कल्पक.. कणखर- श्रावणी देवधर

6

>> रोहिणी निनावे

दिग्दर्शिका श्रावणी देवधर. अनेक संघर्षांना तोंड देऊन स्वतःतील संवेदनशीलता जपत दिग्दर्शनावरील प्रेम तसुभरही कमी होऊ दिलेलं नाही.

‘श्रावणी देवधर’ हे नाव मी खूप आधीपासून ऐकून होते. ‘स्टार प्रवाह’साठी ‘मन उधाण वाऱयाचे’ या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी ओळख झाली. ‘स्टार प्रवाह’वर फिक्शन हेड म्हणून त्या कार्यरत होत्या. त्या काळात मी त्या वाहिनीवर अनेक मालिका केल्या. त्यामुळे त्यांची खूप जवळून ओळख झाली. त्या वेळी त्या आयुष्याच्या खूप खडतर काळातून जात होत्या. भावनिकदृष्टय़ा त्यांच्यावर एकामागोमाग आघात होत होते. चार वर्षांत त्यांच्या घरी चार मृत्यू झाले. भाऊ, नवरा, आई, वडील. या सगळ्यातही खंबीरपणे उभ्या राहून त्या त्यांचं काम करत होत्या.

नुकतीच ‘शोले गर्ल’ म्हणून त्यांनी दिग्दर्शित केलेली फिल्म ‘झी फाईव्ह’वर प्रदर्शित झाली आहे आणि त्याचं कौतुकही होत आहे. मी श्रावणीताईंच्या घरी त्यांची मुलाखत घ्यायला गेले. अंधेरी पश्चिम भागात असलेलं त्यांचं घर, अभिरुचीपूर्ण सजवलेलं, हवेशीर आणि खूप सुंदर ह्यू असलेलं आहे. श्रावणीताईंच्या घरी ऍवॉर्डस्ची रांग लागलेली बघितली. कुणालाही हेवा वाटावा… इतके पुरस्कार!

मी श्रावणीताईंना म्हटलं, ‘‘तुम्ही बंगाली आहात नं ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘माझी आई मराठी आणि वडील बंगाली होते, पण मला माझ्या आजीने, जिला आम्ही ठाकू माँ म्हणायचो, तिने वाढवलं. मी पुण्यात शिकलेले असल्याने माझं मराठी चांगलंच होतं. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असतानाच मला चित्रपटात काम करायची संधी मिळाली. रणजित देसाई यांच्या ‘बारी’ या कादंबरीवर आधारित ‘नागीण’ नावाचा चित्रपट होता तो. रवींद्र मंकणींच्या बरोबर. या चित्रपटाचे कॅमेरामन होते देबू देवधर. अत्यंत अनुभवी, हुशार. देबूशी माझी ओळख झाली. देबूचा स्वभाव शांत, समंजस होता. त्याने मला आयुष्यभर मार्गदर्शन केलं. त्याने मला या क्षेत्रातलं खूप काही शिकवलं. सिनेमाचं सायन्स शिकवलं. या अर्थाने तो मला गुरुतुल्य होता. आज कुठल्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करण्यासाठी जो बेस लागतो तो बेस त्याने मला दिला. आमच्या वयात अंतर होतं, पण आमची मनं जुळली होती. मला मनापासून वाटलं की, आयुष्य याच माणसाबरोबर सुखात व्यतीत होईल! आमचं लग्न झालं.

सईचा जन्म झाला, पण मनात या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची आच होती आणि ही आच निर्माण केली ती माझ्या आईने. ती मुद्दाम मला टोचायची, तू काही करणार नाहीस. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली पाहिजे, पण तू फक्त कुणा ना कुणाच्या छायेमध्ये राहणार! देबूला माझी इच्छा माहीत होती. त्याने मला कधीच विरोध केला नाही, मला साथ दिली. फक्त तो म्हणाला, मी तुझी कुठे शिफारस करणार नाही. तू तुझं काम शोधायचंस आणि मलाही त्याची शिफारस नको होती. फक्त साथ हवी होती. खूप जणांना वाटतं की, चुटकी वाजवली की या क्षेत्रात येता येतं, पण तसं नसतं. चित्रपटाचं तंत्र शिकावं लागतं. त्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटविषयी दिग्दर्शकाला माहिती असायला लागते. ‘सूत्रधार’ या चित्रपटासाठी मी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं, पण महत्त्वाचं ट्रेनिंग मला मिळालं ते अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर यांच्याकडे. चित्राकडे मी स्क्रिप्टिंग शिकले. .

