आता लक्ष्य ऑलिम्पिक, जीवनगौरव पुरस्कार पटकावणाऱया उदय देशपांडे यांचे स्वप्न

7

जयेंद्र लोंढे । मुंबई

महाराष्ट्रातील मातीतल्या मल्लखांब या खेळाला जागतिक स्तरावर पोहचवणारे उदय देशपांडे यांच्या शिरपेचात बुधवारी मानाचा तुरा रोवला गेला. महाराष्ट्र राज्याकडून दिल्या जाणाऱया शिव छत्रपती जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना ते म्हणाले, शासनाकडून माझी जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मात्र हा गौरव मल्लखांब या खेळाचा आहे. आपला हा खेळ आता ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे.

महाराष्ट्र राज्याचा जीवनगौरव पुरस्कार उशिरा मिळाला असे वाटते का?
– मुळीच नाही. पुरस्कार म्हणजे वाटेत आलेले स्टेशन आहे. असे मी समजतो. पुरस्कार मिळाला नसता तरी मी दुŠखी नसतो. मल्लखांबमधील माझे कार्य पुढे असेच सुरू ठेवणार. पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. पण हा माझा नव्हे मल्लखांबसाठी वाहून घेतलेल्यांचा सन्मान आहे. मल्लखांब या खेळाचा गौरव आहे.

आता पुढे कोणते लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे?
– मल्लखांब खेळाला हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे. पण सलंग्नता नाहीत. त्यामुळे इतर सोयीसुविधा मिळत नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून थम्स अप मिळाल्यानंतर आम्हाला त्या मिळतील. सध्या ऍफ्रो-आशियाई गेम्स, ऑलिम्पिक यामध्ये आमचा खेळ कसा पोहचेल याकडे गांभीर्याने लक्ष देत आहोत.

हिंदुस्थानातील मल्लखांबच्या अवस्थेबाबत काय सांगाल?
– मल्लखांबच्या 19 वर्षांखालील गटामध्ये स्पर्धा होतात. पण शालेय स्तरावर 14 व 17 या दोन्ही गटांमध्ये स्पर्धा व्हायल्या हव्यात. तसेच ग्रामीण व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांबचा समावेश होणे अत्यंत गरजेचे आहे.

वर्ल्ड कपची तयारी कशी सुरू आहे?
– काही व्यक्ती व संस्था यांनी खरोखरच खूप मदत केली. आमचे बजेट जवळपास पावणे दोन कोटींचे आहे. सध्या 80 लाख आमच्याकडे जमा झालेत. केंद्र व राज्याकडून आश्वासन दिले गेले आहे. मी आशावादी आहे. त्यामुळे शिवाजी पार्कात होणारा मल्लखांबचा पहिला वर्ल्ड कप दिमाखात पार पडेल असे ठामपणे सांगतो.