कणखर… खंबीर!

संजीवनी धुरी-जाधव

स्त्री म्हणजे जिद्द, त्याग आणि सहनशीलतेची मूर्ती… मनात आणले तर ती काहीही करू शकते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे दिवंगत मूर्तिकार विजय खातू यांची कन्या रेश्मा… विजयजींच्या आकस्मिक निधनाने अवघी मुंबई शोककळेत असताना रेश्माने मात्र स्वतःला सावरले. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे ‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हणत तिने दुसऱ्याच दिवशी कारखान्याची धुरा हाती घेतली. तिच्या या धाडसी निर्णयाला सलाम.

णेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना विजय खातू यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे सावट पसरले. पण दुःख बाजूला ठेवून रेश्माने दुसऱ्याच दिवशी कारखान्यात हजेरी लावली. कारण हताश होऊन चालणार नव्हतं. बाबांनी हाती घेतलेलं काम तडीस न्यायचंच होतं. बाबा वेळेत ऑर्डर पूर्ण करायचे. त्याच पद्धतीने सगळं करायचं होतं. त्यासाठी हतबल झालेल्या कारागीरांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं होतं. त्यांना धीर द्यायचा होता. म्हणून तिला स्वतःला मानसिकदृष्ट्या कणखर व्हावंच लागलं. अचानक अंगावर आलेली जबाबदारी आणि गणपतीच्या मूर्ती वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान तिच्यासमोर आहे, पण बाबांची शिकवण आणि अनुभव या दोन गोष्टी गाठीशी बांधून रेश्मा जोमाने कामाला लागली. लोकांच्या मूर्ती वेळेत पोहोचण्यासाठी सध्या तिची धडपड चालली आहे. ती म्हणते, बाबांनी जवळजवळ ८० टक्के काम पूर्ण केले होते. त्यांनी माझ्यासाठी आणि कारागीरांसाठी आता थोडंच काम ठेवलंय.

रेश्मा बी.कॉम झाली असून ती डिझायनिंग, फिल्म मेकिंग शिकली आहे. आता ती सहायक दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात उतरली आहे. याआधी तिला गणपतीच्या कामाचा अनुभव नव्हता. तशी वेळही तिच्यावर कधी आली नाही, पण वर्कशॉपमध्ये यायला लागल्यावर तांत्रिक गोष्टी कळू लागल्या. थोडे बाबांकडून ऐकत आली, तीही निरीक्षण करत आली. त्यामुळे बाबांनंतर अचानक पडलेली जबाबदारी आपण पेलू शकू असा तिला विश्वास आहे. त्यामुळे सकाळपासून रात्री बारा-साडेबारापर्यंत ती कारखान्यात कारागीरांच्या सोबतीने पद्धतशीरपणे काम पूर्ण करतेय. यावर्षी ११४ मूर्ती आहेत. त्यात २२ मोठे गणपती आहेत.

कारागीरांची भक्कम बांधणी
बाबांची आठवण सांगताना रेश्मा म्हणाली, ‘‘बाबांनी कारागीरांची भक्कम बांधणी केलेली आहे. माझ्या पाठीशी कायम उभे राहतील अशीच त्यांची टीम आहे. कारागीरांचे आरोग्य, त्यांची मनं सांभाळणं… काही वेळा त्यांच्याशी सौम्य आणि काही वेळा कडक होऊन त्यांच्याशी वागावं लागतं, पण तरीही त्यांना एकत्र बांधून ठेवणं ही कला बाबांची आहे. बाबांनी मला माणसं जपायला शिकवले. त्यामुळे यापुढे माणसं जपणं हा पहिला धडा माझ्यासाठी असणार आहे.

पुढच्या वर्षी जोमाने…
मोठ्या मूर्तींसाठी प्रत्येक मंडळ आपलं एक वेगळं कॉन्सेप्ट घेऊन येतं आणि त्यात काही कमी-जास्त वाटलं तर काही कॉन्सेप्ट बाबा द्यायचे. ती कलाकृती नीट त्या स्ट्रक्चरमध्ये बसवून देणं हे आव्हानच असतं. महाराष्ट्रातला सर्वात उंच २५ फुटांचा गणपती यावर्षी आपल्याकडे असल्याचा रेश्माला अभिमान वाटतो. अर्थात हे इंजिनीअरिंग वर्क आहे. ती मूर्ती विसर्जनापर्यंत मजबूत राहायला हवी असाच दृष्टिकोन असतो. एकूणच मूर्ती सुबक, आकर्षक आणि मूर्तीचा समतोल व्यवस्थित राहिला पाहिजे, असे ती सांगते. यावेळी शिकून पुढच्या वेळेला जोमाने या क्षेत्रात उतरेन असा आत्मविश्वास ती व्यक्त करते. यासाठी तिचं संपूर्ण खातू कुटुंब तिच्यासोबत आहेच.