साहसी ध्येयवेडा

>> सुवर्णा क्षेमकल्याणी

कुठल्याही क्षेत्रात काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी खऱया अर्थाने साहस लागतं. प्रसाद पुरंदरे यांनी १९९२ साली एनईएफ (national education foundation) संस्था स्थापन केली. २००३ साली पहिली एन्डय़ुरो स्पर्धा पार पडली आणि त्याच वर्षी केटूएस म्हणजे कात्रज ते सिंहगड ही स्पर्धाही सुरू केली. या उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांनी अधिकाधिक साहसी वृत्तीकडे वळावं यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. संशोधक वृत्तीचे, ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि साहसी खेळांची आवड असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सुपुत्र प्रसाद पुरंदरे यांच्याशी केलेली ही खास बातचित.

तुम्ही राबवत असलेल्या एन्डय़ुरो स्पर्धेविषयी
– एन्डय़ुरोसारखी स्पर्धा देशभरात एकमेव असून गेली अनेक वर्षे ती सातत्याने राबवली जातेय आणि अभिमानाची गोष्ट अशी की, यात सहभागी होणाऱयांचं प्रमाणही वर्षागणिक वाढतंय. आजच्या घडीला माणसाला स्वतःला शोधण्यासाठी अशा स्पर्धा सिंहाचा वाटा उचलतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच या स्पर्धेचा अनुभव घ्यायला हवा. एनईएफतर्फे आयोजित केली जाणारी स्पर्धा ही दिवसेंदिवस लोकप्रिय होतेय आणि याला मिळणारा प्रतिसाद कमालीचा आहे. आपल्यातलं कौशल्य पणाला लावून दोन दिवस वेगवेगळी आव्हानं पार करून ती स्पर्धा पूर्ण केल्यावर प्रत्येक स्पर्धकाच्या चेहऱयावर असलेलं समाधान हीच खरी जिंकल्याची पावती असते. वय वर्षे १६ आणि त्यापेक्षा जास्त वय असलेला कोणताही स्पर्धक या स्पर्धेसाठी पात्र आहे. एनईएफ (National Education Foundation) ही संस्था २५ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आली आणि या संस्थेतर्फे आयोजित एन्डय़ुरो स्पर्धा गेली १६ वर्ष यशस्वीरीत्या पार पडतेय. या स्पर्धेची खासीयत म्हणजे ही स्पर्धा जवळ जवळ सलग दोन दिवस चालते. यामध्ये पाच ते सहा प्रकारच्या वेगवेगळ्या साहसी खेळांचा अंतर्भाव होतो, ज्यात नकाशा वाचन, सायकलिंग, कयाकिंग, माऊंटन ट्रेकिंग, माऊंटन बाईकिंग, रायफल शूटिंग, रिव्हर क्रॉसिंग इ. खेळांचा समावेश होतो. तीन स्पर्धकांचा एक गट असून प्रत्येक गटात किमान एक मुलगा /एक मुलगी असणं अनिवार्य असतं. या स्पर्धेचं वैशिष्टय़ म्हणजे स्त्राr-पुरुष समान पातळीवर स्वतःला आजमावतात आणि प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना त्यांची बलस्थानं ओळखून पुढे जायचं असतं. या स्पर्धेमुळे स्वतःमधील कौशल्य पणाला लागतं. तसंच चिकाटी, जिद्द यांची सीमारेषा ओलांडण्याचीही ताकद मिळते. स्त्राrपुरुष समानता असलेली अशी ही एकमेव सांघिक स्पर्धा आहे.

‘‘साहस’ या शब्दाची व्याख्या काय सांगाल?

– आपल्या दैनंदिन आयुष्यात बऱयाच गोष्टींमध्ये आपण साहस, धाडस दाखवत असतो. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. आपण जेव्हा साहसी खेळांसंदर्भात विचार करतो तेव्हा मी म्हणेन की, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला साहसी खेळ खेळण्यासाठी उद्युक्त करावं. या साहसी क्रीडा प्रकाराने दैनंदिन आयुष्यात त्यांच्या स्वभावातला साहसी गुण वाढीस लागतो, जोपासला जातो. साहस असलेल्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व हे नेहमीच आपल्याला आश्वासक वाटतं. त्यामुळे निश्चितच त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आपोआप बदलतो. गरज आहे फक्त दृष्टिकोन बदलण्याची!

