दिवाळीत संकासुराचा दिवाळा वाजला!

1

सामना ऑनलाईन,मुंबई

दिवाळीनंतर मुंबईभर सुरू होतो मालवणी जत्रोत्सव. कुळथाच्या पिठीपासून वडे-सागोतीपर्यंत सर्व काही मिळते आणि रात्री दशावतारी नाटकही रंगते. गेल्या कित्येक वर्षांचा मुंबई आणि सिंधुदुर्गातील हा अलिखित करार आहे. काही दशावतारी मंडळांचे गिरणगावातील दामोदर नाटय़गृहात प्रयोगही होतात; पण यंदाच्या दिवाळीत मात्र ‘संकासुरा’चे दिवाळेच वाजल्याचे चित्र दिसत आहे. राजाश्रय आणि लोकाश्रयासाठी या दशावतारी राजाची धडपड सुरू असून कोकणी-मालवणी माणसांची पावले या राजाला पाहण्यासाठी वळायलाच हवीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

पूर्वी दिवाळीअगोदरच ‘दशावतारी नाटक कधी लावतलास?’ असे मालवणी माणूस विचारायचा. पण लालबाग-परळमधील मालवणी विरार-डोंबिवलीला गेला आहे. जो उरलाय तो मोबाईलमध्ये अडकला अशी स्थिती आहे. दशावतारी नाटकांना मिळणारा प्रतिसाद आता घटला आहे. ऍडव्हान्स बुकिंगची खिडकी उघडतच नाही. मालवणी जत्रेत बिदागी मिळते, पण प्रेक्षक नाही मिळत अशी खंत कलाकार व्यक्त करतात.

थिएटरमध्ये शो व्हायलाच हवा

मुंबईतील थिएटरमध्ये शो होणे हे प्रत्येक दशावतारी कंपनीसाठी अभिमानाचे असते. यामुळे कंपनीची प्रतिष्ठा वाढून नावलौकिक होतो. कंपनीचा दर्जा वाढल्याने चांगल्या ठिकाणी शो मिळतात. मात्र थिएटरमधील आताच्या अवस्थेमुळे ही कला कशी वाढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दशावतार कला ही कोकणच्या कला, संस्कृती आणि परंपरेचे वैभव आहे. हे वैभव टिकवण्याचे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. त्यामुळे नफ्याचे उद्दिष्टय़ न ठेवता आम्ही या शोचे आयोजन करतो आणि यापुढेही करत राहणार  असे दशावताराचे आयोजक  के. राघवकुमार यांनी म्हटलं आहे

मुंबईत दशावतार प्रयोगासाठी आल्यावर होणारा खर्च आणि मिळणारा मोबदला यात प्रचंड तफावत आहे. मात्र आवड आणि कोकणची संस्कृती जपण्यासाठी आम्ही ही कला जोपासत आहोत. दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढे यायला हवे असे सहायक आयोदक राजन तिरवडेकर यांनी म्हटले आहे.

अशी आहे स्थिती

खानोलकर पारंपरिक दशावतार मंडळाचा यावर्षीचा मुंबईतील पहिला शो परळच्या दामोदर थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. एकूण ९० हजारांचा खर्च असलेल्या या नाटकासाठी फक्त १८ हजारांचे बुकिंग झाले.

 

मुंबईत दशावतार सादर करण्यासाठी नाटक कंपनीतील १५ ते २०  कलाकार, त्यांचा पेहराव, शृंगाराचे साहित्य, संगीत साथीसाठी वाद्ये घेऊन कोकणातून यावे लागते. मुंबईत येण्यासाठी प्रवासावरही मोठा खर्च होतो. मुंबईत आल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही होत नाही. त्यामुळे शासनाने कोकणचे वैभव असलेल्या दशावताराच्या मदतीसाठी खास व्यवस्था केली पाहिजे, अशी अपेक्षा खानोलकर पारंपरिक दशावतार मंडळाचे मालक-संचालक बाबली मेस्त्र्ााr यांनी व्यक्त केली.