सात्त्विक चवीची सोनपरी

>>शेफ विष्णू मनोहर

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. मोजकाच आहार असणारी चोखंदळ खवय्यी. आमची लंच डेट रंगली माझ्याच रसोईत…

मृणाल देव-कुलकर्णीचं वर्णन करायचं तर असं करावं लागेल, एक चतुरस्र अभिनेत्री, दिग्दर्शिका, चांगली आई, बायको आणि माझ्याकरिता एक खोडकर सुस्वभावी अशी मैत्रीण. ज्यावेळी मी तिला म्हटलं की, आपल्याला डिनर डेटवर जायचं आहे त्यावेळी ती हसली आणि म्हणाली की, जाऊ! मी म्हटलं कुठे? आणि दोन-चार पुण्यातील स्टार रेस्टॉरेंटची नावं घेतली, पण ती म्हणाली की, मला फक्त ‘विष्णूजी की रसोई’मध्येच जायला आवडेल. अशा गमतीत आमच्या गप्पांचा आणि खाण्याचा प्रवास सुरू झाला.

माझ्यासमोर बसल्यानंतर मी म्हटलं चला, फायनली ‘दी मृणाल देव-कुलकर्णी’ यांच्याबरोबर प्रत्यक्ष भेट आणि गप्पा घडणार… त्यावर खोडकरपणे म्हणाली, मला तू उगाच खूप मोठं बनवून बोलणार असशील तर मी जाते रे बाबा…! नंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिने काही स्टार्टर मागविले. त्यावरून असं लक्षात आलं की, तिला स्वयंपाकाची मनापासून आवड आहे आणि माहितीसुद्धा आहे.

नंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिने गप्पांच्या ओघात सांगितलं की, 12वीमध्ये शिकत असताना तिला मराठी दूरदर्शनवरील ‘स्वामी’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर बऱयाच टीव्ही मालिका, मराठी-हिंदी चित्रपट इत्यादीमध्ये ती व्यस्त होती. त्यात आई म्हणून मुलावरसुद्धा चांगले संस्कार घडत होते आणि त्याचंच फलित म्हणून मृणालचा मुलगा विराजस हा ‘विसलिंग वुडस्’ या सुभाष घईंच्या कॉलेजमधून बाहेर पडून त्याने स्वतंत्रपणे ‘ती ऍण्ड ती’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्याचे चित्रीकरण इंग्लंड येथे झाले आहे. मुलाने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात आईने भूमिका केल्याची ही पहिली वेळ असावी. गप्पांच्या ओघात स्टार्टर संपून जेवण कधी पुढय़ात आलं समजलंच नाही. तिथे समोर आलेला वडाभात आवडीने खाता-खाता पुरणाच्या पोळीचीसुद्धा फर्माईश केली. अभिनेत्री म्हणून तिच्या बऱ्याच मालिका गाजल्या आणि हिंदीमध्ये तिला ‘सोनपरी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. तिने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘प्रेम म्हणजे प्रेम’ आणि दुसरा ‘रमा माधव’.

मी जेव्हा मृणालला म्हटलं की, आपल्याला दिग्दर्शन करावसं का वाटलं की अनावधानाने आलीस? तर त्यांनी लगेच उत्तर दिले, खरं तर चित्रपट दिग्दर्शन करावे असा विचार कधीच केला नव्हता, पण पडद्यावर इतरांचे विचार मी केलेल्या भूमिकेतून लोकांसमोर येत होते, तेव्हा असं वाटलं की, आपले विचारसुद्धा या भूमिकेतून समोर यायला हवे. नंतर ते काय होते हे मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. मी तिला विचारले, आपल्याच दिग्दर्शनात आपण काम करणं हा अनुभव कसा राहिला तर ती म्हणाली, योग्य भूमिकेला योग्य तो न्याय देण्याचं काम मी माझ्या परीने चांगलं करण्याचा प्रयत्न केला.
जेवण आटोपता-आटोपता लक्षात आलं की, मृणाल प्रचंड फुडी जरी असली तरी खूप कमी जेवणारी व्यक्ती आहे. थोडं तिखट जेवणाकडे कल जास्त आहे, गप्पांमध्ये वेळ कसा गेला समजलंच नाही. आजूबाजूला बऱ्याच लहान मुलांची आणि त्यांच्या आई-वडिलांचीसुद्धा गर्दी झालेली दिसली. त्यांना सोनपरीबरोबर फोटो काढायचा होता.

पुडाची वडी

साहित्य – उडदाची डाळ अर्धी वाटी, चणा डाळ अर्धी वाटी, सुके खोबरं अर्धी वाटी, कढीपत्ता, मीठ, तिखट, साखर चवीनुसार, आमचूर पावडर अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, मैदा 1 वाटी, तांदळाची पिठी अर्धी वाटी, तेल 4 चमचे.

कृती – एका पॅनमध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ व अर्धी वाटी चणा डाळ तेलामध्ये परतून घ्या. त्याचबरोबर अर्धी वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी कढीपत्तासुद्धा परतून घ्या. सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा. त्यामध्ये चवीनुसार साखर, मीठ, तिखट, आमचूर, हिंग घाला. एक वाटी मैदा अर्धी वाटी तांदळाची पिठी चवीनुसार मीठ, थोडे तेल घालून त्याचा गोळा करा. त्याची पोळी लाटून त्यावर तयार पूड पसरवा. दुसरी पोळी लाटून त्यावर ठेवा. पुन्हा त्यावर पूड पसरवा. असे एकावर एक पाच थर करा व हलक्या हाताने वरून त्याला दाब द्या. नंतर चौकोनी तुकडे कापून मंद आचेवर तळून घ्या.

वडाभात

साहित्य – मूग डाळ अर्धी वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी, चणा डाळ अर्धी वाटी, मटकी पाव वाटी, चवळी अर्धी वाटी, तयार भात 3 वाटय़ा, आलं-लसूण पेस्ट 2 चमचे, लसूण 1 चमचा, हिरवी मिरची 5-6, कोथिंबीर पाव वाटी, अख्खे धने 2 चमचे, जिरे 2 चमचे, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, हिंग पाव चमचा, मोहरी 1 चमचा.

कृती – मूग, उडद, चणा, मटकी, चवळी 2 वाटी समप्रमाणात डाळी घेऊन, भिजवून वाटून घ्या. वाटताना त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे अख्खे धने, 1 चमचा जिरं घाला. नंतर या मिश्रणामध्ये चवीनुसार हळद, तिखट, मीठ, घालून वडे थापून तळून घ्या. मग हे तयार वडे तयार केलेल्या साध्या भातात कुस्करून एकत्र करा. त्यावर हिंग, मोहरी व जिऱयाची फोडणी घाला. कढीबरोबर खायला द्या.