एकमेकांना वेळ देणं हेच दिवाळीचं गिफ्ट- मयुरी वाघ आणि पियुष रानडे

>> रश्मी पाटकर, मुंबई

अभिनेता पियुष रानडे आणि मयुरी वाघ हे टीव्हीवरचं लाडकं कपल यंदा फेब्रुवारी महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकलं. अस्मिता या झी मराठी वरच्या मालिकेतही त्यांनी पतीपत्नीची भूमिका साकारली होती. सध्या पियुष आणि मयुरी दोघेही ‘झी युवा’वरच्या ‘अंजली’ आणि ‘लव्ह लग्न लोच्या’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यंदा हा त्यांच्या पहिला दिवाळसण आहे. त्यानिमित्त सामना ऑनलाईनने त्यांच्याशी साधलेला संवाद-

१. यंदाचा तुमचा पहिला दिवाळसण आहे. त्यासाठी काही विशेष प्लानिंग आहे का?

पियुष- हो. मला दिवाळी माझ्या घरच्यांसोबत साजरी करायला आवडते. कामानिमित्त मुंबईला असलो तरी मी मूळचा बडोद्याचा. त्यामुळे यंदा जोडीने बडोद्याला जाऊ. सगळं कुटुंब सोबत असेल. तिथे सगळ्यांसोबत दिवाळी साजरी करू. मी इतर सण माझ्या मित्रांसोबत साजरे करतो. पण, दिवाळी नेहमीच कुटुंबासोबत साजरी करण्याचा माझा आग्रह असतो. सध्या मी आणि मयुरी दोघंही आपापल्या कामात इतके बिझी आहोत की एकमेकांना वेळच देऊ शकत नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत कोणत्याही वस्तूपेक्षा मी तिला माझा वेळ देईन. अर्थात पाडव्याला मी तिला एक सरप्राईज देणार आहे.

मयुरी- आम्ही आमच्या पहिल्या दिवाळसणाला बडोद्याला जाणार आहोत. पियुषचे आई-बाबा आणि एकुणच माझ्या सासरची मंडळी खूप उत्साही आहेत. त्यामुळे मीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. गेल्या वर्षी फक्त मी आणि माझ्या घरातले अशी दिवाळी होती. यंदा माझ्या या नवीन कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार आहे. भाऊबीजेला पुण्यात माझ्या भावाकडे जाऊ. तिथेही धमाल करू.

piyush-mayuri-5

२. दिवाळीशी संबंधित तुमची एखादी विशेष आठवण आहे का?

पियुष- मी लहान असताना खूप खोडकर होतो. अर्थात आताही आहेच. पण, दिवाळीच्या वेळी तर मी भयंकर उपद्व्याप केले आहेत. मला आठवतं, मी चौथी-पाचवीत होतो. तेव्हा मला दिवाळीसाठी बाबांनी नवीन शर्ट आणला होता. त्या शर्टाच्या बाहीचा एक दोरा बाहेर आलेला दिसत होता. मला खरंतर तो कापून टाकायचा होता. पण, कातरी स्वयंपाकघरात होती. ती आणायला गेलो असतो आणि आईने पाहिलं असतं तर आईला मी काहीतरी उद्योग करतोय असा संशय आला असता. म्हणून मी चक्क काडेपेटी घेऊन त्या दोऱ्याला जाळायचं ठरवलं. मी त्या दोऱ्याला काडी लावली आणि दोऱ्यासोबत शर्टाची बाहीपण जळून गेली. माझ्या या उद्योगानंतर आई बाबांचा खूप ओरडा खाल्ला मी त्यादिवशी. मग, दुसऱ्या दिवशी बाबांनी माझ्यासाठी नवीन शर्ट आणला.

मी फटाके फोडण्यात उस्ताद होतो. एका वर्षी आमच्या बडोद्याच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या एका काकूंनी घरात नवीन पडदे घेतले होते. मला आईने बजावलं होतं की गच्चीवर जाऊन फटाके फोड. पण, मी खालीच फटाके फोडत होतो. मी लावलेलं एक रॉकेट नेमकं त्या काकूंच्या घरात शिरलं आणि त्यांच्या नव्या कोऱ्या पडद्यांना आग लागली. झालं.. मी पुन्हा ओरडा खाल्ला. पण त्या काकू इतक्या गोड की त्यांनी त्याच दिवशी मला घरी जेवायला बोलवलं. माझ्या आवडीचे पदार्थ मला खायला घातले आणि असं करू नको, म्हणून समजावलं सुद्धा.

अशीच एक आठवणीतली दिवाळी म्हणजे माझ्या आत्याच्या घरची. माझी सगळ्यात मोठी आत्या गोंदियाला राहते. एका वर्षी आम्ही सगळे तिच्या घरी दिवाळी साजरी करायला जमलो होतो. अगदी सगळे.. तेव्हा आम्ही एक ग्रुप फोटो काढला होता. त्या फोटोत आमच्या इतक्या मोठ्या कुटुंबातले सगळे हजर आहोत आणि तो आम्हा सगळ्यांचा मिळून असा एकमेव फोटो आहे.

