किंग्ज इलेव्हन पंजाब प्रिव्ह्यू : पंजाब आयपीएलचा ‘किंग’ होणार का?

ganesh-puranik>> गणेश पुराणिक | मुंबई

किंग्ज ११ पंजाब’ या संघाच्या नावात जरी किंग असले तरी अद्यापही या संघाला एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. पहिल्या सत्रामध्ये सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या पंजाबची कामगिरी त्यानंतर सातत्याने घसरत गेली. २००८ मध्ये सेमिफायनल खेळणारा हा संघ २०१० मध्ये चक्क आठव्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यानंतरची तिन्ही वर्ष पंजाबच्या संघासाठी दुख:द स्वप्नासारखीच राहिली. कधी पाचव्या तर कधी सहाव्या स्थानावर राहिलेल्या पंजाबचे सितारे २०१४ मध्ये चमकले आणि जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने दिग्गज संघांना मात देत फायनलमध्ये धडक मारली. परंतु फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे २०१४ मध्ये फायनलपर्यंत धडक मारणारा पंजाबचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये आर. अश्विनच्या नेतृत्वाखाली ‘किंग’ होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

जमेची बाजू

यंदाच्या आयपीलसाठी पंजाबचे विस्फोटक सलामीवीर ही त्यांची जमेची बाजू आहे. कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटून टाकण्यास सक्षम असलेले ख्रिस गेल, अॅरॉन फिंच हे अनुभवी आणि विस्फोटक फलंदाज पंजाबकडे आहेत. गेलच्या नावावर आयपीएलमधील क्रिकेटमधील सर्वाधिक (१७५ नाबाद) धावांचा आणि सर्वात वेगवान शतकाचा (३० चेंडूत) विक्रम आहे. यंदा अगदी शेवटच्या क्षणी पंजाबच्या टीममध्ये दाखल झालेल्या गेलकडून अशाच खेळीची पुनरावृत्ती करण्याची फॅन्सना आशा असेल. तर मधल्या फळीत पंजाब दा पुत्तर युवराज सिंह, लोकेश राहुल, डेव्हिड मिलर आणि मनोज तिवारी हे दिग्गज फलंदाज आहेत.

दिल्ली डेअरडेव्हिल्स प्रिव्ह्यू : गंभीर- पॉन्टिंगची जोडी कमाल करेल?

फलंदाजांप्रमाणे गोलंदाजीमध्येही पंजाबकडे काही किंग खेळाडू आहेत. आर. अश्विन आणि अक्षर पटले या फिरकीच्या दुकडीवर पंजाबच्या गोलंदाजीची धुरा असणार आहे. अक्षर पटेलने आयपीएलमध्ये ७.४२ च्या आणि अश्विनने ६.५५ च्या सरासरीने गोलंदाजी केली असल्याने विरुद्ध संघाच्या फलंदाजांना अंकुश लावण्याचे काम या दोघांवर असणार आहे. अॅन्ड्र्यू टाय, अंकित राजपूत, मोहित शर्मा यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे.

ऑलराऊंडरचा ताफा

टी-२० च्या सामन्यात संघामध्ये ऑलराऊंडर खेळाडू असणे नेहमीच फायद्याचे असते. पंजाबकडे उपयुक्त ऑलराऊंडर खेळाडूंचा ताफा आहे. संघातील बहुतांश खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे संघाचा चांगला समतोल दिसून येत आहे. युवराज सिंह, ख्रिस गेल, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, अश्विन हे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कमाल दाखवतील हे नक्की.

अडचणीच्या बाजू

फलंदाजीमध्ये पंजाबचा संघ विस्फोटक दिसत असला तरी ख्रिस गेल, अॅरॉन फिंच आणि डेव्हिड मिलर यांना खेळवल्यानंतर गोलंदाजीत मार्क स्टॉयनिस किंवा अॅन्ड्र्यू टाय यापैकी एकाला खेळवावे लागेल. त्यामुळे गोलंदाजी कमजोर पडण्याची शक्यता आहे. तसेच पंजाबकडे चांगला यष्टीरक्षक नसल्याने या जागेसाठी अक्षदीप नाथ आणि लोकेश राहुल या कामचलाऊ यष्टीरक्षकांना हे काम करावे लागेल. तसेच गोलंदाजीमध्ये अनुभवाची कमतरता असल्याने एखादा मुख्य गोलंदाज जायबंदी झाल्यास संघ अडचणीत येऊ शकतो.

परदेशी खेळाडूंचे समीकरण

पंजाबच्या संघामध्ये मार्क स्टॉयनिस, डेव्हिड मिलर आणि अॅन्ड्र्यू टाय या तिघांची जागा पक्की मानली जात आहे. त्यामुळे चौथ्या जागेसाठी ख्रिस गेल आणि अॅरॉन फिंचमध्ये स्पर्धा असेल. फलंदाजामध्ये एखादा प्रमुख विदेशी खेळाडू जायबंदी झाल्यास पर्यायी खेळाडू आहे, परंतु मुख्य गोलंदाज टाय जायबंदी झाल्यास पंजाबसाठी ती धोकादायक गोष्ट ठरणार आहे.

संभाव्य ११ खेळाडू

१) ख्रिस गेल / अॅरॉन फिंच 2) मयांक अग्रवाल ३) लोकेश राहुल ४) करुण नायर ५) युवराज सिंह ६) डेव्हिड मिलर ७) मार्क स्टॉयनिस ८) अक्षर पटेल ९) आर. अश्विन १०) मोहित शर्मा ११) अॅन्ड्र्यू टाय

आमचा अंदाज

विस्फोटक फलंदाज आणि ऑलराऊंडर खेळाडूंच्या जोरावर पंजाबला प्ले ऑफ गाठण्याची चांगली संधी आहे.