युद्ध आणि हिप्पी संस्कृतीमुळे तिथे खूपच लाईव्हली बौद्धिक चर्चा झडत. 1969 मध्ये पीएच.डी. प्राप्त केल्यावर मी दोन वर्षे हार्वर्डला अधिव्याख्याता म्हणून काम केलं. परंतु हिंदुस्थानात परतणे ही आमची (माझी आणि सुलोचनाची) प्राधान्यता होती. म्हणून अमेरिकेतील ऑफर्स नाकारून आम्ही हिंदुस्थानात बेरोजगार म्हणून परतलो. मात्र सीएसआयआरच्या वैज्ञानिक ‘पूल’मध्ये आम्ही होतो. 1973 मध्ये प्रा. माधवराव गाडगीळ बेंगळुरूला आयआयएस्सीमध्ये रुजू झाले.

31 वर्षांपेक्षा जास्त काळ त्या ठिकाणी व्यतीत करून 2004 साली ते सेवानिवृत्त झाले. या कालावधीत त्यांनी परिस्थितीकी (इकॉलॉजी) विषयक अध्ययन संशोधन करणारे केंद्र सेंटर फॉर इकॉलॉजिकल स्टडीजची स्थापना केली. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक असून गोवा विद्यापीठात ‘डीडी कोसंबी रिसर्च प्रोफेसर’ म्हणून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. 1986 ते 1990 या काळात त्यांनी पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणूनदेखील काम केले. 2010 साली केंद्र सरकारने स्थापन केलेल्या ‘वेस्टर्न घाटस् इकॉलॉजी एक्स्पर्ट पॅनल’चे अध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली. त्यांनी सादर केलेला अहवाल सहय़ाद्रीच्या संवेदनशील परिस्थितीतील संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
प्रा. गाडगीळ यांचं हिंदुस्थानच्या परिस्थितीकी संरक्षण विषयीचं योगदान अत्यंत लक्षणीय आहे. त्यांच्या संशोधनामुळे दक्षिण हिंदुस्थानात ‘निलगिरी जीवावरण’ प्रथम बायोस्किमच्या स्वरूपात स्थापन झाले. सहय़ाद्रीविषयक अहवाल तर गाडगीळ आयोग अहवाल म्हणून नावारूपाला आला. त्यावर खूप उलटसुलट चर्चा झाली. केरळ महापुरामुळे प्रा. माधव गाडगीळ यांची भूमिका पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत आली. लोकसहभागाशिवाय पर्यावरण संरक्षण अशक्य आहे. त्याकरिताच लोकांना असलेले ज्ञान आणि त्याची नोंद होणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन-संवर्धन शक्य होईल. असे सांगणाऱया माधवरावांनी ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ची संकल्पना देशभरात राबविण्याचे ठरवून प्रयत्न केले. त्यावरूनच पुढे वनहक्क कायदाही तयार करण्यासाठीची पावले उचलली गेली. हिंदुस्थानच्या जैवविविधता कायद्यासाठीच्या मसुदा समितीतही प्रा. गाडगीळ यांनी कार्य केले. एनसीईआरटीमध्ये पर्यावरण शिक्षणाचा समावेश करून शालेयस्तरावर पर्यावरण संरक्षण नेण्यात त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे.

प्रा. माधवराव गाडगीळ पद्मभूषण (2006) आणि कर्नाटक सरकारच्या राज्योत्सव प्रशस्तीने सन्मानित आहेत. 2019 साली त्यांना त्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या फर्ग्युसन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 250 पेक्षा जास्त शास्त्राrय शोधनिबंध लिहिणाऱया प्रा. गाडगीळ यांनी मराठी, कन्नड आणि इंग्रजीतून वृत्तपत्रीय लिखाणही केलेय. त्याशिवाय त्यांनी सहा पुस्तकेही (इंग्रजीत) लिहिली आहेत. असे प्रा. माधवराव गाडगीळ देशातील ‘इकॉलॉजी’ संशोधनाचे पितामह म्हणून सर्वांना प्रेरक आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या