IRONMAN…चिवट जिद्द…इच्छाशक्ती!

मुलाखत संजीवनी धुरीजाधव, जयेंद्र लोंढे

जगात सर्वात कठीण समजली जाणारी फ्रान्समधली ट्रायथलॉन स्पर्धा यंदा हिंदुस्थानी आय.पी.एस.अधिकारी कृष्णप्रकाश यांनी जिंकली आहे. आयर्नमॅन हा स्पर्धेचा किताब जिंकणारे ते दुसरे हिंदुस्थानी आणि देशातील पहिले पोलीस अधिकारी ठरले आहेत. या स्पर्धेत त्यांनी ४२ कि.मी. धावणे. १८० कि.मी.सायकलिंग आणि३.८६ कि.मी.पोहणे हे अवघ्या १४ तास ८ मिनटांत पूर्ण केले. कृष्णप्रकाश महाराष्ट्रातील अनेक जिह्यात त्यांनी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. पाहूया हे शिवधनुष्य त्यांनी कसे लीलया पेलले…

 जगातील सर्वात खडतर समजल्या जाणाऱया शर्यतीबद्दल सांगा

– ट्रायथलॉनमध्ये पोहणे, सायकलिंग व धावणे हे खेळांचे तिन्ही प्रकार १६ तासांच्या आत पूर्ण करावयाचे असतात. तिन्ही प्रकारांत सलग यश मिळणेही तेवढेच गरजेचे असते. अन्यथा तुम्ही अपात्र ठरता. मिलिंद सोमण यांनी १५.१९ अशी वेळ देत ट्रायथलॉन पूर्ण केले होते. मला १४  तास आठ मिनटांत लक्ष्य गाठता आले.

आयर्नमॅन कसे काय डोक्यात आले?

– खरं तर माझ्या डोक्यात असे काही नव्हते की, मला ‘आयर्नमॅन’चा किताब जिंकायचा आहे. पण आठ महिन्यांपूर्वी मी मालेगावात ‘शांतता दौड’मध्ये सहभागी झालो होतो. ही दौड संपली आणि तिथे एक प्रेझेंटेशन ठेवण्यात आले होते ते पाहून मलाही एक ऊर्जा मिळाली. प्रमुख अतिथी असल्यामुळे मी त्यांच्यासमोर घोषणा केली की, आतापासून मी केवळ धावत होतो. पण मी याच वर्षी आयर्नमॅन करेन. सर्वांनी मला समजावले तेव्हा सुरुवातीला फुल आयर्नमॅन नको करूस.  त्यासाठी एक-दोन वर्षे लागतात. लगेच कोणी होत नाही. मला असे वाटले की, मी करू शकतो असा विश्वास वाटला. मी स्वीमिंग पूलमध्ये पोहायला शिकलो नाही तर गंगा नदी, तलाव, कान्हेरी लेक यासारख्या ठिकाणी पोहायचो. त्यामुळे कुठे तरी माझा स्वतःवर विश्वास होता. मी करू शकणार. हां, त्यात मला थोडी सुधारणा करावी लागणार; पण मी करू शकेन असा विश्वास होता आणि त्या विश्वासावरच मी त्या दिशेने प्रयत्न केले.

सराव करताना आहारावर लक्ष केंद्रित कसे केले?

डॉ. आनंद पाटील आणि डॉ. सनी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मी आहार घेत होतो. सराव करताना सगळय़ात आधी कॅलरीज् निश्चित करून घेतल्या. त्यानंतर शरीराला कोणत्या प्रकारची कॅलरीज् आवश्यक आहेत हे जाणून घेतले. ठरावीक अंतर पार करण्यासाठी नेमक्या किती कॅलरीज् लागेल याची माहिती घेतली.

