मनोरंजनाच्या नव्या वाटा

4

भक्ती चपळगावकर

स्टार, सोनी, फॉक्स, बीबीसी अशा बड्या मीडिया कंपन्यांत मोठय़ा पदांवर काम केलेले नचिकेत पंतवैद्य माध्यम क्षेत्रातलं एक बडं नाव. सध्या नचिकेत बालाजी टेलिफिल्मच्या ऑल्टबालाजीचे सीईओ म्हणून काम करत आहेत. टीव्हीवरचे मनोरंजन इंटरनेटच्या माध्यमाने उपलब्ध करून देणारी ही कंपनी. घरोघरी संध्याकाळी सहाला सुरू होणारा टीव्ही रात्री बाराला बंद होतो. टीव्हीच्या राज्याला आव्हान देणाऱ्या मोबाईलवरच्या मनोरंजन क्रांतीची माहिती करून घेण्यासाठी नचिकेत पंतवैद्य यांच्याशी मारलेल्या या गप्पा…

 • टीव्हीवरून होणारे मनोरंजन आता मोबाईल फोनवर उपलब्ध होतंय. मनोरंजनाच्या माध्यमात होणाऱया या मोठ्या बदलाबद्दल थोडी माहिती द्या. ओव्हर द टॉप एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म म्हणजे काय?
  – आपल्याला टीव्ही बघायचा असेल, तर आपल्याला टीव्हीच्या यंत्राबरोबरच केबल ऑपरेटर, सेटटॉप बॉक्स लागतो. त्यासाठी महिन्याला पैसे द्यावे लागतात. ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म म्हणजे या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन डायरेक्ट इंटरनेटच्या माध्यमातून सिरियल्स किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम बघणं. आज आपण व्हॉट्सऍपवरही छोटे छोटे व्हिडीयो बघतो. पण त्याही पुढे जाऊन सामान्य माणसाला आता मोबाईलवरही मनोरंजनात्मक कार्यक्रम उपलब्ध आहेत. हा बदल पाश्चिमात्य देशात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. याला कॉर्ड कटिंग म्हणतात. त्यांचं एंटरटेनमेंटचं दुकान इंटरनेटवरच आहे. आपल्याकडे आज मोठय़ा प्रमाणावर लोक इंटरनेटवर शॉपिंग करतात. ते करताना त्यांना मोठे डिस्काऊंट वगैरे पण मिळत असतात. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीही लोकांना फार पैसे मोजावे लागत नाहीत. दुसरं म्हणजे तुम्ही केबलवाल्याला महिन्याला तीनचारशे रुपये देता. पण दिसणारे किती चॅनल्स तुम्ही बघता? एवढय़ा गर्दीतल्या चॅनल्सपैकी फक्त पाच सहा चॅनल्स तुम्ही बघता. मग तुम्हाला ज्या चॅनल्सशी सोयरसुतक नाही, असे चॅनल्स तुम्ही का बघायचे? लोकांना फक्त त्यांच्या पसंतीचे कार्यक्रम इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. आता तुम्ही म्हणाल की, इंटरनेटचे पैसे मोजावे लागतातच ना, पण आता अनेक कंपन्या स्वस्तात इंटरनेट उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे याचा खूप चांगला परिणाम या नव्या माध्यमावर होईल असा विश्वास वाटतो.
 • ऑल्टबालाजीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद आहे? बालाजी म्हटलं की, सोप मालिका असं स्वरूप डोळ्यासमोर असतं. या माध्यमात तुम्ही कोणत्या प्रकारच्या मालिकांना दाखवत आहात?
