महिला अंतराळवीरही अंतराळात झेपावणार, इस्त्रोची घोषणा


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) लवकरच त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या गगनयानाला अवकाशात सोडणार आहे. विशेष म्हणजे या यानात एका महिला अंतराळवीराचाही समावेश असण्याची शक्यता आहे. इस्रोकडून नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेबद्दल पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. इस्रोने आजतागायत 17 अंतराळमोहिमा राबवल्या आहेत. ज्यात 7 लाँच व्हेइकल आणि 9 अंतराळयानांचा समावेश आहे. यातील एक मोहीम दुर्दैवाने अयशस्वी ठरली आहे. 2018मध्ये इस्रोने 2 जीएसएलव्ही आणि एमके-3, जीसॅट-11 हा उपग्रह इत्यादींचे प्रक्षेपण केले होते. या सर्व प्रकल्प आणि मोहिमांसाठी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. यातील 10 हजार 600 कोटी रुपये खर्चून गगनयानाची मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम इस्रोची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम असून इस्रो प्रथमच गगनयानात माणसाला अंतराळात पाठवण्याचा विचार करत आहे आणि गगनयानाच्या माध्यमातूनच त्याला पुन्हा पृथ्वीवर आणण्याचा प्रयोगही करणार आहे. या वर्षी गगनयानासाठी एक अंतराळ स्थानक(स्पेस स्टेशन) बांधण्यात येणार आहे. त्यानंतर 2020 च्या डिसेंबरमध्ये पहिली परीक्षा मोहीम राबवण्यात येईल. त्यानंतर जुलै 2021मध्ये पुढील मोहीम राबवली जाईल. या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्यानंतरच डिसेंबर 2021मध्ये गगनयान अवकाशात झेपावेल, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, गगनयानातून अवकाशात जाण्यासाठी दोन माणसं निवडली जाणार असून त्यापैकी एक महिला असण्याची शक्यता आहे. एखाद्या महिलेने हिंदुस्थानी बनावटीच्या अंतराळयानातून अवकाशगमन करावं, अशी इस्रोची इच्छा आहे. मात्र, यासाठी नेमक्या कुणाची वर्णी लागते, ते सर्वथा अवकाश प्रशिक्षणावर अवलंबून असल्याचंही इस्रोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.