हाडाचा दिग्दर्शक

>>रोहिणी निनावे

मंदार देवस्थळी. मालिका… चित्रपट… मग निर्मिती… असा मोठा पल्ला. दिग्दर्शन हा त्याचा आत्मा. अजूनही ऍक्शन असे म्हटल्याखेरीज मंदारचा दिवस संपत नाही.

‘आभाळमाया’, ‘अवघाचि संसार’, ‘वादळवाट’, ‘होणार सून मी या घरची’, ‘मन हे बावरे’ अशा एकाहून एक सरस मालिका देणाऱया मंदार देवस्थळीची भेट घ्यायचं यावेळी मी ठरवलं. आम्ही दोघेही कांदिवलीतच राहत असल्याने ठाकूर व्हिलेजच्या ‘हाय ऑन टी’ या आगळ्यावेगळ्या कॅफेमध्ये आम्ही भेटलो. शूटिंग आटोपून मंदार अगदी वेळेत आला . ‘अवघाचि संसार’ या मालिकेच्या वेळी निर्माते शशांक सोळंकी यांच्या ऑफिसमध्ये मंदारची आणि माझी भेट झाली होती. ‘अवघाचि संसार’ची गोष्ट भावनापूर्ण होती. आणि मंदारने ती गोष्ट खूप हळुवारपणे प्रभावी रीतीने मांडली होती. त्यात एक संवाद मी लिहिला होता, ‘आईने नुसती पाण्याला फोडणी दिली तरी त्याला अमृताची चव येते.’ मंदारने आवर्जून कौतुक करून सांगितलं होतं की खूप छान आहे हे वाक्य. त्यामुळे तो कलाकारांचा, लेखकांचा आवडता दिग्दर्शक आहे.

बेसिल ग्रीन टीचा आस्वाद घेत आम्ही बोलायला सुरुवात केली. मंदार सांगायला लागला. तसं या क्षेत्रात आमच्या घरातलं कुणीच नव्हतं. बाबा पोस्टामध्ये होते आणि आई बॉम्बे डाईंगमध्ये नोकरी करत होती. मी शारदाश्रमला शिकत होतो. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी माझ्याच बॅचचे.! मलाही क्रिकेटचा शौक होता. पण सातवीच्या स्कॉलरशिपच्या अभ्यासामुळे मी क्रिकेट सोडलं आणि ते दोघे क्रिकेट खेळत राहिले. रेस्ट इज हिस्ट्री. मंदार हसत हसत बोलला.

मी म्हटलं, मग या क्षेत्राविषयी आवड कशी निर्माण झाली? तो म्हणाला, आई आणि वडील दोघांनाही नाटक-चित्रपट बघायची हौस असल्याने मी खूप नाटक चित्रपट बघितले. चौथीपासूनच मी शाळेच्या नाटकांमधून काम करायला सुरुवात केली होती, आई वडिलांचं प्रोत्साहन होतंच. एक गंमतशीर आठवण म्हणजे, मी चार वर्षांचा होतो तेव्हा ‘शबरीची बोरे’ या नाटुकलीमध्ये रामाचा रोल करत होतो, पण मला तो विग बोचत असल्याने काम करायला साफ नकार दिला. रडारड केली. मग बाबा आले. त्यांनी फक्त एकदाच जरबेने माझ्याकडे बघितलं आणि मग चुपचाप मी काम केलं. पुढेही करत राहिलो. पण आवडीने.

मात्र पुढे याच क्षेत्रात काम करायचं ठरवलं. घरूनही काही विरोध झाला नाही. मी दहावीमध्ये असताना ‘चक्षू गिरगाव’ नावाच्या संस्थेबरोबर काम करायला लागलो. पुढे अरुण गोखले या कॅमेरामनबरोबर माझी ओळख झाली आणि मला ‘दिनमान’ या मालिकेत रेणुका शहाणेच्या मित्राचं काम करायची संधी मिळाली. त्या वेळेस मी बघितलं, की मालिकेचं शूटिंग कसं होतं. दिग्दर्शक हा काय प्राणी असतो. कसं सेटवर त्याचंच राज्य असतं. मलाही रुल करायला आवडतं. अर्थात पॉजिटीव्ह अर्थाने. तेव्हा मला हे काम आवडलं आणि मी त्याच मालिकेमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करायला लागलो. माझ्या दिग्दर्शकीय करिअरला खऱ्या अर्थाने वळण मिळालं ते ‘आभाळमाया’ या मलिकेमुळे.

