कायदा पाळा, जीवितहानी टाळा!

71

>> देवेंद्र भगत

रहिवासी इमारती आणि व्यावसायिक आस्थापने-उपाहारगृहांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित असणे बंधनकारक असताना याकडे दुर्लक्ष केले जाते. या बेफिकीरपणामुळेच निरपराधांचा नाहक बळी जातो. मात्र दुर्घटनांमध्ये बळी गेल्यानंतरच ही बाब समोर येते. यानंतर प्रशासनाकडून कारवाई आणि सोसायटय़ांकडून अंमलबजावणी केली जाते. मात्र पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’च राहते. हे टाळायचे असेल तर कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि नागरिक, सोसायटय़ांनी जबाबदारीने वागणे हाच पर्याय आहे… मुंबईत गेल्या काही दिवसांत आगीच्या दुर्घटनांमध्ये अनेकांचे नाहक बळी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाचे माजी उप प्रमुख बी. एस. खाडे यांच्याशी केलेली बातचीत.

1) मुंबईत गेल्या काही वर्षांपासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. 10 वर्षांत 600 हून अधिक बळी गेले आहेत. याला नेमके जबाबदार कोण आहे असे आपल्याला वाटते?
– आगीच्या घटना व त्यात जाणारे बळी याला आगप्रतिबंधक नियम बनवणारे, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणारे प्रशासन तसेच या नियमांची पायमल्ली करणारे बेपर्वा नागरिक असे दोघेही जबाबदार आहेत. डायरेक्टर, महाराष्ट्र फायर सर्व्हिस, मुंबई अग्निशमन दल, महानगरपालिकेचे इमारत व इतर खाते यांच्यावर आगप्रतिबंधक व अग्निरक्षक उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे. नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ इंडिया (पार्ट 4 – आग आणि जीवन सुरक्षा), मुंबईची विकास नियमावली आणि मुंबई अग्निशमन दलातर्फे दिले जाणारे ना-हरकत प्रमाणपत्र यानुसार आगप्रतिबंधक व आगरोधक उपाययोजना वेगवेगळय़ा आस्थापनांना दिल्या जातात, परंतु या गोष्टींची तरतूद सुरुवातीला म्हणजे निवासाचा ना-हरकत प्रमाणपत्र देताना योग्य प्रकारे केली जाते, पण त्यानंतर या गोष्टींकडे लक्ष देणे प्रशासनास काही गोष्टींमुळे (मनुष्यबळ इ.) शक्य होत नाही. इमारती, आस्थापनांमध्ये राहणारे, काम करणारे रहिवासी, त्यांचे मालक/ मॅनेजमेंट अग्नी सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करतात. ते मेन्टेन करीत नाहीत. परिणामी आगीच्या घटना घडून जीवित व मालमत्ता हानी होते.

2) इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष होण्याचे कारण काय?
– वर नमूद केल्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणा बसविल्याशिवाय व अग्निशन दलातर्फे त्याचे टेस्टिंग झाल्याशिवाय ओसी (भोगवटा प्रमाणपत्र) मिळत नाही; परंतु अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या अग्निशमन यंत्रणेचे वेळोवेळी परीक्षण होत नाही. म्हणून अग्निशमन यंत्रणेचे परिरक्षण करण्यासाठी लायसन्स एजन्सी नेमणे व त्यांच्याकडून मेंटेनन्स करणे आणि वर्षातून दोनवेळा त्याचे प्रमाणपत्र (B Form) जानेवारी आणि जुलै महिन्यात अग्निशमन दलाकडे देणे बंधनकारक आहे, परंतु अशा एजन्सी नेमून खर्च करणे ही बाब जीवन सुरक्षेपेक्षा मोठी वाटत असावी. त्यासाठी अधिक कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

3) अग्निशमन दलात अनेक पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम होत आहे का?
– अग्निशमन दलातील रिक्त पदांमुळे निःसंशय मुंबई अग्निशमन दलाकडून पुरविण्यात येणाऱया सेवेवर परिणाम होतो.
– अग्निशामक, यंत्रचालक इत्यादी अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अग्निशमन वाहने बंद ठेवावी लागतात. परिणामी दुर्घटनेच्या वेळी आग विझविताना मनुष्यबळ व अग्निशमन वाहने यांचा तुटवडा भासतो. दुर्घटनेवर मात करण्यास व पर्यायाने सुटकेसाठी जास्त वेळ लागून मनुष्यहानी होऊ शकते.
– अधिकाऱयांची रिक्त पदे ः अधिकारी गण अपुरा असल्याने काही अग्निशमन वाहनांवर तुकडीला मार्गदर्शक व कार्यप्रवण करणारा नेता नसतो. त्यामुळे आग विझविण्याच्या प्रक्रियेला खीळ बसते व दुसरे अधिकारी येईपर्यंत वाट पाहून वेळ लागतो.

4) अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रणेची कमतरता आहे का? असल्यास काय करावे?
– अत्याधुनिक यंत्रणेची कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. दलाकडे अत्याधुनिक उंच शिडय़ा (स्नॉर्केल) एरियर प्लॅटफॉर्म लॅडर, अत्याधुनिक रेस्क्यू वाहने, सर्वसाधारण दुर्घटनेला प्रतिसाद देणारी अग्निशमन वाहने, स्वयंचलित सुरक्षा उपकरणे, श्वसन उपकरणे इत्यादींनी दल परिपूर्ण आहे. दलाच्या या ताफ्यात वेळोवेळी वाढ करणे व जगात इतरत्र उपलब्ध असलेली अत्याधुनिक वाहने व उपकरणे दलात सामील करणे आवश्यक आहे. अधिकारी आणि कर्मचाऱयांना ट्रेनिंग व माहितीसाठी वेळोवेळी तज्ञ मार्गदर्शकांची शिबिरे आयोजित करून अग्निशमनाच्या कार्यात त्यांना तरबेज करणे आवश्यक आहे.

5) कार्यालयीन काम आणि आग आटोक्यात आणणे यासाठी स्वतंत्र विभाग असावेत का?
– अग्निशमन दलाच्या सर्वसाधारण कामासाठी महापालिकेकडून कर्मचारीवर्ग नेमण्यात येतो. दलातील अग्निशामक प्रवर्ग म्हणजे प्रमुख अग्निशमन अधिकारी ते अग्निशामक यांच्यासाठी कार्यालयीन काम व फायर फायटिंग ऑपरेशनचे काम यामध्ये स्वतंत्र विभाग करणे योग्य होणार नाही. कारण फायर फायटिंग, फायर प्रिव्हेन्शन यासाठी व तद्नंतर या गोष्टींची तपासणी व तद्अनुषंगाने येणारी कामे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र कर्मचारी व अधिकाऱयांची हुशारी, अनुभव व कार्यतत्परता यानुसार योग्य क्षेत्रात संधी देण्यात यावी.
तथापि दलात फायर प्रिव्हेन्शन, तपासणी व प्रत्यक्ष फायर फायटिंग यासाठी स्वतंत्र विभाग असण्यास हरकत नाही. हे विभाग एकमेकांना पूरक असावेत.

6) सोसायट्या, विकासक यांच्या बेजबाबदारपणाला आळा बसावा यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी कशी करावी?
– सोसायटय़ा, विकासक याशिवाय मोठमोठय़ा आस्थापनांचे व्यवस्थापन यांना नॅशनल बिल्डिंग कोड, 2016, डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन, 2034 तसेच अग्निशमन दलातर्फे देण्यात येणाऱया ना-हरकत प्रमाणपत्राच्या शर्ती अत्यंत कडक स्वरूपात अंमलबजावणी करण्यास लावणे, अग्निशमन यंत्रणेचे अत्यंत जोखीमपूर्वक परिरक्षण (मेंटेनन्स) करणे या गोष्टींची अंमलबजावणी केलीच पाहिजे. तसे न केल्यास महाराष्ट्र आगप्रतिबंधक आणि जीवरक्षक कायदा, 2006 यानुसार कडक कारवाई केली पाहिजे. या गोष्टी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडे पुरेसा अधिकारी गण व कर्मचारीवर्ग पुरविणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलाला अग्निशमन यंत्रणा बरोबर आहे की नाही हे नियमितपणे पाहता येईल व नियमभंग करणाऱयांवर कारवाई करता येईल.

अग्निशमन दलाचे विभाजन, रोबोट, हेलिकॉप्टर आणण्याच्या घोषणा प्रशासनाने केल्या. मात्र अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. जीवित व मालमत्ता हानी टाळण्यासाठी अधिकारी व जवान हे अत्यंत सक्षम, शारीरिकदृष्टय़ा फिट, बेडर व कार्यतत्पर हवेत. आग विझविण्यासाठी आग लागलेल्या इमारतीमध्ये दारे, जिना, खिडक्या, उंच शिडय़ांचा उपयोग करून आणि प्रसंगी परिस्थितीनुसार आगीपर्यंत पोहोचून आगीवर मात करणे हे खऱया अग्निशामकाचे ध्येय असावे असे इंग्लंडच्या सुमारे 150 वर्षांपूर्वीच्या प्रमुख अग्निशामकाने लिहून ठेवले आहे.

आजच्या काळातदेखील हे म्हणजे तसूभरही अतिशयोक्तीचे वाटत नाही. अग्निशमन अधिकारी व अग्निशामक हेच खरे अग्नी प्रलयावर मात करणारे योद्धे आहेत. ते शारीरिकदृष्टय़ा फिट, चौकस बुद्धीचे, निडर, कार्यतत्पर असावेत. रोबोट, हेलिकॉप्टर अशा आधुनिक उपकरणांचा दलामध्ये समावेश केल्यास जवानांना अधिक बळ व उत्साह मिळून ते आपले कार्य जोमाने पार पाडतील यात संदेह नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या