त्यानंतर ‘प्रहार’ फिल्मसाठी मी पोस्ट प्रॉडक्शनला होते. त्यानंतर देबूच्या सांगण्यावरून मी फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये ऑप्रिसिएशन कोर्स केला. देबू म्हणाला, यानिमित्ताने तुला जगभरचे सिनेमे बघायला मिळतील. तो अनुभव खूप काही देणारा, खूप काही शिकवणारा होता. त्यानंतर मला थोडा आत्मविश्वास आला आणि मी स्वतः चित्रपट दिग्द|िशत करायचं ठरवलं. तो चित्रपट म्हणजे ‘लपंडाव’. त्यात विक्रम गोखले, अशोक सराफ, अजिंक्य देव, वंदना गुप्ते, सुनील बर्वे अशी भलीमोठी स्टारकास्ट होती. विषय वेगळा होता. मला टीमही खूप छान मिळाली होती. माझ्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्पर्धेमध्ये खूप चांगले चित्रपट होते. त्यामुळे जेव्हा नॅशनल ऍवॉर्ड मिळाल्याचा फोन आला तेव्हा मी देबूला म्हटलं, इतक्यात कुणाला सांगू नको. खरं नसलं तर? पण ते खरं झालं होतं. मी पुढचा सिनेमा केला ‘सरकारनामा’. मोठा चित्रपट होता, अजेय झणकरने खूप छान लिहिला होता. तगडी स्टारकास्ट होती.

प्रत्यक्ष मंत्रालयात शुटिंग केलं होतं. ज्या दिवशी मुहूर्त केला, त्याच दिवशी रिलीज डेटही ठरवली होती, पण यशवंत दत्त यांची प्रकृती खूप खराब झाली होती. डॉक्टरांनी सांगितलं की, हे चालू शकणार नाहीत. आम्हाला चित्रपटापेक्षा आमच्या मित्राची जास्त काळजी होती. मग स्वतः यशवंत दत्त यांनी काम करायची तयारी दाखवल्यावर मी सीन असे डिझाईन केले, जे बसल्या बसल्या करता येतील. शूटिंग संपल्यावरही डबिंगचा प्रश्न होता. यशवंत दत्त यांच्या आवाजाशी मिळता जुळता दुसरा आवाजही मिळेना. तेव्हा ते मला म्हणाले, श्रावणी चिंता करू नकोस, तुझा सिनेमा पूर्ण केल्याशिवाय काही मी मरणार नाही आणि खरंच आदल्या दिवशी त्यांनी डबिंग पूर्ण केलं आणि दुसऱया दिवशी त्यांचा मृत्यू झाला. योगायोग म्हणू की काय, यशवंत दत्त यांच्या मुलाने दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचं काम देबूने केलं आणि तोच देबूचा शेवटचा चित्रपट होता.’’

‘‘सरकारनामा’च्या यशामुळे हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि मला ‘सिलसिला है प्यार का’ हा चित्रपट मिळाला, परंतु या चित्रपटाच्या लेखकांचा पिंड इमोशनल रोमँटिक सिनेमा लिहिण्याचा नसल्याने हवा तसा चित्रपट बनवता आला नाही. या चित्रपटाच्या अपयशानंतर मला खूप टीका ऐकावी लागली, पण मी खचले नाही. त्यातूनही सावरून ‘लेकरू’ हा सिनेमा केला. त्यालाही स्टेट ऍवॉर्ड मिळाल्याने माझा आत्मविश्वास परत आला.’’ मी विचारलं, ‘‘मग चित्रपट सोडून टेलिव्हिजनकडे कशा काय वळलात?’’ त्या म्हणाल्या, ‘‘घरची परिस्थिती बघता मी चित्रपट न करता नोकरी करायचं ठरवलं आणि ‘स्टार प्रवाह’ फिक्शन हेडच्या पदाची सूत्रं हाती घेतली. टेलिव्हिजन या माध्यमाशी माझी ओळख झाली.

