Captain Cool- केदार वैद्य

6

>> रोहिणी निनावे

दिग्दर्शक केदार वैद्य… अनेक यशस्वी मालिका ते चित्रपट झिपऱ्या हा प्रवास खरोखरच रंजक…

केदार वैद्य हे नाव गेल्या दोन वर्षांत घराघरांत माहीत झाले आहे. ‘माझ्या नवऱयाची बायको’ या ‘झी मराठी’वरील प्रसिद्ध मालिकेचा दिग्दर्शक आहे केदार वैद्य. तसेच प्रसिद्ध लेखक अरुण साधू यांच्या ‘झिपऱया’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाचा तो दिग्दर्शक आहे आणि या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका मी लिहिलेली असल्याने गेली अडीच वर्षे माझा आणि केदारचा परिचय आहे. एवीतेवी केदार मुलाच्या मुंजीची पत्रिका द्यायला येणार होता, म्हणून माझ्या घरीच मुलाखत घ्यायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे केदार आला.

मी केदारला विचारलं, ‘‘तू कधी ठरवलंस या क्षेत्रात येण्याचं. म्हणजे ठरवलं होतंस की अपघाताने तू या क्षेत्रात आलास?’’ केदार म्हणाला, ‘‘नाही. असं काहीच माझ्या मनात नव्हतं. घरात तशी काही पार्श्वभूमीही नव्हती. घरची परिस्थिती खूप काही चांगली नव्हती. लवकरात लवकर नोकरी मिळवून पैसे कमवायचे हे माझं ध्येय होतं. घरात एकच ब्लॅक ऍण्ड व्हाइट टी.व्ही. होता. तोही बंद पडला. वडिलांची दादर सार्वजनिक वाचनालयामध्ये मेंबरशिप होती. वडील मला तिथे घेऊन जायचे आणि मी माझ्या आवडीची पुस्तकं घेऊन यायचो. द. मा. मिरासदार आणि भा. रा. भागवतांची अनेक पुस्तकं मी वाचली, ते माझे आवडते लेखक होते. माझी पुस्तकांची आवड बघता मला भेट म्हणून पुस्तकंच मिळायची.

माझा एक मित्र आहे ऋषी त्यागी. तो मालिकांच्या जगाशी संबंधित होता. मी बोलता बोलता जेव्हा सांगितलं की, मी काम बघतो आहे. तेव्हा त्याने मला विचारलं की तू मला असिस्ट करशील का? 3000 रुपये महिना देईन. तेव्हा मला मालिका क्षेत्राचा ‘म’सुद्धा माहीत नव्हता, पण पैसे मिळणार म्हटल्यावर मी ‘हो’ म्हटलं आणि कामाला सुरुवात केली. त्याच्याकडूनच मी अनेक गोष्टी शिकलो. या अर्थाने या क्षेत्रातला तो माझा गुरू आहे.

त्यांनतर ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या सिनेमामध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत असतानाच माझी पत्नी पल्लवी भावेशी (संभाजी मालिकेत पुतळाबाईची भूमिका करणारी गुणी अभिनेत्री) माझी ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. आता लग्न करायचं म्हणजे पैशांचीही गरज होती. त्या वेळेस मी ‘या सुखांनो या’ मालिकेचं पोस्ट प्रॉडक्शन करत होतो. तेव्हा माझी ओळख विद्याधर पाठारेंशी झाली. विद्याधर पाठारे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत ‘अग्निशिखा’या ‘ई टीव्ही’च्या मालिकेचं दिग्दर्शन स्वतंत्रपणे करण्याची जबाबदारी सोपवली आणि मग मला एकामागोमाग एक मालिका मिळत गेल्या. मी म्हटलं, ‘‘…आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने अभूतपूर्व यशही दिलं.’’ केदार म्हणाला, ‘‘याचं श्रेय पूर्ण टीमला आहे. केदारला म्हटलं, ‘‘हा तुझा नम्रपणा आहे. तुझं दिग्दर्शन आणि सीन डिझाईन करण्याची कला असाधारण आहे. तुला पुढे पुढे करून स्वतःला चमकवणं आवडत नाही. तू गपचूप तुझं काम करतोस. मात्र सेटवर तू धमाल करत असतोस.’’ केदार म्हणाला, ‘‘कामाच्या वेळी काम आणि धमाल करायच्या वेळी धमाल असं माझं तत्त्व आहे. सेटवर वातावरण हलकं फुलकं असलं की, काम करायला मजा येते.’’ केदारचा स्वभाव एकाच वेळी मिश्कील आणि गंभीर आहे, पण या स्वभावाची त्याने हुशारीने विभागणी केली आहे.

मी म्हटलं, ‘‘तुला निर्मात्यांची साथ कशी मिळाली?’’ केदार म्हणाला, ‘‘मला नेहमी चांगले निर्माते मिळाले. इंडस्ट्रीमध्ये एस्टॅब्लिश्ड निर्माते खूप कमी आहेत. त्यापैकी बहुतेक चांगल्या लोकांबरोबर मी काम केलं आहे . स्मिता तळवलकर यांचं वाचन अफाट होतं. त्यांच्याशी कथेविषयी चर्चा करताना मजा यायची. स्मिताताईंकडून मी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकलो. हार मानायची नाही, दुःखाला कुरवाळत बसायचं नाही, पुढे जात राहायचं हे त्यांचं ब्रीद होतं.

