गतविजेत्या हैदराबादचा सामना मुंबईशी

सामना ऑनलाईन । हैदराबाद

कायरॉन पोलार्ड, लेण्डल सिमन्स यांची दमदार फलंदाजी अन् लसिथ मलिंगा, हरभजन सिंगसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा धुव्वा उडवला आणि आयपीएलच्या प्ले ऑफ लढतींमध्ये धडक मारली. आता उद्या रोहित शर्माच्या ब्रिगेडला गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादचा सामना करावयाचा आहे. डेव्हिड वॉर्नरच्या सेनेने आतापर्यंत १२ सामन्यांमधून सहा विजयांनिशी १३ गुणांची कमाई केलेली आहे. त्यामुळे उद्याची लढत त्यांच्या प्ले ऑफमधील प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाने प्ले ऑफमध्ये धडक मारल्यामुळे त्यांना आता संघामध्ये बदल करता येणार आहेत. निरनिराळे पर्याय त्यांना पडताळून पाहता येतील. बेंचवर बसलेल्यांना अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येऊ शकते. मुंबई इंडियन्सचे संघव्यवस्थापन उद्या कोणाकोणाला संधी देते हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र पहिल्या दोन स्थानांवर कायम राहण्यासाठी दोन वेळचा चॅम्पियन संघ उर्वरित लढतींमध्ये निष्काळजी राहणार नाही. कारण पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्यास अंतिम फेरीत पोहचण्याच्या दोन संधी उपलब्ध होतात. इलिमिनेटर लढतीत विजय मिळवणाऱ्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी प्राप्त होते.