दिवाळी विशेष-नागपूरची दिवाळी मिस करतो !

फोटो सौजन्य- फेसबुक

>>रश्मी पाटकर, मुंबई
अवघाची संसार, पुढचं पाऊल, कशाला उद्याची बात, लज्जा अशा गाजलेल्या मालिकांचे पटकथा आणि संवादलेखन करणारे अभिजित गुरू सध्या माझ्या नवऱ्याची बायकोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तर त्यांची पत्नी समिधा हीसुद्धा अवघाची संसार, कमला अशा मालिकांमधून गाजलेली अभिनेत्री. गेल्या दशकभरापासून अभिनयात आणि लेखनात आपली यशस्वी कारकिर्द करणाऱ्या या जोडप्याशी दिवाळीनिमित्त सामना ऑनलाईनने साधलेला संवाद-

१. यंदाची दिवाळी तुम्हा दोघांसाठी किती स्पेशल आहे?
अभिजीत- हो. खूपच. कारण यंदा आमची लेक दुर्वा आमच्यासोबत असणार आहे. आधीची दोन वर्षं ती नागपूरला तिच्या आजी-आजोबांकडे होती. दिवाळी साजरी करण्यासाठी ती दिवाळीच्या दिवशीच मुंबईला यायची. पण, यंदा ती दिवाळीच्या आधीपासूनच आमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे ही दिवाळी आमच्यासाठी कौटुंबिक दृष्टीने तर खासच असणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या म्हणाल तर समिधा सध्या पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करतेय. त्यामुळे तिच्यासाठीही ही दिवाळी खूप स्पेशल आहे.

abhi-samidha-4

२. दिवाळीशी निगडीत तुमची एखादी विशेष आठवण आहे का?
अभिजीत – हो. खूप आहेत. आम्ही दोघेही मूळचे नागपूरचे. नागपुरची दिवाळी म्हणजे सोहळाच असतो. एकतर आमचं कुटुंब खूप मोठं आहे. त्यात नागपुरात आमचा मित्रपरिवारही पुष्कळ. त्यामुळे दिवाळीच्या आदल्या दिवशीपासून आम्ही खूप धमाल करायचो. सगळे नातेवाईक एकत्र एका घरात जमायचो. पहिल्या दिवशी आंघोळ झाली की सगळे मिळून फराळ खायचो आणि फटाकेही उडवायचो. माझी आई अंगणात रांगोळी काढायची. त्यात तिला मी मदत करायचो. आजुबाजूला राहणारे सगळे सवंगडी आपापल्या घरी रांगोळी काढायचे. मग, संध्याकाळी फराळाच्या निमित्ताने एकमेकांकडे जायचो. तिथे त्यांनी काढलेल्या रांगोळ्या बघायचो. कोणाची रांगोळी छान होती यावर चर्चाही करायचो. भाऊबीज हा तर आणखी धमाल दिवस असायचा. आई-बाबा, त्यांची भावंड, आजी-आजोबा, त्यांची भावंड, मी आणि माझे भाऊ-बहीण असा तीन पिढ्यांचा भला मोठा कुटुंबकबिला एकत्र एका छताखाली भाऊबीज साजरी करायचा. लहान असताना फटाके उडवायचो. तेव्हा दिवाळीत थंडी असायची. मला आठवतं की, मी आणि माझे मित्र वाजवून झालेल्या फटाक्यांचे कागद गोळा करायचो. त्याची शेकोटी करायचो. मग, न वाजलेले फटाके गोळा करून त्यातला सगळी दारू एका वेगळ्या कागदात गुंडाळायचो आणि तो आमचा हँडमेड फटाका शेकोटीत विझायला आल्यानंतर त्यात टाकून फोडायचो.
फटाके फोडण्यात आम्ही खूप गमती केल्या आहेत. एकदा गल्लीतल्या काही मुलांनी गाढवाच्या शेपटीला फटाक्यांची माळ लावून फोडायचं ठरवलं होतं. त्यांनी माळ बांधली आणि वात पेटवून दिली. त्यांचा अंदाज होता की, आता गाढव थयथयाट करेल. पण कसलं काय.. त्या गाढवाने मान वळवून एकदा त्या पेटत्या फटाक्यांकडे पाहिलं आणि काहीही फरक पडलेला नाहीये अशा आविर्भावात ते तिथून ढिम्म हललं नाही. त्यामुळे त्या मुलांचा मस्तपैकी पचका झाला होता. त्या मुलांवर आम्ही जे हसलोय.. आजही मी ती नागपुरातली दिवाळी मिस करतो..
समिधा- माझं नागपुरातलं घर म्हणजे अगदी वाडाच. त्यात आम्ही सगळी भावंड एकत्र राहायचो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळे जण लवकर उठून अभ्यंगस्नान करायचो. फराळ खायचो आणि आसपासच्या घरांमध्ये जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा द्यायचो. मला फटाक्यांची भीती वाटते, त्यामुळे मी कधीच फटाके फोडलेले नाहीत. पण, रांगोळ्या काढायचो. किल्लेही करायचो. लग्नानंतर मुंबईला आलो तेव्हा दोघेही स्ट्रगलर्स होतो. नागपुरात खूप माणसांची सवय होती, त्यामुळे मुंबईत एकटं वाटतं होतं. तेव्हा चंद्रकांत कुलकर्णी यांच्या जीगिषा या संस्थेसोबत आम्ही दिवाळी साजरी केली होती. आमच्या अगदी छोट्याशा घरात जिगीषाच्या संपूर्ण टीमचा जेवणाची पंगत, रांगोळ्या, नागपुरी वडाभात असा साग्रसंगीत पाहुणचार केला होता. तेव्हा जीगिषातला प्रत्येकजण आमच्या आनंदात सामील झाला होता. विशेष म्हणजे त्या सेलिब्रेशननंतर मुंबईत आपलं असं कोणीतरी आहे, या जाणीवेने आम्ही निर्धास्त झालो होतो.

