चक्रीवादळांना नावं कशी पडतात? काय आहे ‘तितली’ चक्रीवादळ?


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

आंध्र प्रदेश आणि ओदीशा या राज्यांमध्ये ‘तितली’ नावाच्या चक्रीवादळाने थैमान घातले आहे. आतापर्यंत या आक्राळविक्राळ चक्रीवादळाने 8 जणांचा बळी घेतला आहे. अशा या महाभयंकर चक्रीवादळाचं नाव ‘तितली’ असे का ठेवले आहे? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. तर याच उत्तर ‘पाकिस्तान’ असे आहे. कारण या चक्रीवादळाला ‘तितली’ हे सुंदर नाव पाकिस्तानने दिले आहे.

ही नावं पडतात तरी कशी ?
हिंदीमहासागराच्या हद्दीत येणाऱ्या वादळांचे नामकरण प्रामुख्याने हिंदुस्थान, बांग्लादेश, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड ही राष्ट्रे करतात. 2000 सालापासून वादळांचं बारस करण्याची परंपरा सुरू झाली. 2004 साली सर्वदेशांनी यावर सहमती दर्शवली. त्यानंतर प्रत्येक देशाने वादळांसाठी 64 वेगवेगळी नावं सुचवली. त्यात या 8 देशांनी 8 नाव निवडली. ही सर्व नावांची यादी World Meteorological Organization (WMO) च्याजवळ सुरक्षित आहे. हिंदी महासागराच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक वादळाला या यादीत असलेले नाव देण्यात येते. WMO हे काम करते.

हिंदुस्थानच्या वतीने WMO कडे वादळांसाठी 8 नाव देण्यात आली आहेत. अग्नी, आकाश, बिजली,जल, लहर,मेघ, सागर आणि वायू अशी ही नावे आहेत. तर पाकिस्तानने फानूस, लैला, नीलम, वरदाह, ‘तितली’ आणि बुलबुल याव्यतिरिक्त अन्य 2 नावे दिलेली आहेत. याचपार्श्वभूमीवर यावेळी आलेल्या चक्रीवादळाला ‘तितली’ नाव देण्यात आले आहे. तर गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळाला बांग्लादेशने ‘ओखी’ असे नाव दिले होते. याआधी ओदीशा व आंध्र प्रदेशमध्ये ‘फेलिन’ चक्रीवादळाने थैमान घातले होते. हे नाव थायलंडतर्फे देण्यात आले होते.