चांगल्या कथेसाठी तीन वर्षे थांबले

2

रिंकू राजगुरू…सिर्फ नाम ही काफी है! सैराटनंतर रातोरात स्टार झालेली रिंकू तब्बल तीन वर्षांच्या गॅपनंतर आगामी ‘कागर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सैराटनंतर मी शेकडो सिनेमे नाकारले. निर्मात्यांनी मला ऑफर केलेल्या भूमिका आर्चीशी मिळत्याजुळत्या होत्या. भूमिकेतला तोच तोचपणा मला नको होता, असे रिंकू सांगते.

 ‘सैराट’नंतर मराठी सिनेमात यायला तीन वर्षे का लागली ?
– ‘सैराट’नंतर मला त्याच तोडीचा सिनेमा करायचा होता. जाती–पातीच्या पलीकडे माणुसकी असते ही गोष्ट मला सिनेमातून लोकांना सांगायची होती. तशी ऑफर मला ‘कागर’ सिनेमातून मिळाली. यात माझी भूमिका खूप कणखर आणि चॅलेंजिंग आहे. सामाजिक–राजकीय प्रेमकथा आणि नात्यांची उलगड कागरमध्ये आहे. लोकांसमोर काहीतरी चांगलं घेऊन जायचं असेल तर हा सिनेमा योग्य आहे असे मला वाटले.

 ‘सैराट’नंतर किती सिनेमे नाकारलेस?
– सैराटनंतर शेकडो स्क्रिप्ट माझ्याकडे आल्या, पण त्या ऑफर नाकारण्याचे एकमेक कारण म्हणजे या भूमिकेतला तोच तोचपणा. निर्मात्यांना मला घेऊन पुन्हा आर्ची दाखवायची होती. आर्चीची भूमिका मी एकदा साकारली. आजही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे, याचा मला अभिमान आहे. पण अभिनेत्री म्हणून मला वेगवेगळ्या भूमिका साकारायला आवडतील.

 आर्चीपेक्षा ‘कागर’मधली राणी किती केगळी आहे?
– या दोन्ही भूमिकेत जमीन आसमानचा फरक आहे. आर्ची बिनधास्त आणि स्वभावाने फटकळ होती. तर राणी ही सगळ्यांच्या भावनांचा आदर करणारी, सर्वांना मदत करणारी आहे. युवराजवर तिचे जीवापाड प्रेम आहे. त्याच्या कामात ती त्याला मदत करते. पुढे राणीला काही कारणास्तक राजकारणात यावे लागते, मग काय होते ते सिनेमात पाहायला मिळेल.

शहरांच्या तुलनेत गावाकडच्या मुलींना अजूनही तितके स्वातंत्र्य नाही, असे तुला वाटते का?
– आधीपेक्षा आता गावातील मुलींना स्वातंत्र्य नक्कीच जास्त आहे, पण खूप नाहीये. शहरातील मुली स्वत:च्या मनाप्रमाणे आयुष्य जगतात. शहरात 20–21 वर्षांच्या मुली आज एकटय़ा फ्लॅटमध्ये राहतात. जॉब करतात. हक्काने पैसे घरी पाठवतात. ग्रामीण भागातील मुली खूप टॅलेंटेड आहेत. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

 सिनेमा स्वीकारताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतेस?
– सिनेमाची गोष्ट आणि माझी भूमिका, त्यानंतर दिग्दर्शक कोण या गोष्टींना प्राधान्य देते. सर्वात महत्वाचे म्हणजे सिनेमात सामाजिक संदेश असला पाहिजे. स्क्रिप्ट आल्यावर मी नागराज सरांचे मार्गदर्शन घेतेच, त्यासोबत आईवडिलांचादेखील सल्ला घेते. त्यानंतर स्वत: निर्णय घेते.

 नुकतीच तू बारावीची परीक्षा दिली आहेस. पुढे काय करायचे ठरकले आहेस?
– यापुढेही बाहेरून शिक्षण घेऊन मला ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे आहे. कारण शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

 बॉलीवूडमध्येही तू झळकणार असल्याची चर्चा आहे?
– त्याबद्दल मी आताच काही बोलणार नाही, पण लवकरच तुमच्या भेटीला येईन हे नक्की.