बानुबयाचं मार्जारपुराण

अदिती सारंगधर,[email protected]

बानू अर्थात ईशा केसकर चार मांजरांचं त्यांच्या मुलाबाळांसहीत मोठ्ठं बारदान सांभाळतेय

ईशा केसकर म्हटलं तर पटकन चेहरा येणार नाही कदाचित तुमच्या डोळ्यांसमोर, पण तेच ‘बानू’ जय मल्हारमधली म्हटलं की अच्छा ती होय वाटून क्षणात ओळख पटेल. अय्या, तुझ्याकडे लॅब आहे. बघू फोटो… किती क्यूट… ओ…गं तरी असं अस्सल पुणेरी थाटात संभाषण सुरू झालं आणि मग कोको, किकी स्पॉटलेस पिक्चरमध्ये आल्या. आणि ‘बानू’ झाली ‘तायडी’ आणि नुसती ‘तायडा’ नाही मस्तीखोर, डांबरट तायडा.

माझ्याकडे ना आता ४ मांजरी आहेत. कोको माझं पिल्लू मला सापडलं होतं भरत नाटय़ मंदिराच्या बाहेर… ज्यावर्षी मला पुरुषोत्तम करंडकमध्ये बक्षीस मिळालं होतं… मी बक्षीस घेऊन बाहेर आले आणि आवारात टुणकन् उडी मारून जवळजवळ माझं अभिनंदन करायला आलं ते इतकं (पुणेरी थाटात हं) गोड होतं की तेच माझं एक मोठ्ठं बक्षीस झालं… खरंतर इतका पाऊस पडत होता, भिजलेलं हे पिल्लू बसलं होतं स्वतःला सावरत एका दगडावर, थोडंसं घाबरलं आणि अचानक मी दिसल्यावर आलं माझ्याकडे… बरोबर आई होती. तिला आता फायनली कन्व्हीन्स केलं की बाई प्लीज आता त्याला एकटं नाही सोडणार मी… मला याला घरीच न्यायचंय… आणि फायनली आमच्या घरात पेट आलं.

त्याला घरी आणून गरम पाण्यानं आंघोळ घातली, पुसलं, सुकवलं. दूध दिलं माझ्याच चादरीवर छोटा बेड तयार केला कोकोसाठी… आय लव्ह द नेम म्हणून कोको.. त्यामागे खूप काही विचार नाही. ऐक ना… एक धम्माल किस्सा आठवलाय, कोको खूप हॅण्डसम.. म्हणजे इंडियन ब्रीड असूनही इतका हॅण्डसम असणाऱया कोकोवर बाकीच्या मांजरी आणि त्यांचे आईबाबा लट्टू व्हायचे आणि मला आईशप्पथ ‘स्थळासाठी’ फोन यायचे… एकदा एका फॅमिलीचा असाच फोन आला की बाबा आमची मांजर हीटवर आहे. तुम्ही कोकोला पाठवता का रात्री. तर आईबाबा म्हणाले… तू जा बाई त्याच्याबरोबर त्याला काही वेडवाकडं खाऊ घातलं, मारलं, डांबून ठेवलं तर… मला झेपलंच नाही ते त्या आमच्या मांजराच्या मेटिंगसाठी अनोळखी घरात रात्रभर त्यांच्या मुलीला पाठवत होते… कुठलाही असा विचारच नाही… खूप गंमत वाटली त्याचं इतकं प्रेम बघून… पण समोरची लोकंपण इतकी चांगली होती. रिश्ता करायला नवरदेवाला गाडीतून घेऊन गेली…

