#IPL2019 ‘आरसीबी’ला मोठा धक्का, ‘स्टेन गन’ची स्पर्धेतून माघार

4

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएलमधील सर्वात तगडा संघ म्हणून पाहिला जाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची अवस्था खराब आहे. ‘करो या मरो’च्या गर्तेत अडकलेल्या बंगळुरुला आणखी एक धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकणार आहे.

आयपीएल 2019 च्या मोसमाची सुरुवात बंगळुरुसाठी खराब झाली होती. सुरुवातीच्या सलग पराभवानंतर बंगळुरूने वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा संघात समावेश केला होता. स्टेनच्या आगमनामुळे बंगळुरूची गोलंदाजी धारधार झाली होती आणि विराटचा संघ विजयाच्या मार्गावर परतला होता. परंतु खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे स्टेन आयपीएलमधून बाहेर पडला आहे. स्टेन उर्वरित सामने खेळणार नसल्याने बंगळुरूने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कॉल्टर नाईटचा संघात समावेश केला आहे.

स्टेनने आयपीएलच्या 12 व्या मोसमात फक्त दोन सामने खेळले. या दोन्ही सामन्यात त्याने दमदार गोलंदाजी करताना 4 बळी मिळवले. बुधवारी झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात खांद्याच्या दुखापतीमुळे स्टेन मैदानात उतरू शकला नाही. या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला. परंतु स्टेनची दुखापत गंभीर असल्याने तो आयपीएललाच मुकणार असल्याने आरसीबीपुढील आव्हान वाढले आहे. बंगळुरूने 11 सामन्यात 4 विजयांसह 8 गुण मिळवले असून गुणतालिकेत विराटचा संघ सातव्या स्थानावर आहे.

दरम्यान, आगामी विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात डेल स्टेनला स्थान देण्यात आले आहे. स्टेन आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे खांद्याला झालेल्या दुखापतीचे गांभिर्य ओळखून उर्वरित सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.