सिंहासन चित्रपटासाठी साडेचार लाख रुपयाचे कर्ज अन् एक रुपया मानधन


सामना प्रतिनिधी । नागपूर

मोठ्या पडद्यावर साकारलेला चित्रपट सहजतेने बघून चांगला किंवा वाईट, अशी प्रतिक्रिया रसिकवृंद सहज देतो. मात्र, प्रेक्षकांपर्यंत येणारा तो चित्रपट किती आणि कशा दिव्यातून बाहेर पडतो, ही एक वेगळीच रंजक कथा असते. असाच अनुभव ‘सिंहासन’ या डॉ़ जब्बार पटेल यांच्या गाजलेल्या चित्रपटाबाबचा आज नागपूरकर प्रेक्षकांना अनुभवता आला. सत्तर-ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांच्या भात्यात आलेल्या या चित्रपटाला बनवण्यासाठी पटेल यांना तब्बल साडेचार लाख रुपयाचे कर्ज काढावे लागले होते. या रकमेची आजचे मुल्य निर्धारित केले तर ते कोट्यवधीच्या घरात जाते, हे विशेष.

ऑरेंजसिटी कल्चरल फाऊंडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पर्सिस्टंट सभागृहात दोन दिवसीय डॉ़ जब्बार पटेल यांच्या चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी झाले़ या निमित्ताने डॉ़ जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर व चित्रपट समीक्षक समर नखाते यांच्या जाहीर रंगलेल्या चर्चेत ही माहिती मिळाली.

अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची पटकथा व संवाद विजय तेंडूलकर यांनी लिहिली होती. पटेलांनी काढलेल्या कर्जावरच चित्रपटाची निर्मिती झाली आणि विशेष म्हणजे, कलावंतांनीही मानधन म्हणून केवळ एक रुपया एवढेच घेतल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. शरद पवार मुख्यमंत्री असताना व राज्यात पुढच्या निवडणूकीचे वातावरण सुरू असतानाच या चित्रपटाची निर्मिती प्रक्रीया सुरू होती. चित्रीकरणासाठी विधानभवन व मंत्र्यांच्या बंगल्यांची गरज होती. शरद पवार यांना ही गरज सांगितली आणि ‘मुख्यमंत्री विरूद्ध अर्थमंत्री’ असा आशय चित्रपटाचा असल्याचेही त्यांना सांगितल्याचे डॉ़ जब्बार पटेल यावेळी म्हणाले. पवारांच्या मुख्य सचिवांनी चित्रिकरणास परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, त्यांनी राजकीय विषय असतानाही परवानगी मिळवून दिली आणि सुटीच्या दिवशी चित्रीकरण झाले. राजकीय उलथापालथ झाली तर चित्रपट थंड बस्त्यात जाईल, अशी भिती असल्यानेही उलथापालथीच्या आधीच चित्रपट व्हावा या हेतूने अनेकांनी मुक्त हस्ते मदतही केल्याचे पटेल यांनी सांगितले. हा चित्रपट तब्बल दहा आठवडे केवळ बुकींगनेच हाऊसफुल्ल चालल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कादंबरीचा विषय नव्या पिढीतील नवनाथ गोरे यांनी ‘फिसाटी’ आणि ऋषिकेश पाळंदे यांनी त्यांच्या ‘भरकटेशवर’ या कादंबरीत मांडल्याचा संदर्भ सतीश आळेकर यांनी यावेळी दिला.