पाकिस्तान आर्थिक संकटात ,जनतेला संपत्ती घोषित करण्याचे आवाहन

86
imran-khan

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी तिजोरी भक्कम करण्यासाठी नागरिकांपुढे हात जोडले आहेत. त्यांनी सोमवारी संपत्ती घोषणा योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत सर्व नागरिकांनी 30 जूनपर्यंत आपल्या अघोषित संपत्तीची माहिती द्यावी आणि कर भरणा करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

सद्यस्थितीत पाकिस्तानची आर्थिक घडी मोठय़ा प्रमाणावर कोलमडून गेली आहे. देशाच्या डोक्यावरील कर्ज गेल्या दहा वर्षांत 6 हजार कोटींवरून 30 हजार कोटींवर गेले आहे. यातून सावरण्याची कसरत इम्रान खान सरकार करीत असून मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. एका अहवालानुसार पाकिस्तानमध्ये 20 कोटी नागरिकांपैकी केवळ 14 लाख लोक आपल्या उत्पन्नाची माहिती देतात. याच पार्श्वभूमीवर इम्रान यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर आपण कर भरला नाही तर आम्ही देशाला पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. सर्वांनी संपत्ती घोषणा योजनेत सहभागी व्हावे. 30 जूननंतर आपणाला ही संधी मिळणार नाही. कर भरून आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करा, देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी मदत करा, देशातील गरिबी हटवण्यासाठी मदत करा, अशी कळकळीची विनंती इम्रान खान यांनी केली आहे.

 पाकिस्तानच्या डोक्यावर 30 हजार कोटींच्या कर्जाचे ओझे आहे.
 केवळ 14 लाख लोक उत्पन्नाची माहिती देतात.
 नागरिकांना संपत्ती जाहीर करण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदत 30 जूनला संपणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या