इरफान खान साकारणार डॉ. कलाम यांची भूमिका

सामना ऑनलाईन । मुंबई

माजी राष्ट्रपती व हिंदुस्थानचे मिसाईल मॅन म्हणून ख्याती असलेले डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ.अब्दुल कलाम’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.  या पोस्टरमधून चित्रपटात कलामांची भूमिका कोण करत आहे ते स्पष्ट होत नसले तरी अभिनेता इरफान खान ही भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. सर्वप्रथम हा चित्रपट इंग्रजी भाषेतून शूट केला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रमोद गोरे करणार आहेत. प्रमोद यांनी नुकतेच इरफान खान यांची भेट घेऊन त्यांना या भूमिकेबद्दल सांगितले आहे. इरफान यांनी देखील भूमिकेसाठी होकार दिल्याचे समजते. पण अद्याप त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.