हा छंद जिवाला लावी पिसे!

>>ज्योत्स्ना गाडगीळ

काही लोकांना वेळ मिळत नाही, तर काही लोकांचा वेळ जाता जात नाही. मात्र, ज्यांना वेळेचे सुयोग्य नियोजन करता येते, ते वेळ मिळो न मिळो आपल्या आवडीच्या छंदासाठी वेळ काढतातच! कसा? ही पहा त्याची दोन उदाहरणे…एक निवृत्तीपूर्वीचे तर दुसरे निवृत्तीनंतरचे…!

‘बाटली’चा असाही नाद!
थांबा थांबा! ‘बाटली’ हा शब्द वाचल्यावर लगेच त्याचा संबंध ‘त्या’ नादाशी जोडू नका, कारण इथे बाटलीचा नाद लागलाय तो हस्तकौशल्य आजमावण्यासाठी! उषा बोऱ्हाडे ह्यांना वयाच्या ४० व्या वर्षी छंद जडला आहे, हस्तकलेचा. त्या ‘सामना’ कार्यालयात टेलिफोन ऑपरेटर म्हणून गेली २५ वर्षे नोकरीत आहेत. आपले काम चोखपणे बजावून फावल्या वेळात विरंगुळा म्हणून त्यांनी ‘यू ट्यूब’ नावाचा मित्र जोडला. तो त्यांना जगभरातील कलाकारांची कारागिरी दाखवू लागला. हस्तकलेचे शेकडो व्हिडीओ पाहिल्यावर आपणही त्यापैकी काही गोष्टी करून बघाव्या असे, उषा ह्यांना वाटू लागले. हस्तकलेची आवड लागली, मग काय विचारता…सवडही मिळू लागली. भांडवलही मिळू लागले. काय होते भांडवल? रद्दी पेपर, मिटिंगमध्ये रित्या झालेल्या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या, कात्री, गम, चिकटपट्टी! टाकाऊतून टिकाऊ गोष्टी शिकण्यास त्यांनी सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यांचे छोटेखानी केबिन कलादालनात रूपांतरित झाले.

usha-borhade

उषा ह्यांना जडलेला छंद त्यांच्या कामाच्या आड येत नसल्यामुळे वरिष्ठांनी त्यांना अटकाव केला नाही आणि त्यांनीही आपल्या कामात कधीच दिरंगाई केली नाही. ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत हे स्वत: कलाकार असल्यामुळे त्यांनी उषा ह्यांची कलाकारी पाहून बऱ्याचदा रंग, ब्रश आणि इतर आवश्यक साहित्य पुरवले. ऑफिसमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून उषा ह्यांच्या हस्तकौशल्याचे कौतुक होऊ लागले. त्यांची कलाकुसर पाहून त्यांचे सहकारी आपल्या घरातील निरुपयोगी बाटल्या, डबे फेकून देण्याऐवजी उषा ह्यांना आणून देऊ लागले आणि त्याही एखाद्या शिल्पकाराप्रमाणे त्या निरुपयोगी वस्तूचा अनावश्यक भाग कापून सुंदर वस्तू बनवू लागल्या.

प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून त्यांनी शोपीसचे झाड, हँगिंग, झुंबर, कंदील , फुले , पाने, वेली बनवल्या. गणेशोत्सवात साध्या रंगीत कापडापासून आकर्षक हार, तोरणे बनवली. दिवाळीत वर्तमानपत्राच्या सुरनळ्यांपासून कंदील बनवला आणि आता नाताळच्या सणानिमित्त त्यांच्या केबिनमध्ये एक सोडून तीन-तीन ख्रिस्तमस ट्री दिमाखात उभे आहेत. त्यावर थर्माकोलचे रंगीत बॉल्स, घंटा, ग्लिटर ह्यांचीही सजावट आहे. उषा ह्यांच्या संग्रहात एव्हाना शेकडो वस्तू जमल्या आहेत. परंतु त्यांची विक्री करावी असे त्यांना अजिबात वाटत नाही. एकवेळ त्या आपण तयार केलेली वस्तू भेट म्हणून देतील, पण विकत देणार नाहीत. तसे करण्यामागे त्यांची भूमिका हीच, की ‘कलेला मोल नसते’!