दरम्यानच्या काळात माझं मुंबईत शूटिंग सुरू झाल्यानं मला शिफ्ट व्हावं लागलं… पण तुलनेत मांजर फार काही इमोशनल वगैरे नसल्याने तू आता कधीतरीच येणार आणि फक्त आईबाबा. इथं असणारेत का? इतक्या इझिली कोकोने ते स्वीकारलं… मलाच उलट जाम त्याची आठवण यायची… मी कोणाला कुशीत घेऊन झोपू म्हणून… आय युज्ड टू मिस हिम अ लॉट. आणि इथं गोरेगावच्या रस्त्यावर मला एक फ्रेंड सापडलं. स्ट्रीट कॅट… मी थांबायचे, खेळायचे तिच्याशी आणि घरी यायचे. पण एकदा दिसलं की ती लंगडतेय, पायाला दुखापत झालीये. नीट जवळ जाऊन पाहिलं तर तिच्या हनुवटीलाही लागलं होतं हातात घेतल्यावर कळलं की ही प्रेगनंटही होती… सुदैवानं कोकोला सांभाळल्यामुळे फस्ट एड फॉर कॅट काय काय असतं ते माहीत होतं… रात्री तिला घरी आणलं. शांतपणे स्वच्छ केलं, मलमपट्टी केली, दूध संपलं होतं नेमकं. पोळी केली रात्री आणि खायला घातलं. डॉक्टरांना झोपेतून उठवलं… औषध आणलं, पेन किलर्स दिले आणि झोपवलं… घरीच मग वरचेवर घरी यायची. २-३ तास रमायची आणि परत जायची… एक दिवस अचानक सोसायटीच्या मुलांनी विचारलं “ताई किफी बरी आहे का? तेव्हा कळलं की मॅडमचं नाव किफी आहे आणि ती माझ्याकडे असते असं तिनंच डिक्लेअर करून टाकलंय.

cat-love-1

ती प्रेगनंट असतानाच दिवाळीत ४ दिवस मी पुण्याला घरी सुट्टीसाठी गेले… मला वाटलं येईपर्यंत किफीनं पिल्लं दिली असतील, पण परत आले तेव्हाही ही पोटुशीच होती आणि वॉचमनच्या कॅबिनमध्ये बहुतेक माझीच वाट बघत बसली होती… घरी आली… सोफ्यावर बसली आणि हिच्या कळा सुरू झाल्या… मला हे माहीत होतं की डिलिव्हरी दरम्यान जर त्या मांजराची शक्ती कमी पडली, जोर कमी पडला तर शक्ती येण्यासाठी ते त्यांचं एखादं पिल्लू खातात. हे टाळण्यासाठी तिची शक्ती टिकण्यासाठी तिच्यासमोर कॅट फूड ठेवलं, पाणी ठेवलं. शांतपणे तिचा पंजा हातात धरून तिला धीर दिला की मी आहे, तू काळजी करू नकोस. तिला त्रास व्हायला लागला पण इतक्या रात्री डॉक्टर तरी कुठून आणायचा? खरं तर माझ्यासमोर माझं बेबी पिल्लं देणार.. डिलिव्हर होणार.. हे खूपच एक्सायटिंग होतं. तेवढीच भीती होती. पण इथं मी किफीची आई असल्यानं मी स्ट्राँग रहाणं गरजेचं होतं… सगळी शक्ती एकवटून किफीनं माझ्यासमोर ४ पिल्लांना जन्म दिला. दर पिल्लांच्या मध्ये १०-१५ मिनिटांचा गॅप होता. ४ पिल्लं दिल्यावर ती प्रचंड दमली होती. पुन्हा तिला पाणी दिलं आणि दमून ती झोपली. फिडसाठी उठायची. तिथपासून ते… ते ही मस्तीखोर द्वाड पोरं मोठी होऊन आईला अक्षरशः त्रास होईपर्यंत सगळं माझ्यासमोर घडलंय. इतका अमेझिंग एक्सप्रियन्स होता… आहे हा अदिती..

