पाकिस्तानमध्ये प्रार्थनास्थळावर इसिसचा हल्ला, १०० ठार

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील सेहवान गावात गुरुवारी एका सुफी संताच्या प्रार्थनास्थळावर इसिसने केलेल्या हल्यात १०० जण ठार तर २५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान-अफगाण सीमा रेषा बंद करण्यात आली आहे.पाकिस्तानमध्ये आठवड्याभरात झालेला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे.

सिंध प्रांतातील सेहवान गावात सुफी संत लाल शाहबाज कलंदर यांचे प्रार्थनास्थळ आहे. गुरुवारी संध्याकाळी येथे सुफी विधी धामालचे आयोजन करण्यात आले होते . यासाठी शेकडो लोक प्रार्थनास्थळावर जमा झाले होते. सर्वजण सुफी नृत्य संगीताचा आनंद घेत असतानाच दहशतवाद्यांनी प्रार्थनास्थळावर हातबॉम्ब फेकले. यानंतर सगळीकडे अफरातफर झाली. लोक जीव वाचवण्यासाठी वाट दिसेल तिथे धावत होते. याचवेळी अंगाभोवती स्फोटके लावलेल्या दहशतवाद्याने गर्दीत स्वताला उडवले. यावेळी झालेल्या स्फोटात शेकडो जण जागीच ठार झाले तर २५० हून अथिक जण जखमी झाले.

हल्ल्याचे वृत्त समजताच पोलिस व मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सगळीकडे रक्तामांसाचा सडा पडला होता. स्फोटाच्या आवाजामुळे प्रार्थनास्थळाशेजारील इमारतींच्या काचा फुटल्याने रस्त्यावर काचांचा खच पडला होता. अशी माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली आहे.

दरम्यान इसिसने आपल्या संकेतस्थळावर या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले आहे. तसेच हा हल्ला घडवणारया दहशतवाद्यांचे फोटोही इसिसने प्रसिध्द केले आहेत.