जे. डे. हत्याकांड : जिग्ना व्होरा, जोसेफच्या दोषमुक्तीला आव्हान

सामना प्रतिनिधी । मुंबई

जे. डे. हत्याकांडातील आरोपी जिग्ना व्होरा व जॉन पॉल्सन जोसेफ यांची ‘मोक्का’ न्यायालयाने निर्दोष सुटका केली असून त्यांच्या दोषमुक्तीला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पॉल्सनविरोधात दाखल केलेल्या अपिलावर तीन आठवडय़ांनी तर जिग्ना व्होराच्या अपिलावर 18 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

11 जून 2011 रोजी ज्येष्ठ पत्रकार जोतिर्मय डे ऊर्फ जे. डे. यांची पवई येथे गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. ही हत्या छोटा राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना व्होरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉल्सन जोसेफ व दीपक सिसोदिया यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. विशेष मोक्का न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्यासमोर हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा अंतिम निकाल सुनावताना पुराव्यांअभावी कोर्टाने जिग्ना व्होरा आणि पॉल्सन जोसेफ यांना दोषमुक्त केले होते. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अपिलाची माहिती कोर्टाला दिली.