उषा भायखळा येथे राहतात. त्यांच्या घराची एक खोली हस्तनिर्मित वस्तूंनी व्यापली आहे. घराला लागून असलेली गच्चीदेखील त्यांनी बनवलेल्या कृत्रिम फुलझाडांनी सजली आहे. त्यांच्या ह्या कलेबद्दल त्यांचे पती राहुल ह्यांना गंमत वाटते, ते थट्टाही करतात, परंतु आडकाठी करत नाहीत, असे उषा सांगतात. कार्यालयाच्या ठिकाणी निरर्थक वेळ वाया घालवणारी असंख्य मंडळी आपल्याला सापडतात, परंतु आपले काम सांभाळून फावला वेळ सार्थकी लावणारी उषा ह्यांच्यासारखी कलाकार मंडळी सापडणे दुर्मिळच!

कागदाच्या सुरनळ्यांचा नाद!
नाशिकचे पद्माकर रामकृष्ण परांजपे, वय ७० वर्षे. पाटबंधारे खात्यात ड्राफ्टमन म्हणून नोकरीला होते. निवृत्त होऊन १२ वर्षे झाली. नोकरीत असताना धरण, रस्ते, पवनचक्की, जलविद्युत प्रकल्प ह्यांच्या डिझाईन्सची कामे असायची. बालपणापासून चित्रकलेची आवड होती. शालेय वयात चित्रकलेच्या दोन परीक्षाही दिल्या. नोकरीमुळे चित्रकलेची हौस पुरेपूर भागली. मात्र, निवृत्तीनंतर त्यांना नाद लागला, तो हस्तकलेचा!

paranjpe-kaka-1

नातीला सुटीच्या दिवसात एका कलाशिबिरात सोडण्यासाठी ते गेले होते. शिबीर होईपर्यंत तेही तिच्या सोबतच होते. शिबिरात पाटणकर नावाच्या एका शिक्षिकेने कागदी सुरनळ्यांपासून मुलांना एक-दोन वस्तू बनवायला शिकवल्या. परांजपे ह्यांनी एकलव्याप्रमाणे त्या वस्तू दूर बसून शिकून घेतल्या. घरी आल्यावर क्रोशाच्या सुईने कागदी सुरनळ्या तयार केल्या. त्यापासून एक-दोन वस्तू तयार करून पाहिल्या. त्या नीट जमल्यावर त्यांनी एक सायकल तयार केली. ती सायकल बघता क्षणीच आबाल-वृद्धांच्या पसंतीस पडली. त्यानंतर एकामागोमाग एक नवनव्या वस्तू बनवण्याचा त्यांना छंदच लागला.

निरांजन, उदबत्तीचे घर, लामणदिवा, २ समया असा पूजेच्या साहित्याचा सेट त्यांनी तयार केला. गणपती, तबला,पेटी, तानपुरा, वीणा इ. वाद्ये केली. गणेशोत्सवात मण्यांची सजावट करून कागदाचे हार तयार केले. परडी, फ्लॉवरपॉट, भातुकली अशा जवळपास साठ वस्तू तयार केल्या. पैकी त्यांनी बनवलेली वाहने ही केवळ शोपीसची नसून इतर खेळण्यांसारखी चलित आहेत, त्यामुळे बच्चेकंपनीला ती लगेच आकर्षून घेतात. नाशिक येथील राणीभुवन परिसरात दरवर्षी संक्रांतीला कलाप्रदर्शन लागते, यंदा परांजपे ह्यांनीदेखील प्रदर्शनात सहभागी होऊन स्वत: तयार केलेल्या विविध वस्तू प्रदर्शनात मांडल्या आणि लोकांची वाहवा मिळवली. अनेकांनी त्यांना ही कला शिकवणारी शिबिरे घ्या, असेही सुचवले. त्यानुसार ते मुलांसाठी सुटीच्या दिवसात दोन दिवसांच्या हस्तकला शिबिराचे आयोजन करणार आहेत.

