वेब न्यूज : सामान्य हिंदुस्थानी नागरिकाला अंतराळात जाण्याची संधी


>>स्पायडरमॅन

अंतरिक्ष हा प्रत्येक मानवाच्या कुतूहलाचा विषय आहे. चंद्र, सूर्य, इतर सर्व ग्रह, तारे हा कायमच मानवासाठी उत्कंठेचा विषय राहिला आहे. अंतराळात जाण्याचे स्वप्न प्रत्येकाने एकदा तरी पाहिलेलेच असते. सामान्य माणसासाठी एकेकाळी अशक्य असणारे हे स्वप्न आता पूर्ण होण्याची संधी निर्माण झाली आहे. हिंदुस्थान अंतरिक्ष अनुसंधान संघटना (इस्रो) डिसेंबर 2021 मध्ये आपल्या अंतराळातील पहिल्या ‘मानवी मिशन’ची तयारी करते आहे. या मोहिमेत फक्त शास्त्रज्ञच नाही, तर एका सामान्य हिंदुस्थानी नागरिकालादेखील सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. अर्थात त्या नागरिकाची शारीरिक क्षमतादेखील महत्त्वाची असणार आहे. या निवडीसाठी हिंदुस्थानी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे. यासाठी नुकतेच 9 हजार 23 कोटी रुपये खर्च करून नवे मानव अंतरिक्ष उड्डाण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. डॉ. उन्नीकृष्णन नायर यांना उड्डाण केंद्राचे प्रमुख बनवण्यात आले असून गगनयान मोहिमेसाठी मार्गदर्शक म्हणून  डॉ. आर हटन यांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे तीन लोकांना अंतराळात पाठवण्याची मोहीम आखली जाणार आहे. गगनयान मोहिमेला सध्या इस्रोत सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून या मोहिमेद्वारे आधी डिसेंबर 2020 मध्ये मानवरहित तर डिसेंबर 2021 मध्ये मानवी अवकाश मोहिमेचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे प्रयत्न राहणार आहेत. या मिशनमुळे देशातील अनेक क्षेत्रांना चालना मिळेल आणी तंत्रज्ञानाचा प्रसार वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यापूर्वी इस्रो अवकाशयान, क्रूचे मॉडेल्स बनवणे किंवा सॅटेलाइट लाँच करणे अशा क्षेत्रातच कार्य करत होती, मात्र आता गगनयान मोहिमेमुळे इस्रो एका वेगळय़ाच उंचीवर पोहोचणार आहे. या मोहिमेत सहभागासाठी कोणीही सामान्य नागरिक अर्ज करू शकणार आहे. या मोहिमेतील वैज्ञानिकांनी आधी हिंदुस्थान आणि नंतर अधिक आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी याआधी अंतराळ मोहीम राबवलेल्या एखाद्या देशात पाठवले जाणार आहे. यासाठी बहुदा रशियाची निवड होण्याची जास्त शक्यता आहे.