कबड्डीत हिंदुस्थानचे साम्राज्य खालसा

सामना ऑनलाईन । जकार्ता 

आशियाई क्रीडा स्पर्धेत हमखास सुवर्णपदकाचे हक्कदार असलेल्या हिंदुस्थानच्या पुरुष कबड्डी संघाचे या खेळातील साम्राज्य गुरुवारी खालसा झाले. हिंदुस्थानच्या दृष्टीने स्पर्धेतील हा सर्वात खळबळजनक निकाल ठरला. आशियाई क्रीडा स्पर्धेत 1990पासून कबड्डीला स्थान मिळाले. तेव्हापासून हिंदुस्थानने झालेल्या सातही स्पर्धांत सुवर्णपदकांची कमाई केलेली आहे. मात्र कबड्डीमध्ये नवी शक्ती म्हणून उदयास आलेल्या इराणच्या संघाने हिंदुस्थानला 27-18 अशी मोठय़ा फरकाने धूळ चारून अंतिम फेरीत धडक दिली. हिंदुस्थानला आता कास्यपदकावरच समाधान मानावे लागेल. इराण आणि दक्षिण कोरिया यांच्यातील अंतिम लढतीनंतर नव्या सुवर्णपदक विजेत्या संघाचा जन्म होणार आहे.

साखळी फेरीत दक्षिण कोरियाकडून हिंदुस्थानला एका गुणाने हार पत्करावी लागली. त्यावेळीच इराणविरुद्ध लढतीत हिंदुस्थानचे काय होणार अशी दबक्या आवाजात कबड्डी वर्तुळात चर्चा सुरू होती. पहिल्या सत्रात हिंदुस्थानी चढाईपटूंनी लौकिकास साजेशी सुरुवात केली. रिशांक देकाडीगाने केलेल्या आक्रमक चढायांमुळे हिंदुस्थानने 6-1 अशी मुसंडी मारली होती, मात्र इराणच्या प्रशिक्षकांनी अबुफजल मग्शदुलूला मैदानात उतरविले अन् इराणच्या खेळात आमूलाग्र बदल झाला. फैजल अत्राचली, अबुझार मेघानी, मोहसीन मग्शदुलू यांनी बचाकात सुपर टॅकल करत इराणला बरोबरी साधून दिली. प्रदीप नरकाल, अजय ठाकूर यासारख्या मातब्बर खेळाडूंना इराणच्या बचाकपटूंनी आपल्या जाळ्यात अडकले. पहिल्या सत्राच्या अखेरीस दोन्ही संघांमध्ये 9-9 अशी बरोबरी होती.

दुसऱ्या सत्रात इराणच्या खेळाडूंच्या आक्रमक खेळाने हिंदुस्थानी खेळाडू काहीसे भांबावून गेले. हिंदुस्थानच्या चढाईपटूंच्या पकडी होत गेल्या. मोनू गोयत, प्रदीप नरकाल यासारख्या खेळाडूंना गुणांची कमाई करता आली नाही. त्यातच फैजल अत्राचली आणि अजय ठाकूरला यांच्यात झालेल्या झटापटीदरम्यान अजय ठाकूर जखमी झाला. त्यामुळे हिंदुस्थानी संघाचा कर्णधार बाहेर गेल्यामुळे संघाचे मनोधैर्यही काहीसे खच्ची झाले. याचाच फायदा घेत इराणने हिंदुस्थानवर लोण चढवून मोठी आघाडी घेतली. इराणच्या अब्बासी मैसामने याकेळी दोन केळा सुपर टॅकल केल्यामुळे इराणच्या गुणांमध्ये काढ झाली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील बाराक्या मिनिटाला इराणने 17-13 अशी आघाडी घेतली होती. सामन्याला तीन मिनिटे शिल्लक असताना इराणने आपली आघाडी 25-14 अशी आणखी भक्कम केली होती. अखेर 27-18 च्या फरकाने सामना जिंकत इराणने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.

महिला संघ अंतिम फेरीत
हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. उपांत्य लढतीत हिंदुस्थानने चीन तैपेईचा 27-14 गुणफरकाने पराभक केला. भारतीय महिलांनी पहिल्या सत्रात 11-8 अशी आघाडी घेतली होती. हिंदुस्थानकडून पायल चौधरी, रणदीप कौर, साक्षी यांनी चढाईत चांगली कामगिरी केली. बचाकात रितू नेगीनेही काही चांगल्या पकडी केल्या. दुसऱ्या सत्रानंतर चीन तैपेईच्या खेळाडूंच्या खेळात काहीशी सुधारणा झालेली पाहायला मिळाली. मात्र तरीही हिंदुस्थानी महिलांनी सामन्याकरील आपली पकड ढिली पडू दिली नाही.