साताऱ्यातील कूपर समूहाचा ‘चांद्रयान-3’ मोहिमेत वाटा

अखंड विश्वाचे लक्ष वेधून घेतलेली हिंदुस्थानची ‘चांद्रयान-3’ मोहीम बुधवारी फत्ते झाली. तमाम देशवासीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या या मोहिमेत साताऱयातील कूपर उद्योग समूहाचाही वाटा असल्याचे समोर आले आहे. याचा कूपर उद्योग समूह व्यवस्थापन, कामगार व सर्व सातारकरांना अभिमान आहे.

ही सर्व मोहीम हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो अंतर्गत यशस्वी करण्यात आली. इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स हे एक इस्रोचे द्रव प्रणोदन प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे, ज्यामध्ये शुद्ध हायड्रोजन गॅसची आवश्यकता असते. या हायड्रोजन गॅसचा पुरवठा करत असलेली मे. आंध्र शुगर्स लिमिटेड (सागगोंडा) या कंपनीला या हायड्रोजन गॅसच्या उत्पादनासाठी 3 कटिंग एज स्टॅण्डेड हाय प्रेशर कॉम्प्रेसरची आवश्यकता लागते. हे 3 कटिंग एज स्टॅण्डेड हाय प्रेशर कॉम्प्रेसर मशिन पुण्यातील मे. वर्कहार्ट कॉम्प्रेशन इंडिया यांनी पुरवले. या मशिनमध्ये लागणारा ‘क्रॅक शाफ्ट’ कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. यांनी पुरविलेला आहे.

कूपर उद्योग समूह ही सातारकरांची अस्मिता आहे. त्यामुळे ‘कूपर सबसे ऊपर’ असे कूपरच्या बाबतीत म्हटले जाते. देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरलेल्या चांद्रयान-3 मोहिमेत अशा पद्धतीने आपले योगदान देत कूपरने ‘कूपर सबसे ऊपर’ हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले. त्यामुळे सातारकरांकडून कूपर समूहाचे कौतुक होत आहे.