स्वागत दिवाळी अंकाचे – ५

प्रतिबिंब

‘भूतकाळाचा अर्थ लावत भविष्याचा वेध घेत वर्तमानाची चिकित्सा’ ही टॅगलाइन घेऊन ‘प्रतिबिंब’चा पहिलाच दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे. दिवाळी हा सण विविध क्षेत्रांतील मान्यवरांना कसा वाटतो, कोणत्या आठवणी त्यांच्या मनी जागतात याचा वेध घेण्यात आला आहे. यात विश्वास नांगरे-पाटील, धनराज पिल्ले, लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) शैलेश रायकर, राजश्री ठाकूर, डॉ. अपर्णा लळिंगकर, सुवर्णा बारटक्के, रवी परांजपे, व्यंकटेश माडगूळकर, हेमंत कानिटकर, मोहन धारिया यांनी मनोगत व्यक्त केले आहे. निळू दामले, माधव दातार, डॉ. संपदा पाटगावकर, चिन्मय धारूरकर हे  लेख उत्तम.

संपादक हेमंत कर्णिक

मूल्य १८०रु.,  पृष्ठ – २२६

धनंजय

धनंजयचे हे ५७ वे वर्ष! यंदाच्या या अंकात कथांचे नवरंग दिसतील. डॉ. बाळ फोंडके, पूर्णिमा खरे, डॉ. द. व्यं. जहागीरदार, डॉ. अरुण मांडे, स्वरा मोकाशी, गिरीश देसाई, डॉ. प्रमोद कोलवाडकर यांनी केलेले लिखाण वाचकांना अंतर्मुख करते. डॉ. अनंत लाभसेटवार, कर्नल जयसिंग पेंडसे यांच्या युद्धकथा, अनिल पाटील, भालचंद्र देशपांडे यांची पोलीस तपासकथा, दीपा मंडलिक (सायकोथ्रिलर कथा), आल्हाद महाखळ (अमूर्तकथा) असे अनेक विषय या अंकात वाचायला मिळतील. याशिवाय डॉ. श्रीकांत मुंदरगी यांनी उत्तर कोरियाच्या लहरी हुकूमशहावर लिहिलेला विस्तृत लेख जमून आलाय. प्रसारमाध्यमांवर विदारक भाष्य करणारी आणि प्रगतीच्या नावाखाली स्वतःचा विकास साधणारी अशा दोन व्यंगकथांचा समावेश केला आहे.

संपादक नीलिमा राजेंद्र कुलकर्णी

मूल्य २५०रु.,  पृष्ठ – ३४०

मराठवाडा नेता

लातूरसारख्या शहरातून इंटरनेट दैनिक चालवत असलेले प्रा. रामेश्वर बद्दर यांनी यंदाचा दिवाळी अंक हा ‘हवामान बदल आणि शेती’ या विषयाला वाहिलेला आहे. त्यामुळे यात कथा, कविता, विनोदी लेख, ललित असे साहित्य नाही. अंकात प्रामुख्याने हवामान बदलामुळे हिंदुस्तानी शेतीपुढे निर्माण झालेला गंभीर धोका पर्यावरणतज्ञ, कृषितज्ञ, हवामान तज्ञ, भौतिक तज्ञ, आयटी क्षेत्रातील तज्ञ अशा विविध तज्ञांमार्फत २५ पेक्षा अधिक लेखांच्या माध्यमातून अधोरेखित केलेला आहे.

संपादक रामेश्वर बद्दर, रेणापूरकर

मूल्य १००रु., पृष्ठ – १००

उद्योजक

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे पोळून निघालेल्या आर्थिक जगताच्या वास्तवाचे भान ठेवूनही एकूणच लेख हे व्यवहारी उद्योजकीय मन घडवणारे असतील याची काळजी संपादक विलास आहेर यांनी घेतलेली आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार आणि विनोदी लेखक जयवंत काकडे यांच्या ‘उद्यमींचे आगळे वेगळे उद्योग’ या लेखापासून ते ‘उद्योग स्थापनेचा विचार करताना’ या लेखापर्यंत प्रत्येक लेख हा खुमासदारच आहे. डॉ. विलास सावजी यांनी बुलेट ट्रेन ही देशाची प्राथमिक गरज नसली तरी तंत्रज्ञान क्षेत्रातील एक झेप म्हणून त्याचा स्वीकार व्हावा असा आग्रह केलेला आहे. दिवाळी अंकात नवीन उद्योगासाठी मार्गदर्शक ठरणाऱया दहा प्रकल्प अहवालांचे नमुने दिलेले आहेत.

व्यवस्थापकीय संपादक विलास आहेर

मूल्य १५०रु., पृष्ठ – २२०

युगांतर

युगांतरच्या यंदाच्या अंकाचे  ‘दुष्काळी जमिनीवर ठेवलेली सलाईनची बाटली’ हे वैशाली नारकर यांचे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. जयदेव डोळे यांचा आरएसएस वरील लेख, संजीव चांदोरकर, श्रीनिवास खांदेवाले, अतुल देऊळगावकर यांचे आर्थिक आणि सामाजिक विषयावरचे लेख, तिहेरी तलाक या विषयावर इमारते शरीयाचे मुख्य काजी मोहम्मद युनुस कासमी यांची तृप्ती डिग्गीकर यांनी घेतलेली मुलाखत वाचनीय आहे.

संपादक डॉ. भालचंद्र कानगो

मूल्य १००रु., पृष्ठ –  २६०

स्वप्ना

यंदाचा हा दिवाळी अंक ‘बालक विशेषांक’ म्हणून प्रकाशित झाला आहे. त्याच अनुषंगाने या अंकात बालसाहित्याचा भरगच्च मजकूर आहे. भा. ल. महाबळ, प्रा. रेखा नाबर, जोसेफ तुस्कानो, सुमन याडकीकर, मानसी हिंगे, राजेंद्र वैद्य, मीना शेषू यांच्या कथांचा समावेश आहे. याशिवाय न्यायनिवाडा – बालनाटय़ (जयश्री दानवे), पालकत्व बालकांचे (ऍड. हर्षलिनी पाटील), मराठी चित्रपटातील बालगीते (डॉ. श्रीकांत नरुले), बालसंगोपन (माधव पल्लडवार), मी सायबाची माय (प्रा. देवबा शिवाजी पाटील) हे लेख वाचनीय आहेत.

संपादक – वि. द. बर्वे

मूल्य – १०० रु., पृष्ठ – २७६.