मयुरी- माझ्याकडे दिवाळीची अशी काही स्पेशल आठवण नाहीये. मी डोंबिवलीला राहायचे. त्यामुळे डोंबिवलीला दिवाळीच्या पहिल्या दिवाशी फडके रोडवर आम्ही सगळे जमायचो. त्यानिमित्ताने सगळे मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटायचो. तिथे गणपती मंदिर आहे, दिवाळीच्या सकाळी तिथे दर्शन घ्यायचं आणि मग मित्र-मैत्रिणींसोबत मस्त गप्पा आणि टाईमपास करायचा, असा आमचा दिवाळीचा दिनक्रम असायचा. मी फटाक्यांना घाबरते. त्यामुळे फटाके कधीच उडवले नाहीत. पण, घरी आईला फराळात मदत करायचे. आम्ही सगळे मिळून किल्ले बनवायचो.

piyush-mayuri-7

३. दिवाळीच्या फराळापैकी तुमचा आवडीचा पदार्थ कुठला? एखादी स्पेशल डिश तुमच्या घरी या निमित्ताने बनते का?

पियुष- मला आईच्या हातचा चिवडा खूप आवडतो. तसा आईच्या हातचा सगळाच फराळ मला आवडतो. पण, चिवडा जरा जास्तच. मी बडोद्याहून मुंबईला येतानाही मी तो घेऊन येतो आणि इथेही दह्यासोबत खातो. याखेरीज बडोदा म्हणजे गुजरातीबहुल भाग. म्हणून तिथे मठिया नावाचा एक पदार्थ बनतो. माझी आईही सुंदर मठिया बनवते, त्याही खायला मला खूप आवडतात.

पण, लहान असताना या फराळाच्या प्रोसेसमध्ये मी आईला प्रचंड सतवलंही आहे. एकदा आई चकल्या करत होती. तेव्हा ती मला गरम तेलामुळे किचनच्या आत पाऊल टाकू देत नव्हती. तिने दार लावून घेतलं होतं म्हणून मी स्पायरल वायर्स घेतल्या. त्या चकल्या म्हणून एका भांड्यात पाणी ओतून त्या तळण्याचा खेळ खेळू लागलो. मी माझ्या चकल्या आईलाही दाखवल्या. तिने त्या बघण्यासाठी मला दार उघडून किचनमध्ये घेतलं आणि माझ्या चकल्यांचं कौतुकही केलं. तिने कौतुक करताक्षणीच मी त्या माझ्या चकल्या खऱ्याखुऱ्या गरम तेलात टाकून दिल्या. आता पुढे काय झालं असेल ते तुम्ही ओळखलंच असेल.. हाहा…

मयुरी- मला आईच्या हातचे बेसनाचे लाडू खूप आवडतात. मला स्वतःला चकल्या करता येतात. आता बडोद्याला मी सासुबाईंकडून चिवडा शिकून घेणार आहे. माझी आई दिवाळीला सात वाट्यांच्या वड्या करते. वेगवेगळे सात पदार्थ ज्यात साखर, तूपसुद्धा एक एक वाटी असतं, ते एकत्र करून ती वड्या बनवते. त्या खूप सुंदर लागतात.

४. बडोद्याची दिवाळी कशी असते?

पियुष- खूप सुंदर. अर्थात मी सांगितलं तसं तो भाग गुजरातीबहुल आहे, पण तिथे मराठी कुटुंबही आहेत. त्यामुळे दिवाळी आणि त्यानंतर येणारं नवीन वर्षं तिथे खूप उत्साहात साजरं होतं. तिथे राहणारे बहुतांश लोक हे व्यापारी आहेत, त्यामुळे धनत्रयोदशीही खूप उत्साहात साजरी होते.

piyush-and-mayuri

५. सध्याच्या सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात व्हर्चुअल भडिमार होत असतो, त्यात सणांचं महत्त्व कमी होत चाललंय का?

पियुष- मी खूप लकी आहे की माझ्या लहानपणी मोबाईल नव्हते. त्यामुळे सगळे एकमेकांना वेळ द्यायचे. आता सगळं डिजीटल झालंय, म्हणून आपण एकमेकांना मेसेज करतो. पण, त्यात भावनेचा ओलावा असेलच असं नाही. आता सगळं बदललंय. पूर्वी मी आणि बाबा कंदिल घरी बनवायचो, आता विकत घेतो. त्यामुळे संस्कार आणि संस्कृती मिस करतो.

मयुरी- आता सगळं खूपच बदललं आहे. सगळे सोशल साइट्सवर बिझी असतात. पण, त्यांच्यातलं कम्युनिकेशन हरवलंय. याशिवाय फक्त दिवाळीलाच मिळणारा फराळ हल्ली सगळीकडे सर्रास मिळतो. त्याचं अप्रुप राहिलेलं नाही. तेव्हा आम्ही दिवाळीचे किल्ले करायचो, आताच्या मुलांना दिवाळीचे किल्ले म्हणजे काय हेही माहीत नसेल. पारंपरिक रांगोळ्यांच्या ऐवजी छापाच्या रांगोळ्या पाहायला मिळतात. त्यामुळे हो या सगळ्यांमध्ये उत्सवाचं महत्त्व हरवत चाललं आहे.