त्या सगळ्या पिल्लांची मी नाव ठेवली होती. मोठीचं नाव प्युरेओसा कारण तेव्हा आलेली फिल्म मॅडमॅक्स फुरोसा मला खूप आवडली होती… सगळ्यात लहान छोटं दुर्दैवानं ते दगावलं… एक पिल्लू अत्यंत वेगळं स्पॉटलेस होतं म्हणून तेच त्याचं नाव ठेवलं. मला त्या पिल्लांना ऍडॉप्शनला द्यायचं होतं कारण इतक्या सगळ्यांना शूटिंग सांभाळून जपणं कठीण होतं. दरम्यान माझ्या शेवटच्या मांजरीनं पण पिल्लं दिली होती आणि फायनली माझ्या मुली चांगल्या घरात गेल्या. एक मुलगी आली, स्पॉटलेसला ठेवलं आणि बाकी दोघांना घेऊन निघाली आणि जाताना म्हणाली, “मी आणि अनुराग कश्यप त्या पिल्लांना घेतोय. म्हणजे अनुराग कश्यप माझा व्याही (खूप हसून) अशी फिल्मी कल्पनाही मनात आली.

पण इथं स्पॉटलेस मात्र एकटी पडायला लागली आणि सतत मी आसपास असल्यानं ती माझ्याशी कनेक्ट झाली. तिला फिरायला घेऊन जायला लागले… खाली खेळायला न्यायाला लागले. हळूहळू ती एकटी बाहेर जायला लागली. बरं सवयी सगळ्यांनाच चांगल्या अगदी कोको, किफीपासून स्पॉटलेसपर्यंत, कधीच कुणी ताटात तोंड नाही घातलं. सगळ्यांना पोटभर खायला दिलं की कुणाच्या ताटात बघत नाहीत. ओटय़ावर भांडय़ाचा कधी वास घेत फिरल्या नाहीत. व्हॅरी वेल मॅनर्ड बेबीज.. ठरलेल्या वेळी मला उठवतात, ठरलेल्या वेळी झोपतात.

मग एकदा स्पॉटी प्रेगनंट राहिली. तिला पिल्लू झालं… एकच. मी शूटिंगवरून घरी येईपर्यंत तिनं ते पिल्लू चाटून साफ केलं होतं. सो आता घरात तीन पिढय़ा आज्जी (किफी) मुलगी (स्पॉटी) तिची मुलगी (छोटी) आणि मी राहतोय. आमची छोटी… खाणबिणं अगदीच माणसासारखं… स्ट्रॉबेरी, कच्चे मूग टॉमेटो हे सगळं आवडीनं खाते. ती बिनधास्त आहे. सतत सगळ्यांच्या पायात घुटमळत असते. वेलकमिंग कॅट किंवा ध्यान असं प्रेमानं म्हणते तिला. एकदा एक माकड घरात आलं त्याला छोटी आणि किफीनं घाबरवून पळवून लावलं होतं. घरात त्या माकडानं सगळं विस्कटून टाकलं होतं. कांदे इकडेतिकडे, तूरडाळ सांडलेली… घरी गेल्यावर तिची विचित्र ओरड… कधी मी कोणाला ओरडले तर त्यातली मोठी इतरांना जाऊन फटके देते. बापरे इतकं कसं समजू शकते. त्यामुळे मी एकटी रहात असूनही अज्जीबात एकटी नाहीये. माझं घर खूप आणि सतत भरलेलं आहे.

गंमत अशी की किफी आपल्या पिल्लांना शिकवण्यासाठी कधी उंदीर मारून आणायची कधी सापाचं छोटं पिल्लू, कधी पाल, कधी काय. त्या सगळ्यात कितीही ओढाताण झाली तरी वैताग मात्र कधीच नाही आला. कारण डॉक्टर म्हणाले, माझ्याकडचं तिनं खाल्लंय याची परतफेड करण्यासाठी ती हे सगळं मला परत देतेय… बापरे किती तो स्वाभिमान.

मी आज अभिमानानं सांगू शकते की मी एक स्ट्राँग सक्षम रिस्पॉन्सिबल प्रेमळ आणि सक्सेसफूल आई आहे! इमोशन आहे आणि सायकॉलॉजीचा अभ्यास केल्यानं कुठेतरी सतत त्यांच्या मनाचा ठाव घ्यायचा प्रयत्न करतेय… आणि एकच प्रार्थना करतेय की माझी पिल्लं आयुष्यभर अशीच माझ्याकडे सुखात राहू देत.