माझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम

मधुरा आणि अभिजित साटम… पत्नी, युवानची आई या साऱ्या भूमिकांबरोबरच मधुरा अभिजितची सख्खी मैत्रीण आहे.

 • मधुचंद्र म्हणजे – मधुचंद्र म्हणजे नवरा-बायकोने एकत्र कुठेतरी बाहेर जाणे. एकमेकांसोबत वेळ घालवणे. गुणवत्तापूर्ण वेळ देणे.
 • फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – मी हिंदुस्थान फारसा फिरलेलो नाही, परदेशात बऱ्याच ठिकाणी फिरलो. त्यामुळे आम्हाला दोघांनाही हिंदुस्थान फिरायचे होते. दोघांचेही याबाबत एकमत झाले आणि आम्ही दक्षिणेला दहा – बारा दिवसांसाठी फिरायला गेलो होतो. निसर्गाच्या सानिध्याबरोबरच तिथल्या संस्कृतीचे दर्शन घेता आले.
 • आवडलेले ठिकाण? – पूर्ण दक्षिणच सुंदर आणि प्रेक्षणीय आहे. पण आम्हाला अल्लेप्पी येथे हाऊसबोटमध्ये आवडले होते. तिथे आम्ही दोन दिवस राहिलो होतो. वेगळा अनुभव होता. मी बोटीमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला उत्सुकतेपोटी जाऊन बसलो होतो. ते बोट कसे चालवतात, रात्री मध्ये कुठे बोट थांबवतात हे पाहायला फार गंमत वाटत होती,
 • ठिकाणाचे वर्णन- एक तर दक्षिणेला पूर्ण निसर्गाने वेढलेले आहे. तिथली माणसं अतिशय शिस्तप्रिय आहेत. त्यांनी तो प्रांत चांगल्या पद्धतीने विकसित केलाय. तिथल्या लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान आहे. एवढेच नाही तर तिथल्या लोकांनी आपली संस्कृती उत्तम पद्धतीने जतन केली आहे.
 • मधुचंद्रासाठी गेल्यावर तिथे केलेली शॉपिंग – मी फार मोजकी शॉपिंग केली होती. पण मधुराने भरपूर शॉपिंग केली होती. मधुराने तिथल्या पारंपारिक साडय़ा, दागिन्यांची खरेदी केली होती. माझ्यासाठी सगळे मधुरा घेऊन येते आणि मी बाहेर गेलो की मधुरासाठी मी शॉपिंग करतो.
 • काही खास क्षण – चहाच्या मळ्यातील रस्त्यांमधून जात असताना खडकाळ रस्ता असल्याने आमची जिप्सी गाडी घसरत होती. मग आम्ही त्या ड्रायव्हरला मागे बसवले आणि मी-मधुरा पुढे बसलो. मी निसर्गाचा आनंद लुटत ड्रायव्हिंग करत होतो. असे रस्ते आपल्याकडे नाहीत.दोघांनाही खूप मजा आली होती.
 • मधुचंद्र हवाच की… – मधुचंद्राची संकल्पना काय आहे त्यावर अवलंबून आहे. मधुचंद्र म्हणजे लग्नानंतर हनिमूनला जाणे. एकमेकांना किमान आठ-दहा दिवस कुटुंबापासून दूर वेळ घालवता यावा. एकमेकांना समजून घेणं. एकमेकांची ओळख होणे. त्यामुळे मधुचंद्र हवाच.
 • एकमेकांशी नव्याने ओळख – जास्त चांगली झाली. तसे तर आम्ही कॉलेजपासून एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण होतो. त्यानंतर पाच-सहा वर्षे आमचे अफेअर होते आणि त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. पण आजही आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. आमच्यात चांगली मैत्री होती म्हणूनच आमचं अफेअर टिकलं आणि आम्ही लग्न केलं. लग्नानंतर आमच्या प्राथमिकता बदलल्या असल्या तरी मैत्री आहेच. म्हणून आम्ही आजही एकमेकांसोबत टिकलो आहोत. आता युवान आमची प्राथमिकता आहे. त्याच्यासोबत असताना आम्ही पालकाच्या भूमिकेत असतो आणि युवान झोपला की आम्ही पुन्हा एकमेकांना वेळ देतो.
 • तिथली आठवण – मधुराने काढलेले तिथे गमतीदार फोटो. आम्ही मुन्नारवरून जात असताना तिथे एका ठिकाणी गेलो. तेथे आम्ही लोकल गाईड घेतला होतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या चित्रपटांचे शूटिंग झाले होते. मधुराने ते ठिकाण इतके आवडले होते की तिने वेगवेगळ्या अँगलने गमतीदार फोटो काढले होते. ते फोटो आज पाहिल्यावर भरपूर हसायला येते.
 • तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – लोकल फिश.
 • अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिजम – अनोळखी ठिकाणी रोमॅन्टिजम जास्त आवडेल. त्यानिमित्ताने काहीतरी नवीन पाहायला मिळते, तिथली संस्कृती अनुभवता येते.
 • मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – ती समजूतदार जोडीदार आहेच, पण त्याचबरोबर ती माझी मैत्रीण, माझी फिलोसॉफर, माझी गाईड, त्याचबरोबर माझ्या मुलाची आई अशा सगळ्या भूमिका एकाचवेळी ती अगदी सहजतेने पार पडते. मी खूप कमी बोलतो, पण मधुरामुळे मी बोलायला लागलो.