director-mandar

तेवढय़ात मंदारच्या बायकोचा अनुष्काचा फोन आला. त्याचा फोन झाल्यावर मी म्हटलं, तू लग्न केलंस तेव्हा तू स्थिरस्थावर होतास का? मंदार म्हणाला, लग्न झाल्यावर खऱ्या अर्थाने मी एस्टाब्लिश झालो. अनुष्काही याच क्षेत्रातली असल्याने तिने मला चांगली साथ दिली. मी म्हटलं आणि आई, वडील? मंदारने सांगितलं हो जेव्हा मी या क्षेत्रातच करिअर करायचं ठरवलं, तेव्हा बाबा म्हणाले, आवड आहे वगैरे ठीक आहे, पण पोटापाण्याचं काय? मी म्हटलं, मला तीन वर्ष द्या. यश मिळालं तर ठीक, नाहीतर नोकरी करेन. पण काम मिळत गेलं.

मी विचारलं, या सगळ्या प्रवासात काही चढउतार आले का? काही कटू अनुभव? मंदार म्हणाला, सुदैवाने नाही आले. जे जसं समोर आलं, आत्मविश्वासाने करत गेलो. जे करायचं ते चांगलंच असं ठरवलं होतं. सुदैवाने चांगले लेखक, चांगले कलाकार भेटले, मात्र एक गोष्ट खटकत होती, की काही निर्माते बजेट कमी आहे असं म्हणत अनेकदा काही गोष्टीत तडजोड करत. अशावेळी वाटायचं, आपण असतो तर… निर्माता बनावं अशी इच्छा होती, पण हिंमत होत नव्हती. ती हिंमत माझ्यात निर्माण केली अभय परांजपे आणि तेजेंद्र नेसवणकर म्हणजेच तेजा यांनी! हिंमत करून स्वतःचं ‘टीम वर्क’ या नावाने प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. आणि ‘टीमवर्क’ची पहिली निर्मिती होती ‘होणार सून मी या घरची’. ही मालिकाही खूप गाजली. आजवर मी पावणे सहा हजार एपिसोड केले आहेत.

मी म्हटलं, खऱ्या अर्थाने ही यशोगाथा आहे. हात लावीन त्याचं सोनं करणं म्हणतात ते तुझ्या बाबतीत खरं ठरलं आहे. मी म्हटलं, दिग्दर्शकाचं नेमकं काम काय आहे, असं तुला वाटतं? मंदार म्हणाला, लेखकाने लिहिलेली गोष्ट अधिक प्रभावीपणे मांडणं हे दिग्दर्शकाचं काम असतं. बरेचदा हे साधेपणानं मांडणंच गुंतागुंतीचं ठरतं.

मी म्हटलं, आता तू निर्माता बनला आहेस तर दिग्दर्शन सोडलं आहेस का? मंदार म्हणाला छे… रोज ‘ऍक्शन’ म्हटल्याशिवाय झोप लागत नाही. आम्ही दोघे हसलो. म्हटलं, हाडाचा दिग्दर्शक आहेस तर…! मी म्हटलं, पण आता तू इतर दिग्दर्शकांवर तुझ्या मालिका सोपवतोस, तर कधी असं वाटतं का की, मी दिग्दर्शित केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. मंदार म्हणाला, नाही… तसं माझं आणि दिग्दर्शकांचं बोलणं होतच असतं, पण प्रत्येक दिग्दर्शकाची एक व्हिजन असते, एक पद्धत असते, तेव्हा मी त्यांना त्यांच्या पद्धतीने करुन देतो. शेवटी विश्वास टाकायलाच हवा. आवर्जून एक गोष्ट सांगाविशी वाटते. मला संगीतात विशेष रस असल्याने माझ्या प्रत्येक मालिकेमध्ये मी नवीन गाणी देत असतो. त्यासाठी वेगळं चित्रपटासारखं शूटिंग करून. 17 गाणी आजपर्यंत केली आहेत.

