सिद्धू मुसेवालाच्या आईला आरोग्य मंत्रालयाची नोटीस, आयव्हीएफ उपचारांचे तपशील मागवले

पंजाबचा दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला याच्या आई चरण कौर यांनी अलीकडेच एका बाळाला जन्म दिला आहे. सिद्धू मूसेवालाच्या मृत्युनंतर त्याच्य़ा आईने 58 व्या वर्षी इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) तंत्राच्या मदतीने मुलाला जन्म दिला. परंतु यामुळे त्यांच्या कुटुंबीयाच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बुधवारी आरोग्य मंत्रालयाने सिद्धू मूसेवाला यांच्या आई आणि पंजाब सरकारकडून आयव्हीएफ उपचारांबाबत अहवाल मागवला आहे.

मुलाला जन्म देण्यासाठी चरण कौर यांचे वय खूप जास्त आहे. या कारणामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकारकडून आयव्हीएफ उपचारांबाबत अहवाल मागवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्र लिहून पंजाब सरकारला लवकरच अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या पत्रात म्हटले आहे की पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयव्हीएफद्वारे मुलाला जन्म दिला आहे. सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान कायदा, 2021 च्या कलम 21(g) (i) अंतर्गत, हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी महिलेचे वय 21 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे लागते. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि याप्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल देखील सादर करावा.

दरम्यान मंगळवारी सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी ट्विटरवर एका व्हिडीओद्वारे पंजाब सरकारवर आरोप केले होते. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की पंजाब सरकार त्याचा सतत छळ करत आहे. आपले मूल कायदेशीर असल्याचा पुरावा मागत आहे. मुलाच्या जन्मासंबंधित शासकीय कागदपत्र देण्यास तयार नसल्यातचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानातील IVF प्रक्रियेसाठीचे नियम

आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वयाच्या साठीतही मुलाला जन्म दिला जावू शकतो. परंतु हिंदुस्थानातील नियमानुसार, 2021 साली हिंदुस्थानातील ‘साहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान या कायद्यानुसार, महिलांना वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत आयव्हीएफ उपचाराद्वारे आई बनण्याची परवानगी आहे, तर पुरुष वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत या तंत्राने पिता बनू शकतात.