मी विचारलं, ‘‘सध्याच्या मालिकांमध्ये काय बदल व्हावेत असं तुला वाटतं?’’ केदार म्हणाला, ‘‘फक्त तरुण नायिकेला केंद्रस्थानी धरून त्याच त्याच तऱहेच्या गोष्टी मांडण्याच्या पारंपरिक कल्पनेला छेद देऊन वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका करायला हव्यात. चांगलं दिलं तर प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील. कार्यक्रम वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार हवेत. आधीच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमांचा एक बुके असायचा… वेगवेगळय़ा वयोगटाच्या प्रेक्षकांसाठी. तसं काही असायला हवं. किलबिल, गजरा, युवादर्शन, आमची माती आमची माणसं, ज्ञानदीप, शब्दांच्या पलीकडले, बोर्नव्हिटा क्वीज, रामायण, महाभारत… खूप मजा यायची तेव्हा वेगवेगळे कार्यक्रम बघताना. पुढची पिढी वेब सीरिजमध्ये अडकणार आहे, त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

मी विचारलं की, झिपऱ्या चित्रपट बनवायची कल्पना तुला कशी सुचली? केदार म्हणाला, माझ्या मित्राने अभिजित पेडणेकरने मला ही कादंबरी दिली होती. अरुण साधूंच्या लेखनशैलीने मला प्रत्यक्ष त्या मुलांच्या जगात नेऊन सोडलं होतं. मी कुरिअर कंपनीमध्ये काम करत होतो. येता जाता अशी मुलं मला स्टेशनवर, रस्त्यांवर दिसायची. त्यांचं आयुष्य मी बघायचो, तेव्हा त्यांच्यात मला अरुण साधूंच्या कादंबरीमधल्या त्या व्यक्तिरेखा दिसायला लागल्या होत्या.

जेव्हा काही मित्रांनी तू फिल्म का नाही करत असं विचारलं, तेव्हा मनात पहिला विचार आला तो ‘झिपऱ्या’ या कादंबरीचाच! पण या कादंबरीचा आवाका मोठा होता. खूप लोकेशन्स .. ती देखील लाईव्ह असल्याने खर्च खूप होणार होता. अश्विनी दरेकर आणि रणजीत दरेकर या पुण्याच्या प्रोडय़ुसर्सनी या विषयावर चित्रपट करण्याची तयारी दर्शवली. या दरम्यान मी स्क्रीनप्ले डायलॉग्ज स्वतःच लिहून ठेवले होते. चित्रपटाला निर्माता मिळाला असला तरी मूळ लेखकाची परवानगी महत्त्वाची होती. दीपक करंजीकरांनी माझी लेखक अरुण साधू यांच्याशी भेट करून दिली. अरुण साधू म्हणाले, स्क्रीप्ट वाचतो नंतर, आधी तुझ्या डोक्यातील ‘झिपऱया’ सांग. मी सांगितलं. त्यांना माझे विचार आवडले असावेत, पण त्यांनी होकार दिला नव्हता. अनेक दिग्गजांना त्यांनी आधीच नाही म्हटलं होतं. खूप दिवसांनी त्यांचा फोन आला. म्हणाले, जसं तू लिहिलं आहेस तसंच शूट करणार ना? मला माहीत आहे तू काही काही चेंजेस केले आहेत. मी म्हटलं, तुम्हाला पटले नाहीत का? त्यावर ते म्हणाले छे. उलट मला वाटलं हे मला का नाही सुचलं?

मला कृतकृत्य वाटलं. फिल्मचं शूटिंग म्हणजे एक आव्हानच होतं. कारण लाईव्ह लोकेशनला शूट करायचं होतं. कमीत कमी तंत्रज्ञां बरोबर कमीत कमी शूटिंग सामुग्रीसह शूट करावं लागत होतं. त्याला आम्ही गोरिल्ला शूट म्हणतो. इतक्या मोठय़ा गर्दीला सांभाळणं खूप कठीण असतं. मी म्हटलं, हो दिग्दर्शकाचं काम खूप कठीण असतं. केदार म्हणाला हो त्याला कॅप्टन कूल बनून राहावं लागतं. उन्हातान्हात रेल्वे स्टेशनवर. वस्तीमध्ये शूट करायचो. मेकअप नव्हता. पण मुंबईच्या गर्दीने, कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहकार्यानेच नीट पार पाडू शकलो. अमृता सुभाष, सक्षम कुलकर्णी, प्रथमेश परब अशी चांगली कास्ट होती. कित्येकदा त्यांना खरे बुटपॉलीशर्स समजून काही लोक हटकायचे, अपमान करायचे, पण त्यांनी सगळं सहन केलं. एकदा पोलिसांनी चिडून आमचा कॅमेराच नेला. कारण बघ्यांची खूप गर्दी जमा झाली होती. सगळ्या धर्म पंथाचे लोक गोळा झाले होते. रेल्वे रुळापाशी शूट असल्याने अपघाताची भीतीही होती. या सगळ्या अडचणींवर मात करत शूटिंग पार पडलं . दुर्दैवाने चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच लेखक अरुण साधूंचं निधन झालं, त्यामुळे ते चित्रपट पाहू शकले नाहीत. पण त्यांच्या मिसेस अरुणा साधू म्हणाल्या आज हे असते तर त्यांनाही अतिशय आनंद झाला असता. चित्रपटाला जाणकारांनी नावाजलं, काही पुरस्कारही मिळाले. एक स्वप्न साकार झालं ..आणि अशी अनेक स्वप्नं साकारायची आहेत.

[email protected]