ताल सुरांची अनोखी स्फूर्ती

सुवर्णा क्षेमकल्याणी

एखादा कलाकार घडत असताना त्या कलाकारासोबत त्यामागे अनेक जणांची मेहनत असते. व्हायोलीन वादन आणि गायन असे दोन्ही कलाप्रकार जी समर्थपणे हाताळते इतकंच नाही तर व्हायोलीन वादनात वेगवेगळे प्रयोग करू पाहणारी कलाकार ‘श्रुती भावे’ हिच्या आजवरच्या सांगीतिक कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा…!

लहापणापासून घरात संगीत असल्यामुळे संगीताचे संस्कार श्रुतीवर आपोआप होत गेले. श्रुतीच्या घरातलं वातावरण संगीताला अगदी पोषक…वडील राजेंद्र भावे हे व्हायोलीन वादक तर आई सरिता भावे, शास्त्रीय गायिका…! श्रुतीचा लहान भाऊ श्रीरंग भावे एक उत्तम गायक आहे. खरंतर श्रुतीला लहानपणी नृत्याची आवड होती त्या अनुषंगाने त्याचं शास्त्रााsक्त शिक्षणही ती घेत होती पण वडिलांच्या होणाऱ्या बदल्यांमुळे ते काही पूर्ण होऊ शकलं नाही… घरात संगीतमय वातावरण असल्यामुळे आईचे गाण्याचे संस्कारही नकळतपणे होत गेले. साधारण ८-९ वीत असताना श्रुतीनं व्हायोलीन हातात घेतलं आणि वाजवण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी बाबांचा व्हायोलीन वादनाचा वारसा श्रुतीने पुढे न्यावा असं आईच्या मनात आलं, त्यानुसार श्रुतीने वयाच्या १६व्या वर्षापासून वडिलांकडून व्हायोलीन वादनाचं रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिलिंद रायकर तसेच पं. डी. के. दातार, कला रामनाथ यांच्याकडे श्रुतीचं व्हायोलीन वादनाचं शिक्षण झालं. श्रुतीने गायन विषय घेऊन बी. ए. केलं त्यानंतर व्हायोलीनमध्ये एम. ए. केलं. श्रुतीच्या लहानपणापासूनच्या शिक्षणाचा विचार केला तर तिच्या अंगी गायन, वादन आणि नृत्य अशा तिन्ही कलांचा संगम झालेला पाहायला मिळतो.

नियमित रियाझामुळे व्हायोलीन वादनावर श्रुतीने प्रावीण्य मिळवलं आणि तिचे एकल वादनाचे कार्यक्रम सुरू झाले. आनंद मोडक, अशोक पत्की, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, सलील कुलकर्णी, चिनार-महेश, नीलेश मोहरीर, अमित त्रिवेदी यांसारख्या नामवंत संगीतकारांसोबत काही चित्रपटांसाठी तसेच अल्बम्ससाठीही श्रुतीने वादन केलं आहे. सोनू निगम, आतिफ अस्लम या प्रसिद्ध पार्श्वगायकांसोबत श्रुतीने वादन केलय. ‘इंडीवा’ या आगळ्यावेगळ्या बँडमुळे श्रुतीला एक वेगळी ओळख मिळाली कारण त्याआधी तिने शास्त्रीय संगीताचं वादन केलं होतं, पण या बँडच्या निमित्ताने वेगवेगळे प्रयोग श्रुतीला करता आले. याची खासियत म्हणजे यात श्रुती व्हायोलीन वादनासोबत गायनही करते. हिंदुस्थानी शास्त्रीय वादनासोबत पॉप, जॅझ, इंडो-वेस्टर्न यांसारखे वेगवेगळे पाश्चात्य प्रकारही तिने या बँडच्या माध्यमातून हाताळले. या व्यतिरिक्त `MUS-SYNC’ या प्रोजेक्टच्या निमित्ताने बासरीवादक वरद कठापुरकर, संगीतकार कमलेश भडकमकर यांसोबत तिने काम केलं, यामध्ये केवळ वादनातून वेगवेगळे प्रकार सादर केले जातात. बासरी, व्हायोलीन, कीबोर्ड या तीन वाद्यांचा वापर करून लोकप्रिय गाण्यांची पुनर्रचना करून गझल, शास्त्रीय, लोकसंगीत, सिम्फनी इ.चे यात सादरीकरण केले जाते.

पूर्वी होणाऱया सांगीतिक कार्यक्रमात केवळ गायकांना महत्त्व दिलं जायचं, वादकांची ओळखदेखील करून दिली जात नव्हती, मात्र आज चित्र पूर्णपणे बदललं आहे. आज व्हायोलीन एकल वादनालाही उत्तम प्रतिसाद मिळतो. वादकांनाही गायकांइतके महत्त्व मिळू लागले आहे. एकल वादनाचे जास्तीत जास्त कार्यक्रम व्हायला हवेत, असं श्रुती सांगते. आई-वडील आणि गुरू यांना श्रुती आपलं प्रेरणास्थान मानते. याचबरोबर सतारवादक ‘अनुष्का शंकर’ यांच्या सादरीकरणातून नेहमीच तिला प्रेरणा मिळते असंही श्रुती सांगते.

श्रुतीने गायिका वैशाली भैसने-माडे सोबत ‘झी मराठी’वरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेचे शीर्षक गीत गायले होते. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म’ या रियालिटी शोच्या 2 पर्वांसाठी तिने व्हायोलीन वादनाची साथ केली होती. यूके, यूएसए, नेदरलँड, आफ्रिका, सिंगापूर, मलेशिया आदी देशांमध्ये तिने आपलं सादरीकरण केलं आहे. श्रुतीच्या आजवरच्या सांगीतिक कारकीर्दीसाठी तिला रतीलाल भावसार पुरस्कार (२०१२), सुधीर फडके पुरस्कार (२०१३) इ. पुरस्कारही मिळाले आहेत. व्हायोलीन वादक आणि गायिका श्रुती भावे हिच्या आजवरच्या वाटचालीनुसार हे सिद्ध होतं की, जर इच्छाशक्ती आणि मेहनत यांची जोड असेल तर आज गायन किंवा वादन क्षेत्रात एक उत्तम करीअर घडू शकतं. श्रुतीचा सांगीतिक प्रवास असाच सुरू राहावा यासाठी श्रुतीला खूप खूप शुभेच्छा…!

[email protected]