चार वेळचा चॅम्पियन इटली फुटबॉल विश्वचषकातून बाहेर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चार वेळा फुटबॉल विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या इटलीला जोरदार किक बसली आहे. प्ले ऑफच्या दुसऱ्या फेरीमध्ये स्वीडनविरुद्ध इटलीला बरोबरीत समाधान मानावे लागले. त्यामुळे इटलीच्या २०१८मध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये खेळण्याच्या आशांना सुरूंग लागला आहे. मात्र प्ले ऑफचा सामना बरोबरीत सोडवल्याने स्वीडनने २००६ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले आहे. फुटबॉल विश्वचषकात १९५८नंतर पहिल्यांदाच अपात्र ठरण्याची नामुष्की इटलीच्या संघावर ओढवली आहे.

पहिल्या फेरीत स्वीडनकडून इटलीला १-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे इटलीला विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी दुसऱ्या फेरीत स्वीडनचा पराभव करणे आवश्यक होते. मात्र या सामन्यात दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही, परिणामी सामना बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्याने स्वीडनने दुसऱ्यांदा विश्वचषकाचे तिकीट मिळवले, तर इटलीचा संघ विश्वचषकासाठी अपात्र ठरला.

याआधी १९५८ मध्ये इटलीचा संघ विश्वचषकामध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता. तर, १९३०मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात इटलीचा संघ सहभागी झाला नव्हता.