  – बालाजी कौटुंबिक मालिका मुख्यत्वे बनवते. पण ज्या चॅनल्सवर त्या दाखवल्या जातात, त्यांच्याकडे त्यांच्या प्रसारणाचे सर्वाधिकार असतात, त्यामुळे आम्ही त्या बनवलेल्या जरी असल्या तरी त्या आमच्या मालकीच्या नसतात. आता यापुढे आमचे शोज आमच्या मालकीचे असतील. इंटरनेटच्या माध्यमातून त्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. बरं, या मालिका बालाजी टेलिफिल्मच बनवते असं नाही. उलट इथे दाखवल्या जाणाऱया सत्तर टक्के मालिका बाहेरच्या निर्मात्यांनी बनवलेल्या आहेत. ऑल्टबालाजी हे इंटरनेटवरचे टेलिव्हिजन चॅनल आहे. पण यात फरक असा आहे की यावर जाहिराती नाहीत. वर्षाला तीनशे रुपये भरून याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. यावरच्या सीरियल्स तुम्हाला फक्त इथेच बघता येतील. शिवाय बालाजी टेलिफिल्म्स आधी हिंदुस्थानी कंपन्याना सीरियल्स पुरवत होती आता ती जागतिक स्तरावर पोचली आहे. पंचाहत्तरहून अधिक देशांत आमचे ग्राहक आहेत.
 • नव्या युगाबरोबर नव्या मनोरंजन माध्यमाची ही नांदी आहे.
  – नक्कीच. पण त्यातही या माध्यमासाठी नवे कार्यक्रम बनणं महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी टीव्हीचे जुने कार्यक्रम दाखवले जात आहेत. पूर्णतः नवे कार्यक्रम देणे आमचा उद्देश आहे. सूरत, जयपूर, कोल्हापूर, सातारा यासारख्या शहरांतल्या प्रेक्षकांसाठी आम्ही कार्यक्रम बनवतो. आम्ही हिंदुस्थानी भाषांत कार्यक्रम निर्मिती सुरू केली आहे. हिंदी आणि तामीळमधल्या सीरियल्स सुरू आहेत. यापुढे मराठी, गुजराती, पंजाबी आणि बंगालीत कार्यक्रम सुरू होत आहेत. टेलिव्हिजन मालिका मुख्यतः स्त्रियांसाठी असतात. मालिका बनवताना आम्ही पुरुषांचाही विचार करतो. शिवाय मालिका शंभर दीडशे एपिसोड्सपर्यंत न खेचता, पंधरा वीस एपिसोड्समध्ये मालिका संपते.
 • टेलिव्हिजनवर सीरियल बघणारे तुमच्या माध्यमाकडे वळत आहेत का?
  – नक्कीच. अजून दोन महिनेही झाले नाहीत, पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बालाजी एंटरटेनमेंट म्हणजे फक्त इंग्रजी शोज असं काहींना वाटतं, पण आम्ही या समजाच्या विरोधात आहोत. आपण का म्हणून आपल्या भाषेत सीरियल्स दाखवायचा नाहीत? लोकांना आपल्या भाषेत मनोरंजन हवंय. ओटीटी प्लॅटफॉर्म बरेच आहेत, पण हिंदुस्थानी भाषांत नवे कार्यक्रम सादर करणारे सध्या तरी फक्त आम्ही आहोत.
 • टीव्हीवर एक मालिका अर्धा तास चालते. बालाजी माध्यमांवर लोक किती वेळ एक एपिसोड बघतील?
  – गेल्या सहा-आठ आठवडय़ांत आम्हाला जो, रिसर्च डेटा आला आहे, त्यावरुन सांगतो की मोबाईलवर लोक पाचेक मिनिटं बघतील, नंतर कंटाळतील हा समज चुकीचा आहे. पण त्यासाठी मालिका चांगली असली पाहिजे. मोबाईलवर सिनेमे लोक बघतात. पण त्या पायरेटेड कॉपी असतात. देशात सात आठ कोटी लोक मोबाईलवर व्हिडीयोज बघतात. या वर्गासाठी चांगले कार्यक्रम उपलब्ध करून दिले तर ते नक्कीच मोबाईलवर हे कार्यक्रम बघतील.

[email protected]