मनोहारी जगाचं दर्शन

>> प्रा. आलोक शेवडे, कीटक प्रजातींचे अभ्यासक, छायाचित्रकार

जंगलात आढळणाऱया कीटकांना आपल्या हाताच्या बोटावर अलवार घेऊन त्यांची छायाचित्रं टिपणं हा प्रा. आलोक शेवडे यांचा छंद. त्यांनी बुलढाण्याजवळील ज्ञानगंगा अभयारण्यातील वेगवेगळ्या प्रजातींच्या सुमारे साडेतीनशे कीटकांचा शोध लावला असून या विक्रमाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. कीटकांचं मनोहारी जग आणि त्यांचे छायाचित्रण याची माहिती घेत त्यांच्याशी केलेली बातचित.

 फोटोग्राफीचा छंद केव्हापासून जडला?
– मी मूळचा यवतमाळचा रहिवासी. इंग्रजी विषयात एम.ए ,बी.एड पूर्ण करून १९९२ मध्ये प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो. २००७ मध्ये माझ्या बहिणीने मला एक कॅमेरा भेट दिला याच कॅमेऱयाने नजरेआड असलेली ही सृष्टी आपल्या कॅमेऱयात टिपायला शिकवलं. अगदी नकळत हा छायाचित्रणाचा छंद जडला आणि या कीटकांशी एक नातं निर्माण झालं.

 आजवरचा प्रवास कसा घडला?
– कॅमेरा हाती आला आणि कीटक छायाचित्रण हेच जीवन ध्येय होऊन गेलं. छायाचित्रणाच्या निमित्ताने कीटकांशी मैत्री केली त्यातून निसर्गाशी जवळीक वाढली. कीटकांचं रंग सौंदर्य, त्यांचे विविध आकार, त्यांची अनोखी जीवनशैली हे सगळं अगदी अद्भुत असतं याचा साक्षात्कार झाला. ही नजरेआड दडलेली सृष्टी इतकी मनोवेधक आहे हे लोकांना सांगावसं वाटलं म्हणून स्लाईड शोसारखा उपक्रम हाती घेतला.

 एक फोटोग्राफर म्हणून या छंदाच्या बाबतीतले वैशिष्टय़ काय सांगाल?
– या छायाचित्रणाच्या माध्यमातून कीटकांची जीवनशैली टिपण्याचा माझा प्रयत्न आहे, कीटक हे विविधरंगी, विविध ढंगी असतात, त्यांच्या जीवन क्रमात अनेक टप्पे ते पार पाडत असतात. उदाः निटिंग, मोल्ंिटग, वनस्पती भक्षण, शिकार, स्वजाती भक्षण छद्मावरण या सगळ्या टप्प्यांना मी प्रथम फोटोमध्ये आणि नंतर व्हिडीयो स्वरूपात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. स्लाईड शोमुळे लोकांना कीटकांच्या सौंदर्य छटा समजावून सांगता येतात आणि प्रत्यक्ष संवादातून त्यांच्या ज्ञानात भर घालता येते याला मी ज्ञानरंजन असं म्हणतो. कीटक अंतरंग दर्शन ‘जॉय ऍट फिंगरटिप्स’ हा स्लाईड शो आता बाळसं धरू लागलाय. आजवर याचे महाराष्ट्रभर १९८ प्रयोग झालेत. छायाचित्रणादरम्यान शोध घेत असताना ३०० प्रजातींपैकी जवळजवळ ५० च्या वर नाकतोडय़ांच्या प्रजाती आढळल्या.

