चांद्रयान-2 च्या उड्डाणाची तारीख ठरली, 15 जुलै रोजी झेपावणार

6
chandrayaan 2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने चांद्रयान-2 या मोहिमेची तारीख जाहीर आहे. चांद्रयान – 2 15 जुलै रोजी 2 वाजून 51 मिनिटांनी अवकाशात झेपावेल. तर 6 किंवा 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरेल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी दिली.

या आधी देखील इस्रोच्या हँडलवरून 9 ते 16 जुलैदरम्यान चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र निश्चित तारीख देण्यात आली नव्हती. दरम्यान, चांद्रयान-2 मध्ये जीएसएलव्ही मार्क 3 रॉकेट तीन मॉडय़ूल घेऊन जाणार आहे.

मिशन चांद्रयान-2चे रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येईल. अंतराळ संस्थांसाठी हा भाग आजही कुतूहलाचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात फारसे संशोधनही झालेले नाही.

‘चांद्रयान-2’ या सर्वात रोमांचकारी मोहिमेपैकी एक असलेल्या या मोहिमेसाठी आमची तयारी झाली आहे. या यानासोबत ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रग्यान) हे 3 मॉडय़ूल सोबत असतील.

रोव्हर प्रग्यान हे लॅण्डर विक्रमच्या आतमध्ये ठेवण्यात येईल. याचे काम प्रग्यानला चंद्रावर योग्य ठिकाणी सुरक्षित लॅण्ड करेल. त्याचबरोबर एक ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत सतत फेऱ्या मारत राहील. त्यामुळे ते चंद्रावर असणाऱ्या रोव्हरसोबत सतत संपर्कात असेल. ऑर्बिटरच्या मदतीने इस्रोला सतत चंद्रावरील प्रग्यान रोव्हरच्या हालचालीबातत थेट माहिती मिळत राहील.