आयफोन महागणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तुम्ही जर ऍपलचा आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. ऍपलने आयफोनच्या किमती ३.५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आयफोनच्या प्रेमात असणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. ‘आयफोन एसई’ सोडून ऍपलच्या सर्व मॉडल्सच्या किमतीत वाढ होणार आहे. आयफोन एसईची निर्मिती हिंदुस्थानातच होणार असल्याने या फोनची किंमत वाढणार नाही.

केंद्र सरकारने नुकतेच मोबाईल फोन, व्हिडीओ कॅमेरा आणि टीव्हीवरील आयात करात वाढ केली असून मोबाईलवरील आयात कर ५ टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ऍपलने आपल्या सर्व आयफोनच्या किमतीत वाढ केली आहे. ऍपलच्या वाढीव किमती १८ डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. आयफोन ६ च्या किमतीत सर्वाधिक ४.३ टक्के वाढ झाली आहे. तर २५६ जीबी वाल्या आयफोन ८ ची किंमत ३.१ टक्क्यांनी वाढली आहे. आता आयफोन ६ रुपये ३० हजार ७८० ला मिळणार असून या पूर्वी या फोनसाठी २९ हजार ५०० रुपये मोजावे लागत होते.

तसेच ऍपलचा फ्लॅगशीप फोन ८९ हजारांऐवजी ९२ हजार ४३० रुपयांना मिळेल. आयफोन ८ हा ६४ हजारांऐवजी ६६ हजार १२० रुपये तर ८ प्लस ७३ हजारांऐवजी ७५ हजार ४५० रुपयांना मिळेल. आयफोन ७ आणि ७ प्लसच्या किमती अनुक्रमे ५० हजार ८१० आणि ६१ हजार ६० रुपये त्याचबरोबर ६ एस आणि एस प्लस अनुक्रमे ४१ हजार ५५० आणि ५० हजार ७४० दराने मिळेल.