इरफानला ब्रेन कॅन्सर झालाय? काय आहे सत्य?

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता इरफान खानला गंभीर आजार झाला असल्याचं त्याने स्वत:च ट्विट करून त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे. इरफानने त्याला नेमकं काय झालं आहे याचा खुलासा ट्विटमध्ये केला नाही. डॉक्टरांकडे त्याचे उपचार सुरू असल्याचंही त्याने सांगितलं. मात्र इरफानला ब्रेन कॅन्सर झाल्याच्या चर्चा आता सर्वत्र सुरू झाल्या असून उपचारासाठी त्याला मुंबईतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र इरफानचे मित्र आणि ट्रेड अॅनालिटीक्स कोमल नाहटा यांनी या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे.

नाहटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान अस्वस्थ आहे, मात्र त्याच्या आजाराबाबत येणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. इरफानला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले नाही. इरफान सध्या दिल्लीत आहे आणि हेच सत्य आहे. सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार, इरफानला Glioblastoma Multiforme (GBM) ग्रेड ४ आजारानं ग्रासलं आहे. त्याला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तसेत त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मात्र नाहटा यांनी दिलेल्या माहितीमुळे या सर्व अफवा असल्याचं उघड झालं आहे.

इरफानने सोमवारी ट्विट करून, मला गंभीर आजार झाल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. त्यामुळे इरफान त्याचा आगामी चित्रपट ‘ब्लॅकमेल’च्या प्रमोशनमध्येही सहभागी होऊ शकलेला नाही.