paranjpe-kaka-8

मिठाईचे खोके आपण फेकून देतो, परंतु परांजपे ह्यांनी मिठाईच्या खोक्याचे उसाचे गुऱ्हाळ तयार केले. त्याचे चाक फिरवले असता उसाची चिपाडे बाहेर येतात. परांजपे ह्यांची कल्पकता पाहता, उद्या ह्याच गुऱ्हाळातून प्रत्यक्षात उसाचा रस बाहेर आला, तर नवल वाटून घेऊ नका! तसाच त्यांनी जुन्या पद्धतीचा हुबेहुब स्टोव्ह बनवला आहे. त्यांची शोधक नजर आता प्रत्येक निरुपयोगी वस्तूत दडलेली उपयोगी वस्तू शोधत असते. ह्या कलाकुसरीचा सातत्याने विचार डोक्यात सुरू असल्यामुळे त्यांचा वेळ सार्थकी लागतो.

कोणतीही कला साकारायची, तर त्यासाठी संयम, शांतता आणि मुबलक वेळ लागतो. नातवंडे शाळेत गेली, की परांजपे आपल्या कलाकुसरीला सुरुवात करतात. दोन-तीन तासांत वस्तूंची मांडणी, आकार, रंगरंगोटी करतात आणि एरव्ही मोकळ्या वेळेत एका बैठकीत क्रोशाच्या सुईच्या आधारे ५००-६०० सुरनळ्या बनवून ठेवतात.

paranjpe-kaka-7

वयाची सत्तरी ओलांडल्यामुळे त्यांना फार काळ एका जागी बसवत नाही, तरीदेखील रांगोळी काढताना त्यांचा स्टॅमिना ८-१० तास टिकतो. त्यांनी आपला मोठा भाऊ सुधाकर ह्यांच्याकडून गालिचा रांगोळी शिकून घेतली आहे. ती संस्कार भारतीसारखी नसते, ना ठिपक्यांच्या रांगोळीसारखी असते. बंदिस्त खोलीत मुक्तहस्ते केलेले नक्षीकाम रांगोळीच्या स्वरूपात साकारले जाते. बघणाऱ्याला तो खरा गालिचा असावा, असा भास होतो, एवढी सुबक रांगोळी काढली जाते. रांगोळीचे रंग चाळून वस्त्रगाळ करून ते रांगोळीत भरले जातात. उठावदार रंगांमुळे ती रांगोळी दीड महिन्यानंतरही पहिल्या दिवसाइतकीच आकर्षक दिसते.

paranjpe-kaka-2

सण-उत्सवाला आपल्या घराची शोभा वाढावी, म्हणून त्यांच्या परिचयातील अनेक मंडळी त्यांना रांगोळी काढण्यासाठी बोलावून घेतात. आजी-आजोबा घरी असले की नातवंडांची चंगळ असते. परांजपे ह्यांच्या नातवांना तर आजोबांची शाळेच्या प्रोजेक्टसाठीही मदत होते. नुकतेच त्यांनी आपल्या नातवाला शाळेसाठी एका खऱ्या-खुऱ्या गावाचे मॉडेल तयार करून दिले. ज्यात सुंदर, स्वच्छ रस्ते, कौलारू घरे, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, खरेखुरे इलेक्ट्रिक खांब, पवनचक्की हे सारे काही वसवले होते. आजोबांमुळे नातवाची कॉलर ताठ झाली असेल ह्यात शंका नाही, परंतु परांजपे ह्यांनी जडवून घेतलेल्या छंदामुळे त्यांना उतारवयातही ताठ मानेने जगता येईल एवढे बळ नक्कीच मिळाले आहे.

  • D.P.Godbole,

    माझ्या लहानपणी (१९५० च्या सुमारास) पुण्यामध्ये सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर मंदिरात कार्तिक शु.एकादशी ते पुढे ४ दिवस वर एका चित्रात दर्शविल्याप्रमाणे रोज वेगळी गालिचा रांगोळी सुमारे ६ फुट X ८ फुट इतक्या आकाराची असे,तसेच त्याच काळात सोमेश्वर मंदिरात कारंज्याच्या संथ पाण्यावर फुलांच्या पाकळ्यांनी बनलेली गालीचा कलाकृती पाहिल्याचे आठवते.