आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध; अमेरिकेच्या संसदेत संरक्षणमंत्र्याची माहिती

सामना प्रतिनिधी । वॉशिंग्टन

पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेच्या संसदेत याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस आणि अमेरिकेच्या परराष्ट्र संबंधातील जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी उत्तर दिले. त्यात त्यांनी आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असून त्यांचे परराष्ट्र धोरण आहे. ते पाकिस्तान सरकारला जुमानत नाहीत असे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये असताना अमोरिकेने केलेल्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानने पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध असून ते दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचे आरोप केले आहेत, मात्र पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता अमेरिकेनेच असे संबंध असल्याचे मान्य केले आहे. सीनेटक जो डोन्नेली यांनी विचारले की, पाकिस्तानच्या धोरणात काही बदल झाले आहेत का. यावर डनफोर्ड म्हणाले, सध्या तरी पाकिस्तानचे धोरण बदलल्याचे दिसत नाही. मात्र, त्यांना दहशतवादापासून रोखण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री मॅटिस यांनीही आयएसआयवर कठोर शब्दांत टीका केली आहे.

पाकिस्तानचे वक्तव्य म्हणजे वेळेचा अपव्यय
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइक आणि कश्मीरच्या मुद्द्य़ावर केलेले भडकावू वक्तव्य म्हणजे वेळेचा अपव्यय असून असे मुद्दे आपल्याला मागे खेचत असल्याचे सांगत हिंदुस्थानच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी एनम गंभीर यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिका लोधी यांमी मंगळवारी केलेले वक्तव्य नकारात्मक आणि वेळेचा अपव्यय करणारे असल्याचे गंभीर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने अशी भडकावू आणि बिनबुडाची वक्तव्ये करून संयुक्त राष्ट्रसंघाचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नये असे त्यांनी पाकला सुनावले आहे. गंभीर यांना बोलण्यासाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता, मात्र त्यांनी 45 सेकंदांतच आपले म्हणणे मांडले. पाकिस्तानने अशी वक्तव्ये करून दोन्ही देशांतील तणाव वाढवू नये, असेही गंभीर यांनी म्हटले आहे.