‘स्टार प्रवाह’ला नवीन ओळख देण्याचा मी प्रयत्न केला. चांगल्या मालिका, त्यांचे विषय, त्यांचं एक्झिक्युशन याकडे माझं बारीक लक्ष असायचं. अनेक बाबतीत मी कठोरपणे वागत होते, पण तसं वागायची गरज होती. दर्जेदार मालिका देता याव्यात, लोकांना आवडेल अशा देता याव्यात यासाठी मी अतिशय आग्रही असायचे. माझ्यातल्या दिग्दर्शकांनी मला चॅनल यशस्वी करण्यात मदत केली. मात्र पुन्हा मला माझं पहिलं प्रेम म्हणजे दिग्दर्शन खुणावू लागलं आणि मी ‘स्टार प्रवाह’ची नोकरी सोडायचा निर्णय घेतला.

स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. काहीतरी वेगळं करायचं होतं. माझी मुलगी सई हिने रेश्मा पठाण या ‘शोले’मध्ये हेमा मालिनीचे स्टंट्स करणाऱया मुलीचा विषय सुचवला. मग आम्ही तिच्याविषयी वाचलं. प्रत्यक्ष तिला भेटलो. तिने इतक्या गोष्टी सांगितल्या की, आम्ही भारावून गेलो. माझा आणखी एक चित्रपट येतो आहे, जूनमध्ये ‘मोगरा फुलला’’. ‘अगदी हळुवार चित्रपट आहे. या सिनेमातून माझी मुलगी सई प्रथमच मराठीमध्ये पदार्पण करते आहे आणि बरंच काही करायचं मनात आहे. एक नाटकही दिग्दर्शित करायचं आहे.’’ मी विचारलं, ‘‘स्त्री दिग्दर्शिका म्हणून काही त्रास किंवा फायदा झाला का?’’ त्या हसल्या, म्हणाल्या, ‘‘मला कुणी त्रास देऊ शकतं का?’’ मीसुद्धा हसले. कारण मी त्यांचा दरारा पहिला आहे. त्या म्हणाल्या, ‘‘तुमचं काम तुम्हाला चोख येत असेल तर कुणी तुम्हाला अडवू शकत नाही. स्त्री असण्याचा फायदा असा की, तुम्ही स्त्रियांच्या भावना नीट चितारू शकता. मी फेमिनिस्ट नाही. मी स्त्रियांबद्दल चुकीचं चित्रणही करत नाही किंवा त्यांना ग्लोरिफायही करत नाही.’’ मी विचारलं, ‘‘नवीन दिग्दर्शकांना तुम्ही काय सांगाल?’’ त्या म्हणाल्या, ‘‘या क्षेत्रात येऊन काहीतरी अविस्मरणीय काम करायचं असेल तर झोकून द्यायला हवं. खूप वाचायला हवं. बघायला हवं. जोपर्यंत तुमच्यामधलं चौकस मूल जीवनात आहे तोपर्यंत तुम्ही उत्तम काम करू शकता. जे काही कराल ते प्रामाणिकपणे करा.’’

मी म्हटलं, ‘‘अगदी बरोबर आणि या तुमच्या प्रवासात तुम्हाला घरच्यांची सोबत मिळाली तर हा प्रवास, हा संघर्ष सोपा होतो.’’ श्रावणीताई म्हणाल्या, ‘‘हो, आधी देबूची आणि नंतर मुलगी सई देवधर आणि जावई शक्ती आनंद यांची खूप साथ मला मिळाली आहे. आम्हा मायलेकींच्या मनात बरंच काही करण्याच्या योजना आहेत.’’ नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा देऊन मी श्रावणीताईंचा निरोप घेतला.

[email protected]