३. तुम्हा दोघांच्या आठवणीतली एखादी दिवाळी आहे का?
समिधा- आमची कुटुंब तशी चांगल्या आर्थिक परिस्थितीतली आहेत. पण, अभिनयाची वाट धरल्यानंतर आम्ही आमचे खर्च स्वतःच करायचो. तेव्हा काटकसरीने संसार करायचो. प्रत्येक दिवसाचं बजेट ठरलेलं असायचं. तेवढ्याच किमतीचं सामान आणायचो. एका वर्षी दिवाळीच्या वेळेला अभिजीतने मला गिफ्ट म्हणून एटीएम कार्ड दिलं आणि म्हणाला की, हे घे आणि घरासाठी जे काही आणायचंय ते आण. त्यावेळी मला वाटतं की बिग बझार किंवा डी मार्ट, नक्की आठवत नाहीये पण अशाच एका मोठ्या रिटेल शॉपमध्ये मी पहिल्यांदा खरेदीला गेले होते. तेव्हा चक्क चार हजाराचं सामान मी खरेदी केलं होतं. त्या मोठ्या पिशव्या सांभाळत मी घरात पाऊल टाकलं आणि मला काय वाटलं काय माहीत, मी रडायला सुरुवात केली. पण, ते रडणं समाधानाचं होतं. त्या आधी अगदी काडी-काडी वाचवून आम्ही संसार करत होतो. पण, त्या दिवाळीनंतर आम्ही कधी मागे वळून पाहिलंच नाही. ती आमच्यासाठी शकुनाची दिवाळी होती.

abhi-samidha-1

४. तुमच्या आवडीचा फराळाचा पदार्थ कुठला? त्याची एखादी आठवण आहे का?
अभिजीत- मला माझ्या आईच्या हातचा चिवडा प्रचंड आवडतो. ती पातळ पोहे आणि मुरमुरे असा मिक्स चिवडा खूप छान करते. तो मला खूप आवडतो. त्यासोबत चकल्या. मी गोड विशेष खात नाही. पण, समिधाच्या हातचे रव्याचे लाडू मला आवडतात.
समिधा- माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे चकली. नागपुरात चकली हा पदार्थ दोन तीन प्रकारांमध्ये बनवला जातो. बाकीचा फराळ असला तरी दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा मान मात्र चकलीलाच. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच आई चकल्या बनवायची. अगदी गरमागरम अशा चकल्या आणि सोबत दही असा बेत ठरलेला असायचा. आम्ही सगळे एकत्र बसून त्या चकल्यांचा फडशा पाडायचो.

