झोकदार पुनरागमन- विजय पाटकर

1

>> नमिता वारणकर

विजय पाटकर- चतुरस्र कलावंत 20 वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमनाच्या निमित्ताने मारलेल्या गप्पा.

20 वर्षांनी रंगभूमीवर येताय, काय भावना आहेत?
रंगभूमीपासून बरीच वर्षे लांब होतो, तरीही नाटक सतत पाहात होतो. शिवाय माझ्या शैलीची नाटकं मिळत नव्हती. कॉमेडी ही माझी स्टाईल आहे. ती धरून एखादी व्यक्तिरेखा साकारणं, तसेच चांगली कथा, चांगले दिग्दर्शक, निर्माता, कालाकार ‘दहा बाय दहा’ या नाटकाच्या निमित्ताने मिळाले.

20 वर्षांपूर्वी आणि आता रंगभूमीवर काम करताना काय बदल जाणवत आहेत?
तसे विशेष बदल जाणवत नाहीत. फक्त संहितेप्रमाणे नाटक बदलते. थिएटर हे थिएटरसारखंच करावं. थिएटरमध्ये सिनेमा आणि सिनेमामध्ये थिएटर असं कधी मिसळू शकत नाही. हिंदी-मराठी सिनेमात अजूनही काम करतोच. दिग्दर्शितही करतोय. मला नाटकात काम करायला आवडतं. हे मी 20 वर्षांपूर्वी अनुभवलं होतं, मात्र यापेक्षा दुप्पट आनंद आज अनुभवतोय, कारण लोक मला जास्त ओळखू लागले आहेत.

मालिका, नाटक सिनेमा, जाहिरात सगळीकडेच काम केलंय यापैकी कशात रमता?
नाटकात काम करतो तेव्हा नाटकात रमतो आणि सिनेमात काम करतो तेव्हा सिनेमात रमतो. कर्मधर्मसंयोगाने मला दोन्ही कालाकृती जमल्या आहेत. 300 मराठी सिनेमा, 50हून जास्त हिंदी सिनेमा 12 सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. याव्यतिरिक्त नाटक आणि त्याचे दिग्दर्शनही केले आहे. म्हणजे जिथे मी जातो तिथे प्रामाणिक असण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिकपणे काम आणि सादरीकरण करा. तरच चांगल्या गोष्टी होतात. नवख्यासारखं प्रामाणिकपणे काम करणं आणि शिकणं महत्त्वाचं.

स्वतःवर विनोदी अभिनेता असल्याचा शिक्का मिरवावासा वाटतो की नकोसाही वाटतो?
मला विनोदी अभिनेता असल्याचाच शिक्का मिरवावासा वाटतो. मी अमिताभ बच्चन, शाहरूख नाही. सुबोध भावेही नाही आणि स्वप्नील जोशीही नाही. मला ज्या इमेजने लोकं ओळखतात त्याच इमेजचं काम करायला आवडतं. रसिकांना जो आनंद हवाय तो देण्यासाठीच विनोदी भूमिका करतोय.

हिंदी सिनेमाविषयी काय सांगाल?
प्रोडक्शनप्रमाणे हिंदीत पैसे खूप मिळत असल्यामुळे सगळे तिथे आकर्षित होतात. मराठी सिनेमादेखील 4-5 कोटींचे होतायत; पण मराठी सिनेमा जगभर पोहोचला तर आपले पण होतील की 50 कोटी वगैरे.

असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता असूनदेखील ते पुढे आले नाहीत. त्यांना एक बुजुर्ग म्हणून काय भाष्य कराल?
मी ठराविक कोणाचं नाव घेऊन सांगू शकत नाही. पण मराठी कलाकार प्रेक्षकांना खूप आवडतात. कारण ते प्रामाणिकपणे काम करतात ते स्वःला खूप अभिनय येतो असेही दाखवत नाहीत. असे बरेच छान मराठी कलाकार आहेत. पण काही जणांचे सोर्सेस कमी पडल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत.