कोलकाता-हैदराबाद आमने सामने, आयपीएलच्या फायनलसाठी मुकाबला

11


सामना ऑनलाईन, कोलकाता

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दुसरा फायनलिस्ट कोण? याचे उत्तर आज तमाम क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. केन विल्यमसनचा सनरायझर्स हैदराबाद व दिनेश कार्तिकचा कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांमध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे क्वॉलिफायर टूची लढत होणार असून यामधील विजेता संघ येत्या रविवारी होणाऱया अंतिम लढतीत चेन्नई सुपरकिंग्जशी दोन हात करणार आहे. बघूया उद्या कोणता संघ सरस ठरतोय ते…

डय़ुप्लेसिसमुळे विजय दुरावला

केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीला शानदार कामगिरी करीत प्ले ऑफचे तिकीट बुक केले. पण क्वॉलिफायरच्या पहिल्या लढतीत हातातोंडाशी आलेला विजय चेन्नई सुपरकिंग्जच्या फाफ डयुप्लेसिसने त्यांच्याकडून हिरावून घेतला. त्यामुळे उद्या त्यांचा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरतोय की नाही हे पाहणेही रंजक ठरणार आहे.

दुसऱयांदा अंतिम फेरीत पोहोचण्यासाठीच…

क्वॉलिफायरच्या पहिल्या लढतीत पराभूत झाल्यानंतरही अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी केन विल्यमसनच्या ब्रिगेडला आणखी एक संधी असणार आहे. उद्या त्यांनी कोलकाता नाइट रायडर्सला लोळवल्यास त्यांना आयपीएलच्या इतिहासात दुसऱयांदा अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे. याआधी २०१६ साली त्यांनी चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता.

२०१4 सालानंतर..

गौतम गंभीरने नेतृत्वपद सोडल्यानंतर दिनेश कार्तिककडे कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले. श्रीलंकेतील तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दबावाखाली संस्मरणीय कामगिरी करणाऱया दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने जबरदस्त कामगिरी करीत संघाला इथपर्यंत पोहचवले आहे. एलिमिनेटर लढतीत राजस्थान रॉयल्सला पराभूत करताना कोलकाता नाइट रायडर्सने शानदार कामगिरी केलीय. याआधी त्यांनी २०१२, २०१४ सालामध्ये जेतेपदावर नाव कोरले होते. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा अंतिम फेरीत जाण्यासाठी संघ प्रयत्न करील यात शंका नाही.

आजची क्वॉलिफायर टू लढत

  • कोलकाता नाइट रायडर्स वि.
  • सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
  • थेट प्रक्षेपण ‘स्टार’ वाहिनीवर रात्री ७ वाजता
आपली प्रतिक्रिया द्या