इराणी करंडक शेष हिंदुस्थानकडेच

इराणी करंडकाचा अंतिम सामना अनपेक्षितपणे तिसऱ्याच दिवशी संपला. शेष हिंदुस्थान आणि सौराष्ट्रचे दुसरे डाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आणि तिसर्या दिवशी उभय संघाचे 21 फलंदाज बाद झाल्यामुळे इराणी करंडकाचा फैसलाही तिसऱ्याच दिवशी लागला. विजयासाठी असलेले 255 धावांचे लक्ष्य सौराष्ट्रला पेलवलेच नाही. सौरभ कुमारच्या अफलातून फिरकीपुढे सौराष्ट्रचा संघ अवघ्या 79 धावांतच आटोपला आणि शेष हिंदुस्थानने 175 धावांच्या विजयासह सलग तिसऱ्यांदा इराणी करंडक जिंकण्याचा पराक्रम केला.

शेषकडे पहिल्या डावात 94 धावांची आघाडी असल्यामुळे सौराष्ट्रसमोर विजयासाठी 255 धावांचे आव्हान होते, पण रणजी विजेत्या सौराष्ट्रची फलंदाजी दुसऱ्या षटकापासूनच ढेपाळली. त्यांच्या पडझडीला कुणीच रोखू शखला नाही आणि सौरभ कुमारच्या फिरकीपुढे त्यांची 8 बाद 51 अशी दयनीय अवस्था झाली. धर्मेंद्रसिंह जाडेजाने 21 धावा केल्यामुळे सौराष्ट्रचा डाव 79 धावांवर संपला.

तिसऱ्याच दिवशी इराणी करंडक खल्लास
सोमवारी दुसऱ्या दिवशी सौराष्ट्रने 9 बाद 212 धावा केल्या होत्या. आज सकाळी अवघ्या दोन धावांची भर घालून सौराष्ट्र 214 धावांवर बाद झाली. शेषकडे 94 धावांची आघाडी होती. दुसऱया डावात साई सुदर्शन (43) आणि मयांक अगरवाल (49) यांनी 85 धावांची सलामी दिली, पण ही जोडी फुटल्यानंतर पार्थ भुतने शेष हिंदुस्थानला झपाटले. 2 बाद 133 अशा सुस्थितीत असलेल्या शेषचा डाव भुतने अवघ्या 160 धावांत गुंडाळला. 27 धावांत शेषचे आठ फलंदाज बाद झाले. पहिल्या डावात 94 धावांत 5 विकेट घेणाऱ्या भुतने दुसऱ्या डावात 57 धावांत 7 विकेट घेतले.