आरोग्याचा गुरुमंत्र, लवकर निजे लवकर उठे- लीना मोगरे

>> राजेश शृंगारपुरे

ज्येष्ठ व्यायामतज्ञ लीना मोगरे. तळवलकरांनंतर लीनांना व्यायाम उद्योगाच्या Pioneer म्हटले तरी वावगे ठरू नये. मुंबईत स्वतःच्या व्यायामशाळेची साखळी उभारणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला उद्योजिका आहेत.

व्यायामशाळेची ‘सुपरवुमन’ म्हणजे लीना मोगरे. हिंदुस्थानात फिटनेस एज्युकेशन अभ्यासक्रम सुरू करणाऱया पहिल्या महिला फिटनेस गुरू तसेच पहिली ‘वुमन पर्सनल ट्रेनर’ म्हणून त्यांनी बहुमान मिळविला. मात्र हा प्रवास तितका सोपा नाही. फिटनेस या विषयाची खरी आवड, सखोल ज्ञान आणि आत्मविश्वास यामुळे फिटनेस क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करीत प्रगतीचा उच्चांक गाठला. 1994 मध्ये ‘लीना मोगरेज फिटनेस ऍकॅडमी’ सुरू केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यापासून पर्सनल ट्रेनिंगला सुरुवात करीत आज सिनेसृष्टीतील तमाम कलाकारांच्या फिट ऍण्ड फाइन व्यक्तिमत्त्वामागील त्या केंद्रबिंदू ठरल्या.

पहिल्यापासून सायकलिंगची खूप आवड जरी असली तरी खऱया अर्थाने व्यायामशाळेकडे पावले वळवली ती लीनाताईंच्या आईमुळे. ‘फूड सायन्स आणि न्यूट्रिशियन’ या विषयातून एमएस्सी पदवीधर झाल्या. लग्नानंतर प्रसूतिकाळात त्यांचे वजन 81 किलोपर्यंत झाले. प्रथमदर्शनी त्यांच्या फिटनेसबाबत कौटुंबिक सदस्यांनी शंका व्यक्त केली. अशावेळी त्यांच्या आईने एरोबिक हा व्यायाम प्रकार सुरू करण्याचा सल्ला दिला. लीनाताईंनी आव्हान स्वीकारले. एरोबिक आणि आहार नियोजन करून वर्षभरात स्वतःचे वजन कमी केले. अशा प्रकारे एरोबिकने फिटनेस कारकीर्दीचा पाया रचला आणि पुढे ‘टोटल फिटनेस… लीना मोगरे’ हे मराठी अनुवादित पुस्तक प्रकाशित करून फिटनेस कारकीर्दीच्या मनोऱयावर कळस चढवला. लीना मोगरे हे मराठमोळं नाव हिंदुस्थानभर गाजलं.

हवाई येथे राहणाऱया वयोवृद्ध महिला रूथ हेडरिच या लीनाताईंसाठी खूपच प्रेरणादायी आहेत. रूथ हेडरिच यांनी ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारावर व्यायाम आणि आहार नियोजन याच्या मदतीने मात केली. आजारमुक्त झाल्यावर त्यांनी एका वर्षात 12 मॅरेथॉन स्पर्धांत भाग घेतला. तसेच ‘आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धा’ तेही वयाच्या 50-55 व्या वयात ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’वर धावल्या. रूथ हेडरिच यांच्या फिटनेस क्षमतेने लीनाताईंना विशेष प्रभावित केल्याचे त्यांनी सांगितले.