 कीटकांचं संवर्धन करण्यासाठी काय सांगाल?
– सर्वच कीटक हे उपद्रवी नसतात, कीटक म्हणजे उपद्रवी असा आपला बऱयाचदा गैरसमज होतो आणि अनेक कीटक त्याला बळी पडतात तसचं कीटक हे अजिबात किळसवाणे नसतात त्यांना स्वतःचं नैसर्गिक रंग रूप आहे. मुळात मला असं वाटतंय की, ‘कीड आणि कीटक’ यात भेद करण्याची आवश्यकता आहे. समस्त कीटक हे पक्षी, पाल, बेडूक यांसारख्या जिवांचं प्रमुख अन्न आहे, थोडक्यात अन्न साखळीची ती प्राथमिक कडी आहे. शिवाय कीटक हे पराग सिंचनाला मदत करतात त्यामुळे निसर्गातलं त्यांचं स्थान हे अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण आहे. मी सगळ्यांना नेहमीच सांगतो ‘जर तुम्हाला सुंदर फुलपाखरं हवी असतील तर तुम्हाला सुंदर अळ्या जिवंत ठेवाव्या लागतील.

 कोणकोणत्या कीटकांचे छायाचित्रण केलं गेलंय?
– हे कीटक मित्र असे सहज आपल्याला दर्शन देत नाहीत. त्यासाठी कित्येक मैलांचा प्रवास करावा लागतो. झाडाझुडपात, काटय़ाकुटय़ात जाऊन शोध घ्यावा लागतो, खरं सांगायचं तर इतक्या प्रकारचे कीटक आजवर हाताळलेत की त्यांच्याविषयी समजून घेण्यासाठी स्लाइड शो पाहिला की लक्षात येईल. तरीही काही जणांचा मी इथे आवर्जून उल्लेख करीन ज्यात रेनबो ब्ल्यू, हॉपर, लीफ हुडेड ग्रास हॉपर, अश्वमुखी यिटल, कमांडो मॉथ इ. यातले काही दिसायला अगदी सुंदर आकर्षक तर काही काटेरी, बोचरे इ. जवळजवळ ३०० हून अधिक प्रजातींच्या कीटकांशी मैत्री ओळख झाली आणि हा प्रवास पुढेही असाच सुरू राहील.

 छायाचित्रण करतांना कीटकांविषयी संशोधन करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
– कोणत्याही बाबतीत जेव्हा आपल्याला आवड निर्माण होते ना, तेव्हा नकळत आपण त्या गोष्टीच्या खोलात शिरू लागतो. माझंही अगदी तसंच झालं. सुरुवातीला हा छंद फोटोग्राफी पुरता मर्यादित होता, पण जसजसं मी यांच्याजवळ जात गेलो तस तसं त्यांच्याविषयी अनेक नवनव्या गोष्टी शिकत गेलो त्यातूनच त्यांच्याविषयी अभ्यास करण्याची ओढ लागली आणि मग प्रत्येक कीटकाची लांबी, ते कुठे सापडतात, त्यांचा प्रजनन काळ अशी सगळी माहिती तोंडपाठ झाली आणि हीच माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत पोहोचवी असा माझा प्रांजळ हेतू आहे.

 भविष्यात समाजाकडून/शासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
– जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त स्लाईड शो होणं अपेक्षित आहे, त्यातून कीटकांबद्दलचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. लोकांमध्ये सौंदर्यदृष्टीची जाणीव जागृत होईल आणि त्याद्वारे कीटकांचेच नव्हे तर संपूर्ण सृष्टीबद्दल एक सहानुभूतीची भावना निर्माण होऊन आपोपाप त्यांचं संवर्धन होण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. माझा हा फोटोग्राफीचा छंद स्लाईड शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जावा अशी अपेक्षा मी शासनाकडूनही करतोय. यासाठी आवश्यक असलेलं साहित्य तसंच छायाचित्रणासाठी करावा लागणारा प्रवास यासाठी आर्थिक मदत मिळाली तर खूप बरं होईल. लोकांनी कीटकांना विनाकारण मारू नये, पाखरू, नाकतोडा यांना दिसताक्षणी मारून टाकलं जातं. तसं न करता आपल्याला त्याच्यामुळे उपद्रव होतोय का याची शहानिशा करायला हवी. मला अजून खोलात जाऊन अभ्यास करायचाय त्यासाठी पाठिंब्याची गरज आहे.

[email protected]