 ट्रायथलॉनसारख्या अवघड क्रीडा शर्यतीची पूर्वतयारी

– ट्रायथलॉनमध्ये धावणे, सायकलिंग व जलतरण या तीन क्रीडा स्पर्धांचा समावेश असतो. यामधील धावणे हे तर मी नित्यनियमाने करीत होतो. त्यामुळे जलतरण व सायकिंलग या दोन खेळांवर जास्त लक्ष केंद्रीत करावयाचे होते. मे महिन्यात ट्रायथलॉनमधील सहभाग निश्चित झाला. त्यानंतर ऑगस्टच्या पूर्वार्धापर्यंत कसून सराव केला. पहाटे चार वाजता उठून ईर्स्टन एक्स्प्रेस, भिवंडी, पुण्यापर्यंत सायकलिंग करायचो. याचसोबत पोलीस जिमखाना व मफतलाल येथे जलतरणातील अचूक टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला.

प्रशिक्षक म्हणून कोणाचे नाव घ्याल?

– सुदैवाने अशी दोन माणसं माझ्या वाटय़ाला आली आणि त्यांचे मोलाचे सहकार्य मला लाभले. डॉ. आनंद पाटील आणि कौस्तुभ राडकर या दोघांचे प्रशिक्षक म्हणून मला मार्गदर्शन मिळाले. त्यांच्यामुळे काय खायला हवे, कोणत्या प्रकारचा व्यायाम करायला हवा हे सगळे त्यांच्याकडून वेळोवेळी समजले. या दोघांबरोबर सगळय़ात मोठी आणि मोलाची मदत मिळाली ती गुगलची. त्यावर अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी शोधून त्याची अचूक उत्तरे मला सापडली. कसे पोहायचे, धावण्यात सुधारणा कशी आणायला हवी  आदी बारीकसारीक तंत्रं मी गुगलवरूनच शिकलो. त्यामुळे गुगलचेही आभारच मानायला हवे.

ज्यांना खेळाची आवड आहे, पण ती पूर्ण होऊ शकलेली नाही. पण मनात ठिणगी पेटली आहे. अशांना काय सांगाल?

– आतापर्यंत जे पूर्ण झालेले नाही त्यांनी असे खेळ निवडावेत ते आता खेळू शकतात. गोल खेळू शकता, लॉन टेनिस खेळू शकता. वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. तुमची इच्छा जबरदस्त असेल तर मार्ग निश्चित सापडतो. त्या दिशेने प्रयत्न करा. आळस झटकून टाका. व्यायामाला महत्त्व द्या.

या तिन्ही गोष्टी करताना स्टॅमिना वाढवण्यासाठी काय केले?

– स्टॅमिना वाढविण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत व्यायाम करायचो. त्यात रनिंग, सायकलिंग, स्वीमिंग असे असायचे. स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जेव्हा आपण गतीने धावतो तेव्हा लॅक्टिक ऑसिड जमा होते. ते जर जमा व्हायला द्यायचे नसेल तर वेगावर कमी सराव करावा लागतो. सतत वेगाने धावायचे नाही. थोडं वेगाने मग मध्ये वेग कमी करून तो पुन्हा वाढवून असे धावायचे. यामध्ये लॅक्टिक ऑसिड वाढतात आणि ते लगेच खाली जातात. त्यामुळे तुम्हाला दुखत नाही. या सरावामुळे जेव्हा तुम्ही सतत वेगाने धावतात तेव्हा तुम्हाला तेवढा थकवा येत नाही. छोटय़ा छोटय़ा क्लृप्त्या मी लक्षात घेतल्या होत्या. एनर्जी सेव्ह झाली की तुम्ही नंतर चांगले करू शकता. तसेच जीममध्ये मी फक्त मसल्ससाठी जात होतो.

 खेळात करिअर करावेसे वाटले नाही का?

– त्या काळात लोकांचा समज होता की, ‘खेलोगे, कूदोगे बनोगे खराब, पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब.’ त्या काळात जेव्हा मी यूपीएससीची तयारी करत होतो तेव्हा असं मानलं जायचे की, खेळणारी मुल म्हणजे वाया गेलेली ही लोकं आयुष्यात काही करू शकत नाहीत. अशा प्रकारचे विचार होते. त्यामुळे खेळाला कधीच मनावर घेतले नाही.  मोठा ऑफिसर होण्यासाठी शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे होते. त्या काळात क्रिकेटपलीकडे अन्य कोणत्या खेळाला तेवढे महत्त्व नव्हते आणि क्रिकेट हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहरचे होते.

  मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमुळे क्रीडा स्पर्धांतील वयाची अट शिथिल होते. सामान्य माणसासाठी कसे फायदेशीर?

– मला असे वाटते की मॅरेथॉन, ट्रायथलॉन या अशाप्रकारच्या स्पर्धा आहेत, त्यामध्ये वयाची मर्यादा नाही. त्यात तुम्ही कोणाविरुद्ध धावत नसता तर  तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर धावता. तर यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. ताणतणावापासून आराम मिळतो. यासाठी काही विशेष वेगळे करावे लागत नाही. मॅरेथॉनसाठी काही लागत नाही. तुमच्या स्वतःंवर विश्वास ठेवून धावायचे असते. कुठेतरी आत्मविश्वास  ढासळू लागतो. त्यावेळी अशाप्रकारच्या व्यायाम स्पर्धा खूप कामी येतात. या स्पर्धेत तुम्ही किती अंतर पार केले याला महत्त्व असते.

  नोकरीखेळ यांचा ताळमेळ

– कोणत्याही गोष्टीवर मनापासून प्रेम केल्यास सर्व काही सुरळीत होत असते. या वेळी माझ्या कुटुंबीयांचाही मला मोलाचा पाठिंबा लाभत आहे. माझी आई नंदराणी, बायको संजना यांची पदोपदी मला साथ लाभतेय. त्यामुळे नोकरी व खेळ यांचा योग्य समन्वय साधता येत आहे.

  ही स्पर्धा पूर्ण करताना आलेले अनुभव

– दोन-तीन अनुभव आले. मी पोलीस अधिकारी आहे. जेव्हा काही कार्यक्रम असताना लोकं ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘जय शिवराय, जय जिजाऊ’ नारे  देताना मी त्यांना रोखायचो. पण जेव्हा मी सायकलिंग, रनिंग करत होतो जेव्हा समोरून कोणी माणूस आला जेव्हा कोणाला कट करून पुढे जायचो तेव्हा मी पण ‘जय शिवाजी, जय भवानी’ असे माझ्या तोंडून निघत होते. तो वेगळाच जोश असतो. दुसरे स्पर्धकही असायचे. मला वाटायचे, ते इस्कॉनचे अनुयायी आहेत. म्हणून मीही बोलायचो ‘हरे कृष्णा हरे रामा’. रनिंगमध्ये मी पाहिले, दुसऱया लोकांचे नाव घेऊनही ‘अले क्लिष्ना अले क्लिष्ना’  असे बोलत होते. फ्रेंच शब्दाचा शोध घेतला. नंतर मला कळले, की त्याचा अर्थ ‘जय हो कृष्णा’ असा होता.

 जसजसे वय वाढते तशी तस शारीरिक क्षमता कमी होते. यावर कशी मात केलीत?

– माझे म्हणणे आहे की, वय हे केवळ आपल्या डोक्यात आहे. जोपर्यंत आपण जगत आहोत ते असे जगले पाहिजे की, संपूर्ण विश्वाची ऊर्जा आपल्यामध्ये आहे. मी जे काही ठरवले ते करू शकतो असे प्रत्येकाने ठरवले तर कधीच कोणाला नैराश्य येणार नाही. नेहमीच ते सकारात्मक ऊर्जेने उत्साही राहतील. तर मी जेवढा फिट आता आहे तेवढा आधी नव्हतो. याचे कारण काय आहे तर, आता मला माहीत आहे व्यायामाची नेमकी तंत्रं काय आहेत. कोणता आहार घेतला पाहिजे, काय टाळायला हवे, पोहायचे कसे, काय घेतल्यावर मला ऊर्जा मिळेल, काय टाळल्यावर माझा थकवा कमी होईल अशाप्रकारचे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा आपण जास्त फिट राहतो.