स्वतंत्र कुर्दिस्तानच्या दिशेने…

>>मुजफ्फर हुसेन<<

m_hussain१९४५@yahoo.com

इराक या देशाचे तीन तुकडे करण्याची अमेरिकेची योजना आहे. त्यातील एक तुकडा हा कुर्दिस्तान असेल. कुर्दिस्तान हा जगातील सर्वाधिक तेलाचे साठे असलेल्या दहा प्रांतांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचे एक महत्त्व आहे. अमेरिकेने आखाती युद्धानंतरच या प्रश्नाला हात घातला आणि कुर्दिस्तानात एक कुर्द जमातीचे स्थानिक प्रांतीय सरकार स्थापन आणि कार्यरत झाले. याच कुर्दांना स्वतंत्र राष्ट्र हवे की नको यावर नुकतीच जनमत चाचणी घेण्यात आली.

ज्या धर्माच्या नावावर हिंदुस्थानचे विभाजन झाले आहे त्याच धर्माचे समर्थक सध्या मध्यपूर्वेतील अनेक देश विभाजित करण्यासाठी सक्रिय आहेत. काही काळापासून इराकमध्ये कुर्द शक्ती सक्रिय झालेली आहे. इराण-इराक युद्ध अतिशय विनाशकारी होते खरे. परंतु त्यानंतर इराकची आता अशी परिस्थिती झालेली आहे की, त्याचे तीन तुकडे पाडले जाण्याचीच शक्यता अधिक आहे. इराकचे शियाबहुल, सुन्नीबहुल आणि कुर्द अशा तीन तुकडय़ात विभाजन करण्याबाबत एक जनमतचाचणी घेण्यात आल़ा गेल्या २५ सप्टेंबर रोजी उत्तर इराकमधील अरबिल शहरातील क्षेत्रीय सरकारने स्वतंत्र कुर्दिस्तानच्या स्थापनेसाठी इराकपासून विभाजित होण्याबाबत ही जनमत चाचणी घेतली. वास्तवात ही काही नवी योजना नव्हे. मध्यपूर्वेतील देशांचे योजनाबद्ध तुकडे पाडण्याचे हे एक विचारपूर्वक केलेले षड्यंत्र आहे.

२००३ मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ले केले होते तेव्हाच या योजनेचा बिगूल वाजलेला होता. कुर्द लोकांनी त्या वेळीच इराकमधून वेगळे होण्याबाबत आपले मत व्यक्त केलेले होते. या जनमत चाचणीनुसार पावले उचलली गेल्यास स्थानिक पातळीवर सर्वाधिक संख्येने असलेल्या कुर्द लोकांना एक स्वतःचा देश मिळेल. कुर्दस्तान स्वतंत्र झाल्यास तो जगातील सर्वात मोठय़ा तेलउत्पादक देशांपैकी दहाव्या क्रमांकाचा देश ठरेल. आजही याच क्षेत्रातून चीन, अमेरिकेशिवाय जगभरातील असंख्य देशांना तेलाचा पुरवठा केला जातो. एका अंदाजानुसार कुर्दांची जनसंख्या साडेतीन ते चार कोटीच्या आसपास असून ते केवळ इराकमध्येच नव्हे तर इरान, तुर्कस्तान, सीरिया आणि मध्यपूर्वेच्या अनेक देशांमध्ये, युरोप आणि अमेरिकेतही आढळतात. एकटय़ा जर्मन देशात १५ लाख कुर्द राहतात. इराकची परिस्थिती अतिशय किचकट आहे त्यामुळे जनमत चाचणीचा निकाल काहीही लागू शकतो. यापूर्वी स्काटलॅण्डच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटनमध्ये तर क्युबन प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी कॅनडात जनमत चाचण्या घेतल्या गेल्या पण त्या स्वातंत्र्याविरुद्ध गेल्या. तथापि ९ वर्षांपूर्वी सीरियातून कोसोवा स्वतंत्र करण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली ती यशस्वी ठरली. परिणामी, आज कोसोवाचे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व आहे. इराक हा काही कॅनडा किंवा ब्रिटन नाही, येथील परिस्थिती जगात सर्वात वाईट आहे.

अमेरिकेतील जियो मिलिट्रीचे विश्लेषक असे लिहितात की, अमेरिकेचा असा सिद्धांत आहे की, जे त्याला मिळू शकत नाही ते तोडून टाका. कारण ते मग दुसऱ्या कुणाला मिळायला नको. मिळाले तरी त्याचा उपयोग व्हायला नको. या सिद्धांतामुळेच अमेरिका जगात आपले वर्चस्व राखून आहे. एवढेच नव्हे तर याचमुळे अमेरिका आज जगात महाशक्तीचे स्थान टिकवून आहे. आता कुर्द हा एक असा समूह आहे जो अमेरिकेसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अमेरिका त्याचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. या प्रांतात इतर कुणाला पाय रोवता यायला नको म्हणून अमेरिका सीरियाला, रशियाला विभाजित केल्याशिवाय राहणार नाही. इराक हा अतिशय दुबळा झालेला आहेच. स्वतंत्र कुर्दिस्तानची निर्मिती करून सीरियालाही अतिशय दुबळे करून ठेवण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. सीरिया दुबळे झाले म्हणजे तुर्कस्तान आणि इराणवरही आपोआप दबाव निर्माण होईल. हा दबाव निर्माण करणे आणि तो वाढवत नेणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात आपला उल्लू सिधा करणे हेच तर अमेरिकेचे मूळ धोरण आहे.

