वैराण खाणीत नवी सृष्टी

संजय कुलकर्णी, संकल्पभूमी, बेळगाव
  • भक्ती चपळगावकर

टुमदार बेळगाव आता हळूहळू विस्तारतंय. वाढते शहरीकरण म्हणजे निसर्गाचा ऱ्हास हे समीकरण लक्षात आलेल्या एका उद्योजकाने इथल्या एका वैराण खाणीत नवी सृष्टी घडवण्याचा संकल्प केला. निसर्गानं आपल्याला भरभरून दिलंय, पण माणूस ते वापरून फेकून देतोय. अशा फेकून दिलेल्या सामानांतून आठ एकर जागा वसवण्याची किमया करणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्याशी केलेली ही बातचित.
दगडाच्या खाणीत नवी सृष्टी वसवण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली?

– ही खाण माझ्या एका मित्राच्या वडिलांची होती. खाणीसाठी सगळा डोंगर पोखरलेला होता. एक महाकाय खड्डा तेवढा उरला होता. नंतर त्यांनी ही जागा विकायचं ठरवलं. त्या काळी मी त्यांच्याबरोबर इथे आलो आणि माझ्या मनात विचार आला की एकेकाळी ही जागा किती सुंदर असेल. ज्या निसर्गानं माणसाला भरभरून दिलंय त्या निसर्गालाच आपण ओरबाडलंय. तो निसर्ग पुन्हा इथे वसवता आला तर? याच विचारानं मी मित्राला ही जागा मला विकायची विनंती केली. त्या वेळी त्याच्याबरोबरच अनेक जणांनी मला विरोध केला. या जागेत ना तर काही खणता येणार होतं, ना तर काही पेरता येणार होतं. पण मनात विचार पक्का होता. त्यानुसार ही जागा मी वसवण्याचं ठरवलं.

इथे आल्यावर मला दिसली, हिरवीगार झाडं, प्राणी-पक्षी, एक छोटा कालवा, सागाची उंच झाडं. कुठूनही ही खाण आहे, असं वाटत नाही…

– निसर्गाला पुन्हा वसवण्यासाठी आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य दिलं. एक तर बेळगावात नवनवे बांधकाम होत असताना जी जुनी माती खणली जात होती ती इथे आणून टाकायची आणि त्यात झाडं लावायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या बांधकामासाठी लागणाऱ्या कोणत्याही गोष्टी नव्या विकत घ्यायच्या नाहीत. जुन्या, वापरलेल्या सामानातूनच इथले बांधकाम करायचे. मातीसाठी आम्ही बिल्डर्सना भेटलो. बांधकामाच्या पायासाठी जी माती खणली जायची ती कुठे टाकायची हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. तो आम्ही सोडवला, इथे १८ हजार ट्रक भरून मातीचा भराव आम्ही टाकला. मग जेव्हा रिस्टोरेशनसाठी, झाडं लावण्यासाठी माणसांची गरज भासू लागली तेव्हा मी विचार केला, या खाणीत काम केलेल्या लोकांच्या कुटुंबीयांनाच का काम देऊ नये? त्यांनीही मन लावून काम केलं आणि इथे संकल्पभूमी उभी राहिली. मी म्हणतो, मी या जागेत न्यू कमर आहे. खरं तर ही जागा याच मंडळींची आहे. यांच्या दोन पिढ्यांनी खाणीत काम केलं, आताची पिढीही इथेच काम करत आहे.

या जागेला व्यावसायिक स्वरूप देताना काय काय गोष्टी केल्या?

– मी संकल्पभूमीला कधी व्यवसायाच्या दृष्टीनं बघत नाही. पण जी कुटुंब इथे राहतात त्यांच्यासाठी ही जागा elf sustaining असणं फार महत्त्वाचं होतं. कोल्हापूरचे माझे एक हॉटेल व्यावसायिक मित्र समीत नागेशकरांनी या साध्याभोळ्या लोकांना हॉटेल मॅनेजमेंटचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं. एक गोष्ट आम्हाला मात्र त्यांना शिकवावी लागली नाही ती म्हणजे आतिथ्यशीलता. हे लोक मुळातच इतके आदबशीर आणि प्रेमळ आहेत की, आपणच त्यांच्याकडून या गोष्टी शिकल्या पाहिजेत. कॉटेजेसची देखभाल कशी करायची हे ते लगेच शिकले. मग प्रश्न होता जेवणाचा. जेवण जर तेच बनवणार आहेत तर त्यांच्या पद्धतीचंच जेवण इथे असावं असा निर्णय आम्ही घेतला. त्यामुळे इथे तुम्हाला चायनीज, पंजाबी, इटालियन प्रकारचे जेवण मिळणार नाही, तर बेळगाव-कोकणात मिळणारं मराठी जेवणच इथे बनवलं जातं. माणूस जेवायला बसल्यावर ही मंडळी भाकरी थापायला घेतात म्हणजे गरम भाकरी ताटात यावी. अशा प्रकारे जेवणखाण, मेंटेनन्सची बाजू ही मंडळी उत्तमरीतीने सांभाळतात. काही बांधकाम करायचं असेल तर मात्र माझा सहभाग असतो. कुठे काही जुनी इमारत पाडली जात आहे का, तिथलं काही वापरता येण्यासारखं सामान मिळतंय का हे बघावं लागतं. कारण आम्ही इथल्या बांधकामासाठी नवी कोणतीही गोष्ट वापरत नाही. आता लोकच आम्हांला जुने सामान आणून देतात.

मातीपासून छतापर्यंत सगळ्या रिसायकल केलेल्या वस्तूंनी बनवलेला हा बहुधा देशातला एकमेव प्रकल्प असावा…

– इथे काहीच नवीन नाही, मातीसुद्धा लोकांनी टाकलेली आहे. नवीन लाकूड आणायचं नाही, जुनंच वापरायचं, झावळ्यांचा, फायर वूडचा वापर करायचा, आपण नव्या गोष्टी वापरून निसर्गावर भार टाकायचा नाही हे पहिल्या दिवसापासूनच ठरवलं होतं. बेळगावातल्या काही घरांच्या कंपाऊंड वॉल्स रस्ता रुंदीकरणासाठी तोडल्या गेल्या. त्यातले दगड वापरून आम्ही कॉटेजेस बांधली. मी विचार करतो, हे जे दगड आहेत ते काही आतासारखे मशीनकट नाहीत, कुणीतरी माणसानी मेहनतीने ते घडवले आहेत. मग त्या माणसाची मेहनत का वाया जाऊ द्यायची. मग ते दगड वापरून आम्ही कॉटेज बनवले. इथे आम्ही प्लास्टरिंग करत नाही, पेंट करत नाही, पण इथे राहिले की या गोष्टींची गरजही भासत नाही. लोकांना कम्फर्टची सवय आहे तो त्यांना द्यायचा, पण वस्तू रिसायकल केलेल्याच वापरायच्या या नियमाला कधीही मोडलं नाही.

[email protected]