आज साहसी खेळांचं किती महत्त्व आहे?
– काळानुसार प्रत्येक बाबतीत बदल होणं आवश्यक आहे. पूर्वी जे साहसी खेळ खेळले जायचे ते आता खेळले जात नाही. कारण कदाचित आज त्याची तितकी गरज नसेल, पण त्या खेळांना पूर्णपणे विसरणंही योग्य नाही, जे काही चांगलं आहे. मग ते जुनं असो किंवा नवं, दोघांचा समन्वय साधून आपल्याला प्रगती करायची आहे. आजही जर कुठे संरक्षणासाठी तलवार चालवणं निकडीचं असेल तर त्या भागातल्या मुलामुलांनी ते शिकायला हवं किंवा त्या विषयाचे अभ्यासक किंवा तज्ञ असतील तर त्यांनी तो तो प्रकार अभ्यासणं, शिकणं गरजेचंच आहे. काळ कितीही बदलला असला तरीही साहसी खेळाचं महत्त्व कमी होत नाही. आजही त्यांचं महत्त्व अबाधित आहे. आजच्या जगात तर याचं खूप महत्त्व आहे. कारण सध्याच्या युगात प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी आवश्यक धाडस तुम्हाला हे साहसी खेळच देऊ शकतील.

एनईएफतर्फे आयोजित अॅडव्हेंचर्स स्पोर्टस्’चं नियोजन कसं केलं जातं?
– एनईएफतर्फे दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. साधारण १५० माणसांची टीम या सगळ्यात कार्यरत असते. सहभागी होणारी प्रत्येक टीम रेडिओ कम्युनिकेशनद्वारे एकमेकांच्या संपर्कात असते. सहभागी होणारे स्पर्धक मानसिक किंवा शारीरिकरीत्या तयार आहेत की नाही ते पाहण्यासाठी वेगळी काही परीक्षा घेतली जात नाही. याचं कारण त्यांना स्वतःला पारखून बघण्याची ही संधी असते. त्यामुळे माझ्या मते ती संधी प्रत्येकाला मिळायलाच हवी आणि ही स्पर्धा माणसाला जगायला शिकवते. माणसं या स्पर्धेतून स्वतःला ओळखू लागतात इतका आमूलाग्र बदल या स्पर्धेमुळे पाहायला मिळतो.

महाराष्ट्राला साहसासाठी अनुकूल वातावरण लाभलं आहे. प्रत्यक्ष चित्र मात्र वेगळं आहे याबाबत.
– एन्डय़ुरोसारख्या स्पर्धेला भौगोलिक वातावरण अनुकूल असणं गरजेचंच आहे आणि महाराष्ट्राला हे वरदान मिळालंय. पुण्यात जर अशा स्वरूपाची स्पर्धा सातत्याने घेतली जाऊ शकते तर निश्चितच इतर ठिकाणीही घेता येऊ शकेल, पण मुळात प्रश्न मानसिकतेचा आहे.अजूनही आपण जुन्या चालीरीती, परंपरा यांच्या बेडय़ांमध्ये अडकलो आहोत. काळ बदलला असला तरी तुलनेत विचार मात्र फार बदलले नाहीत. अशा स्पर्धांची माहिती आधी पालकांनी समजून घ्यायला हवी. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अशा स्पर्धांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे हे मुळात जाणून घ्यायला हवं. विचार बदलला तर आजचं हे निराशेचं चित्र उद्या नक्कीच बदलू शकेल आणि ठिकठिकाणी अशा स्पर्धा पाहायला मिळतील.

या साहस मोहिमा राबवण्याचा नेमका उद्देश काय आहे आणि तो साध्य होतोय का?
– हो, नक्कीच. एन्डय़ुरो आयोजित केल्यापासून आजवर अनेक ठिकाणी साहसी मोहिमांचं प्रमाण वाढताना दिसतंय. इथून सहभागी झालेले अनेक स्पर्धक वेगवेगळ्या जागतिक पातळीवरच्या साहस स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याचीही उदाहरणं आहेत. त्यामुळे नक्कीच आजचं हे बदललेलं चित्र यशस्वी करण्यात एन्डय़ुरोसारख्या स्पर्धेचा महत्त्वाचा वाटा आहे आणि मुळात प्रत्येकाने आयुष्यात प्रत्येक अडथळ्यावर धैर्याने मात करावी, आयुष्याकडे धाडसाने पाहावं हाच या सगळ्यामागचा उद्देश. त्यामुळे अभिमानाने सांगावंसं वाटतं की, हे सगळं करण्यामागचा हेतू पुरेपूर साध्य होतोय.

[email protected]