माझा व्यायाम म्हणजे खूपसं वेट ट्रेनिंग
माझे फाऊंडेशनच आहे वेट ट्रेनिंग, असे सांगत लीनाताई म्हणाल्या, वेट ट्रेनिंगसाठी वयाचे बंधन नाही. उलट वयोमान वाढल्यावर वेट ट्रेनिंग जास्त महत्त्वाची. महिलांच्या बाबतीत प्रिमोनोपॉझ, मोनोपॉझ, कॅल्शियम, हाडे मजबुती अशा आरोग्यविषयक तक्रारींवर ठोस उपाय. त्यानंतर पॉवर योगा करणे किंवा कार्डिओ करणे हे हिताचे ठरते. जेव्हा तुम्ही वर्कआऊट करता, एक्सरसाइज करता तेव्हा शरीरातील फीलगुड हॉर्मोन रिलिज होतात. त्यामुळे ‘यू फील व्हेरी पॉझिटिव्ह’. तसेच निरोगी त्वचा, लांब केस, मानसिक तजेला, तीव्र कार्यक्षमता, प्रसन्न वृत्ती, अकाली येणारे वृद्धत्व अशा सगळय़ा बाबतीत वेट ट्रेनिंग उपयुक्त ठरते.

बॉडी बिल्डिंग आणि मसल बिल्डिंगसारखेच आहे. विज्ञान शास्त्रात त्याला ‘लीन मसल टिश्यू बिल्डिंग’ असे म्हणतात. मानवी शरीरात बेसल मेटाबॉलिक रेटस् (Basal metobolic rate) असतात. (म्हणजे श्वासोच्छ्वास आणि शरीर ऊबदार ठेवण्यासारखी महत्त्वपूर्ण कार्ये राखण्यासाठी शरीर उर्वरित असताना ऊर्जेचा वापर करणे), तर जसजसे वय वाढते साधारण 30 वर्षे वयानंतर बेसल मेटॉबॉलिक रेट कमी होतो. म्हणूनच तुम्हाला स्वतःच लक्ष दिलं पाहिजे की, तुम्ही काय खात आहात, कोणत्या वेळेत खात आहात, नियमित व्यायाम करणे… असे अगदी सोपे आहे हे सगळं. मी नियमित व्यायाम करते. पूर्वी आठवड्यातून एखादा दिवस आराम असायचा. मात्र आता माझे वय 57 वर्षे आहे. तेव्हा आठवडय़ातून दोन वेळा विश्रांती घेते. म्हणजे या वयात शरीराला पूर्ववत होण्यास तितका वेळ लागतो. मात्र नियम पक्का, सकाळी लवकर उठून अनशेपोटी व्यायाम संपवणे.

संतुलित आहार अत्यावश्यक
लीनाताई यांच्या मते खाण्यापिण्याबाबत आपण स्वतःच स्वतःवर लक्ष ठेवले पाहिजे. ते फायदेशीर ठरते. त्या शुद्ध शाकाहारी आहेत. दूध आणि दूधयुक्त पदार्थ त्या खात नाहीत. 80 टक्के डाएट आणि 20 टक्के एक्सरसाइज असं समीकरण त्या मांडतात. महाराष्ट्रीयन असल्याचा मुख्य फायदा तो म्हणजे महाराष्ट्रीयन व्यंजने, खाद्यपदार्थ, मिष्ठान्ने ही प्रमाणित जिन्नस वापरून बनविलेली असतात. तेल, तिखट प्रमाणित असते. तसेच कडधान्य, हिरव्या भाज्या, भाकरी अशा प्रथिनेयुक्त सकस आहाराने महाराष्ट्रीय थाळी सजते. तसेच रोज सकाळी भरपेट न्याहारी कराल, दुपारी ताक घ्याल, वरणभातासोबत साजूक तूप घ्याल तर शरीरास खूप पौष्टिकता मिळते.

लीनाताईंचा आहार खालीलप्रमाणे – सकाळचा नाश्ता – थालीपीठ किंवा साबूदाणा खिचडी किंवा इडली-डोसा किंवा कांदा पोहे. मध्यान्हापूर्वी – एखादे फळ किंवा उकडलेले रताळे, दुपारचे जेवण – भाजी-भाकरी, उसळ, वरणभात, एखादी पालेभाजी आणि सलाड. पूर्वसंध्येला – हलकासा आहार, रात्रीचे जेवण – 8.30 ते 9 वाजेपर्यंत एक भाकरी आणि भाजी. तसेच एखाद्या वेळेस गोड पदार्थही खाते. मात्र ग्लुटेनयुक्त पदार्थ वर्ज्य. लीनाताईनी आहाराबाबत एक मुख्य गोष्ट सांगितली, ती म्हणजे ऑपिटाइट (appetite) आणि हंगर (hunger). भूक आणि भूक लागणे यातील फरक समजून घ्या. आजी-आजोबांच्या काळातील खाण्यापिण्याच्या शिकवणीचा आज फेरविचार आणि अनुकरण होत आहे हे उत्तम. शिवाय नव्या पिढीमध्येही व्यायाम व आहाराविषयी सर्तकता दिसून येते हे समाधानकारक आहे.

