‘इस्रो’ पाठवणार शुक्र ग्रहावर यान

190

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्या सूर्यमालिकेतील मंगळ ग्रहावर अंतराळ यान पाठविण्याची मोहीम यशस्वी केल्यावर आता शुक्र ग्रहावर यान धाडण्याचा निर्णय भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) निश्चित केले आहे. शुक्र ग्रहाशी संबंधित माहिती या यानाद्वारे घेतली जाणार आहे.

शुक्र हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे. पुढील दशकात एकूण सात अंतराळ मोहिमा काढण्याचे इस्रोचे नियोजन आहे. त्यापैकी एक मोहीम शुक्र ग्रहाची असणार आहे. साधारणतŠ 2023 मध्ये शुक्र मोहीम काढण्याचे  इस्रोचे नियोजन आहे. मंगळ यान मोहिमेला चांगले यश मिळाल्यावर इस्रोने आता शुक्र ग्रहावर लक्ष केंद्रित केले आहे.

इस्रोच्या शुक्र मोहिमेत तेथील वातावरण, शुक्र आणि पृथ्वी यांच्यातील साम्य, शुक्रावरील विविध स्तर, सूर्याशी असलेला संबंध याचा अभ्यास केला जाणार आहे. शुक्र मोहिमेचे वृत्त कळताच जगभरातील सुमारे 20 देशांनी या मोहिमेत सहभागी होण्यास उत्सुकता दाखविली आहे.

इस्रोने आगामी दशकात इतर अनेक अवकाश मोहिमांचे नियोजन करून त्या यशस्वी करण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे. ‘चांद्रयान 1’ मोहीम यशस्वी केल्यावर आता ‘चांद्रयान 2’ मोहिमेचे आयोजन केले आहे.

2022 मध्ये इस्रो ‘मंगळयान 2’ मोहीम राबविणार आहे, मात्र शुक्राच्या मोहिमेबद्दल शास्त्रज्ञ अधिक उत्सुक आहेत. शुक्र मोहिमेची घोषणा केल्यावर देशभरातून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी सांगितले.

इस्रोचे शास्त्रज्ञ सध्या ‘चांद्रयान 2’ मोहिमेत गुंतले आहेत. जुलै महिन्यात चांद्रयान अवकाशात धाडले जाणार आहे. शुक्र मोहिमेचे नियोजन कसे असेल याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या