मी म्हटलं, तुझ्या मालिकांमध्ये विषयाचं वैविध्यही दिसतं. वेगळे प्रयोग दिसतात. ‘होणार सून’मध्ये सहा सासवा होत्या, ‘माझे पती’मध्ये पुरुष स्त्री रूपात वावरतो, ‘गुलमोहर’मध्ये विविध प्रेमकथा होत्या, ‘मन हे बावरे’मध्ये नायिका विधवा दाखवली आहे. मंदार म्हणाला, विषयातला वेगळेपणा मला भावतो. दर वेळेस नवीन गोष्ट सांगावीशी वाटते. मी म्हटलं, तुझी पहिलीच निर्मिती असलेला ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट मात्र खूपच गाजला. पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, ही केवढी गौरवाची गोष्ट! मंदार म्हणाला, हो… प्रसाद ही गोष्ट माझ्याकडे घेऊन आला आणि चिन्मयने जयवंत दळवींच्या गोष्टीचं चित्रपटात रूपांतर करताना अक्षरशः सोनं केलं. मी म्हटलं, यातही एक प्रयोग होता. चित्रपट ब्लॅक ऍण्ड व्हाइटमध्ये होता. त्यावर तो हसला. म्हणाला, प्रयोग मला मानवतात.

rohini-mandar

मी विचारलं, पुरस्कारांबद्दल तुझं काय मत आहे? मंदार म्हणाला, आपल्या क्षेत्रात ज्या प्रमाणात काम चालू आहे, त्या मानाने खूप कमी पुरस्कार आहेत काही वाहिन्यांचे फक्त स्वतःचे पुरस्कार असल्याने, त्यात इतर वाहिन्यांच्या मालिकांना भाग घेता येत नाही. तसंच पुरस्कारांमध्ये कलाकारांना पुरस्कार देण्यावर भर असतो, दिग्दर्शक, लेखक यांना पुरस्कार नसतो. काही लोकांना कथा, पटकथा, संवाद हे तीन भाग असतात हे ठाऊक नसतं. फक्त मालिकांसाठी वेगळे पुरस्कार हवेत, ज्यात सगळ्या वाहिन्यांच्या मालिकांचा सहभाग असावा.

मी म्हटलं, या क्षेत्रात एखादी गोष्ट बदलाविशी वाटली तर ती कुठली? मंदार हसत म्हणाला, वेळ.. मालिका क्षेत्रात काम करणाऱयांना दिवसाला 48 तास हवेत असं वाटत असतं. मंदार म्हणाला, अधिक वेळ मिळाला तर आपण जे करतो आहोत, त्यावर विचार करायला वेळ मिळेल आणि अधिक चांगलं काही देता येईल.

मी म्हटलं, हल्ली किती मालिका येताहेत वेगवेगळ्या चॅनल्सवर, मोठमोठे लेखक आणि दिग्दर्शक करताहेत काम. हिंदी चित्रपट करणारे… हे बघता टीव्हीवरच्या मालिका बंद होतील की काय अशी भीती काही जणांना वाटते, ती कितपत खरी वाटते? मंदार म्हणाला, मला नाही वाटत… आपल्या मालिकेमधले विषय, त्यातल्या व्यक्तिरेखा आणि अशा नवीन मालिका यातल्या आशयामध्ये खूप फरक आहे. आपली संस्कृती आणि त्यात दाखवल्या जाणारी संस्कृती यात फरक आहे. पण पुन्हा एक वेगळा प्रयोग म्हणून या वाहिन्यांसाठी वेगळ्या पद्धतीच्या मालिका करायला मला आवडेल.

मी म्हटलं, आता पुढे काय आणखी स्वप्नं आहेत? मंदार म्हणाला, असेच चांगले चित्रपट करण्याचा आणि त्यात भूमिका करण्याचंही! जाता जाता सांगायचं म्हणजे मंदारने मालिका करून रेन्जरोवरसारखी आलिशान गाडी घेतली आहे. उदयोन्मुख दिग्दर्शकांसाठी हा एक आदर्श आहे, की चांगलं दर्जेदार आणि प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्ही अशक्य स्वप्नही शक्य करून दाखवू शकता!

[email protected]