सौंदर्योपचार…निगा… स्वच्छता…

<<श्रेया मनीष>>

मॅनीक्युअर, पेडीक्यूअर हे केवळ सौंदर्योपचार आहेत का? यातून सौंदर्य जरी खुलत असलं तरी यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होत असते ती म्हणजे हातापायांची आणि नखांची स्वच्छता आणि निगा. बऱ्याचदा आजी-आजोबा किंवा विशेषतः आजींचे एका ठराविक वयानंतर हातापायांकडे ‘आता मला काय करायचे आहेत सौंदर्योपचार’ म्हणून दुर्लक्ष होते. याचबरोबर आजी-आजोबांना आणखीन एक समस्या भेडसावते ती हातापायांच्या नखांची आणि त्वचेची.

अर्थातच काळजी घेणे जमत नाही म्हणजे त्यांना या वयात हातपाय थरथरणे किंवा खाली वाकायला त्रास होणे यासारख्या समस्या होत असल्यामुळे ते नखंसुद्धा कापत नाहीत यामुळे त्यांची त्वचा जाड सुरकुतलेली आणि नखेसुद्धा काळपट, विद्रुप दिसू लागतात. त्यांच्या या समस्येकडे तरुणांनी किंवा ते जर एकटे राहत असतील तर त्यांनीसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कसं ते पाहा –

दर ३ ते ४ आठवडय़ांनी त्यांना पार्लरला नेऊन किंवा घरातच मॅनीक्यूअर आणि पेडीक्यूअर केलं पाहिजे.दर पंधरा दिवसांनी पाच मिनिटांसाठी त्यांचे हात आणि तळपाय पाण्यात बुडवून ठेवावे. मग टॉवेलने पुसून लगेचच नखे कापावीत.

दररोज झोपतेवेळी आजी -आजोबांच्या हातापायांना मॉयश्चरायझर ऐवजी खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल लावून ५-१० मिनिटे मालीश करावी. यामुळे आजी-आजोबांच्या थकलेल्या हाडांना आराम पडेल आणि त्यांची त्वचा, कोमल होईल. वय झालं म्हणून आपण नेलपॉलिश लावू नये हा गैरसमज आजींनी काढून टाकावा. या वयातही त्यांनी आपल्या कपड्यांना मॅच करणारी नेलपॉलीश लावावी. म्हणजे त्यांची त्वचा आणि नखे सुंदर दिसतील.

मॅनीक्यूअर

अर्धा टब पाण्यामध्ये २ थेंब शाम्पू टाकून त्यामध्ये १० मिनिटे हात बुडवून ठेवा. नंतर हात पुसून मॉयश्चरायझरयुक्त स्क्रबने ३-४ मिनिटे हातांची मालीश करा. मग हात धुऊन हातांची नखे कापा आणि त्यांना शेप द्या. आपली आवडती नेलपेंट लावा. ती सुकल्यावर हातांना मॉयश्चरायझर किंवा हॅण्डलोशन लावा. फक्त आजींनाच नेलपेंट लावा. मग बघा त्यांचे हात कसे सुंदर दिसू लागतील.

पेडीक्यूअर

यासाठी मॅनीक्यूअरसारखीच प्रक्रिया करावी. फक्त हातांऐवजी पाय पाण्यात बुडवावेत आणि पाण्यामधून पाय बाहेर काढल्यानंतर प्यूमिक स्टोनने तळपाय आणि त्यावरील भेगा अलगदपणे घासून काढाव्यात म्हणजे तळपायांवरील मृत त्वचा निघून जाईल. मग मॉयश्चरायझरने ३-४ मिनिटे पायांची मालीश करावी. मग बघा आजी-आजोबांचे पाय कसे सुंदर होतील.

लक्षात ठेवा आजी-आजोबा जर मधुमेहाचे रुग्ण असतील तर मॅनीक्यूअर – पेडीक्यूअर करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. स्क्रब करून अगर नखे कापताना त्यांना कुठेही जखम होऊ नये याची काळजी घ्या. जखम झाल्यास मॉईश्चरायझर लावा.

आजी-आजोबा अल्झायमरसारख्या मनोविकाराने ग्रस्त असतील तर त्यांची नखे कापणं फार गरजेचं आहे. कारण कधी कधी याची तीक्रता वाढल्यास ते इतरांना किंवा स्वतःलादेखील नखांनी बोचकरू शकतात. अशा रुग्ण आजी-आजोबांची अतिशय प्रेमाने गोड बोलून नखे कापावीत.