आताच्या धावपळीच्या युगात सर्वत्र Food App द्वारे ऑर्डर करणे आणि Redymade Food खाण्यावर भर दिसतो. इन्स्टंट फूड हे सहज, सोपे आणि सोयिस्कर वाटते. मात्र त्यापेक्षा प्रत्यक्षात जेवण शिजवून खाणे हे नेहमीच आल्हाददायक आणि पौष्टिक असते. म्हणून कुकिंग नेसेसरी. घरगुती शिजवून अन्न खाल्ल्याने मीठ, तेल, तिखट यावर नियंत्रण राहते, बाजारातल्या ताज्या भाज्या घेऊन या, त्या शिजवून खा. म्हणजे योग्य व्हिटॅमिन, मिनरल्स अशी पोषक द्रव्ये शरीरास मिळतील.

लीनाताई फिटनेस मंत्र – आपले शरीर म्हणजे आपण वापरतो त्या सर्वोत्तम ऍक्सेसरीसारखे आहे. लीनाताई यांच्या मते, एखाद्या दागिन्याने नटलेल्या आणि भरजरी वेशभूषा केलेल्या बेढव शरीरयष्टीच्या व्यक्तीपेक्षा साध्या वेशभूषेतील सुदृढ आणि सुडौल शरीरयष्टीची व्यक्ती ही जास्त आकर्षक आणि लक्षवेधी ठरते. मग ती स्त्री असो वा पुरुष. सुदृढ-सुडौल शरीर हाच खरा मौल्यवान दागिना आहे जो तुम्ही 24 तास मिरवू शकता. म्हणून शरीराची निगा राखा.

आताच्या पिढीची जीवनशैली खूपच वाईट आहे. ‘लवकर निजावे… लवकर उठावे… तयासी आरोग्य उत्तम लाभावे’ या गुरुजनांच्या शिकवणीचा पुरता विसर पडला आहे. परिणामी विविध विकार आणि अकाली वार्धक्य पदरी पडत आहे. स्त्रियांमध्ये 10 पैकी 7 जणींना PCOD चा त्रास उद्भवत आहे. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी निद्रा या गोष्टी अंगीकारल्या तर सहजच सर्व व्याधींतून मुक्तता मिळेल. फिटनेसबाबत मुलांची खास कानउघाडणी करण्याच्या सुरात लीनाताई म्हणतात की, स्टेरॉईड किंवा सप्लिमेंट यांचा वापर करणे घातक आहे. त्याबाबत सखोल अभ्यास आणि परिणामांची माहिती करून घेणे योग्य आहे. तसेच सिक्स पॅक्स असणे हे निरोगीपणाचे लक्षण नाही. शरीराला वयोमानाप्रमाणे उचित फॅटस् असणे गरजेचे आहे. मसलशेप दिसण्याकरिता कमी पाणी पिणेही घातक आहे. दैनंदिनी 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. नुसतं प्रोफेशनल बॉडीबिल्डर यांचे अनुकरण करणे म्हणजे स्वतःच्या शरीराशी आणि पर्यायाने जीवाशी खेळ खेळणे होय. मुळात फिटनेसबाबत सर्व गोष्टी समजून घेणे गरजेचे.

लीना मोगरे यांच्यासारख्या फिटनेस एक्सपर्टकडून आज फिटनेसबाबत विविध पैलू उलगडले. फिटनेस क्षेत्रात उक्रांती घडविणाऱ्या लीनाताई यांच्या भावी कारकीर्दीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

[email protected]