५. सध्याच्या व्हर्चुअल जगात दिवाळीसारख्या सणांचा उद्देश हरवत चाललाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
अभिजीत- हो. खरं आहे. आम्ही लहानपणी सगळे एकत्र या सणाचा आनंद घ्यायचो. दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे मित्र व्हिसीआरवर सिनेमे बघायचो. सगळे मिळून दिवाळीचा किल्ला बांधायचो. भाऊ-बहिणी मिळून पुस्तकं वाचायचो. वेगवेगळे खेळ खेळायचो. पण, आता असलं काही बघायलाच मिळत नाही. पूर्वी नवीन कपडे, फराळ या गोष्टी वर्षांतून एकदाच मिळायच्या. त्यामुळे त्यांचं प्रचंड अप्रुप असायचं. पण, आता तसं काहीच राहिलेलं नाही. आम्ही किल्ले बनवायचो तसंच दुसऱ्यांच्या किल्ल्यांचं, रांगोळ्यांचं, एखाद्या फराळाच्या पदार्थाचं कौतुक करायचो. पण, आजकाल असं नसतं. जो तो आपापलं बघतो. दुसऱ्याचं कौतुक करण्याची वृत्तीच हरवत चालली आहे.
समिधा- मला वाटतं की, हल्ली जो तो दररोजच्या कामाच्या रगाड्यात इतका हरवून गेलेला असतो की, सणावारांच्या दिवशी घरी थांबायच्या ऐवजी लोकं बाहेर फिरायला निघून जातात. जर आपण आपल्या सणांविषयी जागरुक नसू, तर आपल्या पुढच्या पिढीला त्यातली गंमत आणि विशेष म्हणजे त्यातून होणारे संस्कार कसे कळणार?

abhi-samidha-5

६. अभिजीत तुम्ही आता लेखनाकडून अभिनयाकडे वाटचाल करताय.. त्याविषयी सांगा..
– मी खरंतर मुंबईला अभिनयातच करिअर करण्यासाठी आलो होतो. पण, इथे आल्यानंतर लेखन या विषयाकडे कोणी गांभीर्याने बघत नाही, असं माझ्या लक्षात आलं. एखाद्या लेखकाने पात्र लिहिलं, तरच ते साकारलं जातं. पात्र किंवा कथा लिहिलीच नाही, तर अभिनेता काय साकारणार? त्यामुळे पटकथा, संवाद यांच्याकडे मी माझं लक्ष केंद्रित केलं. या सगळ्यामध्ये अभिनय करण्याची इच्छा राहून गेली होती. मला जाणीव झाली की आता मी अभिनय करायला हवा. माझ्या आईवडिलांचीही मला अभिनेता बनलेलं पाहण्याची इच्छा होती. त्यामुळे मग मी एक दोन नाटकांमध्ये काम केलं. पुढचं पाऊल या मालिकेतही काम केलं. आता माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये काम करतोय. अर्थात लोकांनाही माझं काम आवडतंय.

७. समिधा तुम्ही आता मालिकेतून नाटकाकडे वळला आहात. त्याविषयी सांगा ना..
– मी आधी मालिका केल्या होत्या. पण, नाटक करण्याची इच्छा खूप होती. ती आता पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून पूर्ण होतेय. मकरंद देशपांडे यांचं स्पॉटऑन नावाचं नाटक मी करतेय. ५ नोव्हेंबरपासून पृथ्वी महोत्सव सुरू होतोय. त्यात हे नाटक मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधून सादर होणार आहे.