परंतु अमेरिकेच्या स्वतंत्र कुर्दिस्तानच्या योजनेला रशियाचा प्रखर विरोध आहे. रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकने स्थानिकांच्या काही मुलाखती प्रसारित केल्या. त्यानुसार या स्थानिक लोकांना वाटते की, स्वतंत्र कुर्दिस्तानसाठी केवळ अमेरिकाच पुढाकार घेत आहे. मुलाखतींमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सीरियातील कुर्द लोकांना दाईश लोकांविरुद्ध लढवण्यामागे कुर्दांचा स्वतंत्र देश निर्माण करावा हाच अमेरिकेचा उद्देश होता. अमेरिका असे बिंबवण्याचा प्रयत्न करते आहे की, दाईशविरुद्ध लढणारी सर्वात मोठी शक्ती कुर्द हीच आहे. आज अमेरिका कुर्दांना केवळ प्रशिक्षणच देत नाही तर लष्करी हत्यारेही तो पुरवतो. अमेरिका कुर्दांना एक लष्करी शक्ती म्हणून पुढे आणतो आहे. स्थानिक लोकांना असे वाटते की, या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अंकारा आणि दमिश्क एकत्र आले पाहिजे.

स्वतंत्र कुर्दिस्तान निर्माण झाल्यास इराण आणि तुर्कस्तानातही अंतर्गत विद्रोह उसळून वर येईल, अशी भीती या दोन्ही देशांना असल्यामुळे इराण आणि तुर्कस्तानचाही या योजनेला प्रखरपणे विरोध आहेच. कुर्दिस्तानात प्रांतीय सरकार आहे. आखाती युद्धाच्या पुढल्या दोन वर्षांत ते अस्तित्वात आलेले आहे. तेव्हापासून ते आपला लोकशाहीचा मुखवटा कायम राखून आहेत. सध्या तो इराकचाच एक प्रांत आहे. इराकी संविधानानुसार अंतर्गत बाबींबद्दल सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या प्रांतीय सरकारला आहेत तर आंतरराष्ट्रीय बाबतीत मात्र  बगदादच्या केंद्रीय सरकारला अधिकार आहेत. कुर्द सरकारने सीरियातील दाईशबहुल क्षेत्र २०१४ पासून आपल्या ताब्यात घेतलेले आहे. ताब्यात घेतलेल्या या भागात मोठय़ा प्रमाणात तेलाचे साठे आहेत. मात्र या भागात कुर्दांसोबतच मोठय़ा संख्येने तुर्क आणि अरबही आहेत. असे म्हणतात की, राष्ट्रपती सद्दाम हुसैन यांच्या काळात लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अरबांना या भागात नियोजनबद्ध पद्धतीने वसवले होते. परिणामी ९०च्या दशकात हे संपूर्ण क्षेत्र अरबबहुलच झालेले आहे. नवख्या लोकांचा असा समज होतो की, हा संपूर्ण प्रदेश अरबीच आहे, त्यामुळे येथे अरब येऊन वसले आहेत. गेल्या काही काळापासून इराकी अरबही या भागात येऊन राहू लागले आहेत. त्यातून मग जुन्या मूळ रहिवाशांसोबत त्यांचा संघर्ष होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आज या भागातील मूळ बोलीभाषा जाऊन तिची जागा अरबीने घेतलेली आहे. परिणामी स्थानिक आणि बाहेरचे असा येथे संघर्ष आता मूळ धरू लागला. आज आतल्या आत ज्वालामुखी धगधगतोय! आता असा प्रश्न निर्माण होतोय की, स्वतंत्र कुर्दिस्तान राष्ट्र निर्माण करण्याचे स्थानिकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते का? आंतरिक प्रवाह तर वेगात आहे. परंतु विविध जाती आणि वंशाच्या लोकांचे समूह असलेल्या या प्रांतात कुर्दिस्तानचा स्थापनेचा उद्देश सफल होऊ शकतो का, हा खरा प्रश्न आहे. दिवसेंदिवस कुर्दिस्तानची मागणी तीक्र होत असून एक मागणी पूर्ण झाल्यास या भागात अशा प्रकारच्या अनेक मागण्या उद्भवतील. मग प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच मार्गाने शोधायचे काय? असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे खेळाडू याकडे भविष्यात कोणत्या दृष्टीने पाहतात आणि भविष्याच्या गर्भात आणखी कोणती परिवर्तने दडलेली आहेत ते आताच सांगता येणे शक्य नाही. परंतु इराक, सीरिया, तुर्कस्तान आणि या भागातील विविध लष्करी शक्ती ज्यात दाईश हीसुद्धा एक लष्करी ताकद आहेच त्यांच्याही आपल्या भूमिका असणार आहेत. त्यामुळे भविष्यात काय घडेल हे आताच सांगता येणे शक्य नाही.