माधुरीनंतर आता जॅकलिन म्हणणार ‘एक…दो.. तीन….’

सामना ऑनलाईन । मुंबई

एक…दो…तीन.. म्हणत बॉलिवूडची धकधक गर्ल माधूरी दीक्षितने तरूणांना घायाळ केले होते. तिच्या या गाण्याची जादू आजही तिच्या चाहत्यांवर आहे. आता माधुरीच्या या गाण्याची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आगामी बागी – २ या चित्रपटात हे गाणे आयटम साँग म्हणून समाविष्ट करण्यात येणार असून त्यावर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस थिरकताना दिसणार आहे.

बागी या चित्रपटाचा दिग्दर्शक अहमद खान याला हे गाणे माधुरीवर जसे चित्रीत झाले, अगदी तसेच गाणे जॅकलिनवर चित्रीत करायचे आहे. त्यामुळे माधुरी दिक्षीतच्या जुन्या गाण्याचे नवे व्हर्जन असलेल्या या गाण्यात माधुरीच्याच स्टेप्सवर जॅकलिन नाचणार आहे. तसेच जॅकलिनसाठी माधुरीसारखाच गुलाबी रंगाचा ड्रेस तयार करण्याची जबाबदारी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यावर देण्यात आली आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य हे गाणे कोरिओग्राफ करत असून जॅकलिन देखील माधुरीच्या तोडीचा डान्स करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.

बागी- २ या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या ३० मार्च २०१८ला प्रदर्शित होणार आहे.